आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राळेगणसिद्धी ग्रामस्थांचा मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर लटकावल्या बांगड्या अन‌् निवेदन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महिलांनी बांगड्यांचा आहेर दिला. अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील ग्रामस्थांनी व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अॅड. श्याम अासावा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. जिल्हाधिकारी खाली येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारत नसल्याने महिला कार्यकर्त्यांनी हा बांगड्यांचा हिरवा चुडा व निवेदनाची प्रत लटकावली. 


लोकपाल नियुक्ती व इतर मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या सहा दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये सत्याग्रह व आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मात्र, सरकार या अांदोलनाकडे कानाडोळा करीत आहे. पंतप्रधान कार्यालयाने समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठवलेल्या पत्राची खिल्ली उडवली. त्यामुळे सरकार हजारे यांच्या अांदोलनाकडे डोळेझाक करून अण्णांच्या मरणाची वाट पहात अाहे का?, असा सवाल राळेगण ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. साेमवारी सकाळी साडेअकरा वाजता राळेगणसिद्धी गावचे ग्रामस्थ माेर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. 


कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, काेतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन गोकावे यांच्यासह माेठा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात करण्यात आला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून तेथे मोठा बंदेाबस्त तैनात केला. कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे व आगंतुकाचे ओळखपत्र तपासून आत प्रवेश दिला जात होता. अनेकांना कोणत्या कामासाठी आले, ते व्यवस्थित सांगता न आल्याने किंवा ओळख पटवून देता न आल्याने आत प्रवेश मिळाला नाही. 


राळेगण ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी इमारतीतून खाली येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारावे, आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. मात्र, दुपारी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी खाली आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी कार्यालयासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. 


अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ आलेल्या राळेगणच्या ग्रामस्थांमधील महिलांसह इतर स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही रस्त्यावरच ठिय्या मांडला. काहींनी या वेळी आपले प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. सरकार अण्णांच्या अांदोलनाकडे गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करण्यात आला. 


राळेगणसिद्धी येथील सर्जेराव निमसे, सुरेश पठारे, लाभेश औटी व ग्रामस्थांसह स्नेहालयाचे संस्थापक व संचालक गिरीश कुलकर्णी, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आपल्या भाषणातून सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. अण्णांकडे दुर्लक्ष केल्यास देशात अराजकता माजेल 
अण्णांकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा देशात अराजकता माजेल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी सरकारला दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला संबोधित करताना बहुतांश मनोगत व्यक्त करणाऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आवाहन केले. 'भारत माता की जय, जय जवान जय किसान,' अशा विविध घोषणा दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले होते. 


खासदार िदलीप गांधी यांच्या बंगल्याकडे कूच 

अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आले. मात्र, सायंकाळपर्यंत अांदोलन करूनही जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाहीत. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत सायंकाळी अांदोलकांनी खासदार दिलीप गांधींच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने खासदारांकडे दाद मागण्यास ग्रामस्थ रवाना झाले. 

बातम्या आणखी आहेत...