आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राळेगणसिद्धीत शिकलेले 300 विद्यार्थी लष्करी सेवेत, संत निळोबाराय विद्यालयात शिकलेल्या शंभराहून अधिक मुली बनल्या शिक्षिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - एकेकाळी हातभट्ट्यांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'राळेगणशिंदी'चा कायापालट 'राळेगणसिद्धी' या आदर्श गावात करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आधी लष्करात होते. त्यांचा आदर्श घेऊन अण्णांच्या शाळेत घडलेले ३०० हून अधिक विद्यार्थी लष्करात दाखल होऊन देशसेवा करत आहेत. हे घडवण्यात महत्त्वाचं योगदान आहे या शाळेचे माजी मुख्याध्यापक ठकाराम लक्ष्मण राऊत यांचे. 

 

लष्करातून निवृत्ती घेऊन अण्णांनी १९७५ नंतर राळेगणमध्ये कामाला सुरुवात केली. गाव बदलायचे असेल, तर पुढची पिढी घडवण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, हे ओळखून अण्णांनी १९८० मध्ये श्रीसंत निळोबाराय विद्यालय सुरू केले. पाचवी ते दहावी असे वर्ग पहिल्याच वर्षी सुरू होणारे हे राज्यातील पहिलेच विद्यालय होय. या शाळेची धुरा अण्णांनी ठकाराम लक्ष्मण राऊत यांच्यावर सोपवली. कर्जत तालुक्यातील डाकू निमगावचे रहिवासी असलेले राऊत आधी अमरनाथ विद्यालयात शिक्षक होते. 'हेडमास्तर पाहिजे' ही जाहिरात वाचून ते राळेगणसिद्धीला आले. कोणताही वशिला नसताना केवळ एमएस्सी बीएड ही शैक्षणिक पात्रता आणि १० वर्षांच्या अनुभवावर अण्णांनी त्यांची निवड केली. मुलांना जीवनाभिमुख शिक्षण द्या, बाकीचे तुम्ही ठरवा, असे अण्णांनी त्यांना सांगितले. राऊत यांनी मग गुरुकुलच्या जवळ जाणारा दिनक्रम सुरू केला. पहाटे ५ ते रात्री ९ अशी शाळेची वेळ ठरवली. पहाटे मुलांना उठवायचं, नंतर मैदानावर रनिंग, व्यायाम, पीटी, ८ ते ९ जादा तास, ११ ते ५ शाळा, शाळा सुटली की शिक्षकांसह सगळी मुलं खेळण्यासाठी मैदानावर, संध्याकाळी ७ ते ९ अभ्यासिका असं वेळापत्रक आखलं. शिक्षणाच्या जोडीनं श्रमदानाला महत्त्व दिलं. फावल्या वेळात मुले रोपवाटिकेत काम करत. तब्बल दोन लाख रोपांची नर्सरी शाळेनं तयार केली. प्लास्टिक पिशव्यांमध्ये माती भरून रोपं तयार करणं, त्यांना पाणी घालणं, झाडं लावण्यासाठी खड्डे घेणं, लावलेल्या झाडांची काळजी घेणं ही सगळी जबाबदारी मुलं सांभाळू लागली. 

 

राजपत्रित अधिकाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक 
चांगले संस्कार, उत्तम शिक्षण, सकस आहार, सुदृढ शरीर आणि त्याच्या जोडीला शिस्त, श्रमदान, बलोपासना आणि देशप्रेम यामुळे या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या मुलांची सैन्यदलात सहज निवड होऊ लागली. आजमितीला आमच्या शाळेचे ३०० हून माजी विद्यार्थी लष्करात विविध पदे भूषवत आहेत. मुलांप्रमाणेच १०० हून अधिक मुलींनी दहावीनंतर डीएड केलं. त्या शिक्षिका म्हणून स्वयंनिर्भर होऊन नवी पिढी घडवण्याचे काम करत आहेत, असे २२ वर्षांनंतर शाळेतून निवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक राऊत यांनी सांगितले. या शाळेत शिकलेले गणेश पोटे आयआरएस होऊन सध्या औरंगाबाद येथे जीएसटी प्रमुख म्हणून काम करत आहेत. काही माजी विद्यार्थी शेती आणि दूध व्यवसायात असून त्यांचं उत्पन्न राजपत्रित वर्ग १ च्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त आहे, असे हजारे यांनीही मोठ्या अभिमानाने नमूद केलं. 

 

नापासांच्या वसतिगृहाने घडवली अनेक यशस्वी मंडळी 
आधी इतर शाळांप्रमाणेच राळेगणच्या शाळेत मेरिट पाहून प्रवेश दिला जात असे. १९८९ मध्ये अण्णांनी नापासांची शाळा सुरू करण्याचे ठरवले. मेरिटच्या अगदी उलट म्हणजे नापास असलेल्या मुलांनाच संत यादवबाबा वसतिगृहात प्रवेश द्यायचा, असा नियम त्यांनी केला. उड्डाणटप्पू, शिरजोर असलेली मुले या वसतिगृहात आल्यावर शिस्तीत राहून अभ्यास करू लागत. ही सगळी मुले आज विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत, असे राऊत यांनी सांगितलं. 

 

बातम्या आणखी आहेत...