आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात सात किलोमीटरपर्यंत रॅली, विविध संघटनांनी पुकारलेल्या संपाला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना येथील जिल्हाधिकारी कचेरीवर विविध कर्मचरी संघटनांनी मोठा मोर्चा काढला होता. - Divya Marathi
जालना येथील जिल्हाधिकारी कचेरीवर विविध कर्मचरी संघटनांनी मोठा मोर्चा काढला होता.

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या कामगार व कर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी विविध संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जालना शहरात सात किलोमीटर अंतराची रॅली वजा मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर अनेक मोर्चे निघाले तर काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी संपाला चांगला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. विशेषत: या संपात महसूल विभागाच्या संघटनांनी सहभाग घेतल्याने बहुतांश ठिकाणच्या जिल्हाधिकारी तिसेच तहसील कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

जालना : सरकारविरोधी गगनभेदी घोषणा

सरकारच्या कामगारविरोधी व जनता विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व कामगारांच्या ज्वलंत मागण्यासाठी सर्व केंद्रीय कामगार संघटना व फेडरेशन संपामध्ये सहभागी झाले होते. संपाचा आरोग्य, शासकीय कार्यालय, मोंढ्यात चांगलाच परिणाम दिसून आला. औद्योगिक वसाहत ते गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी सात किलोमीटरपर्यंत दुचाकी रॅली काढून कामगारांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले होते. देशव्यापी संपात सहभागी होण्यासाठी सकाळी ९ वाजता एनआरबी कंपनीसमोरुन दुचाकी रॅली सुरु झाली. ही रॅली औरंगाबाद रोड, बस स्टँड, मामा चौक, फुल बाजार, शिवाजी पुतळा, काद्राबाद पाणीवेस, मस्तगड मार्गे, गांधी चमन पर्यंत विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढली. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेऊन विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या ठिकाणी सभा संपन्न झाली. शहरातून निघालेल्या या मोर्चामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. यावेळी सिटूचे राज्य सचिव अण्णा सावंत, मधुकर मोकळे, आयटकचे देविदास जिगे, इंटकचे राधेश्याम जैस्वाल, विश्वेश्वर स्वामी आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सिटूचे गोविंद आर्दड, डॉ. सुनंदा तिडके, आयटकचे देविदास जिगे, बाबूराव कावळे, भारतीय कामगार सेनेचे जनार्दन रेगुडे, आयास पठाण, आयटकचे मुरलीधर सोमवारे, मधुकर वाघमारे, राधेश्याम जैस्वाल, प्रशांत पळसकर, मकरंद सिरसमकर आदींची उपस्थिती होती.

नांदेड : कार्यालयांत शुकशुकाट

सर्वपक्षीय व कामगार संघटनांच्या संपाला नांदेड जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. संपामुळे महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांच्या कामावर परिणाम झाला. बस वाहतूक, रेल्वे वाहतूक मात्र नित्याप्रमाणेच सुरळीत सुरु होती. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, आयटक, सीटू, एमएसईबी, अंगणवाडी कर्मचारी संघटना, औषधी विक्री संघटना आदींच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वाधिक परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आला. महसूल संघटनेतील एकूण १२१२ कर्मचाऱ्यांपैकी १०९१ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. केवळ १०९ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतही ८३८ कर्मचारी संपात सहभागी झाले. परंतु जिल्हा परिषदेत एकूण ७ हजाराहून अधिक कर्मचारी असल्याने संपाचा जिल्हा परिषदेच्या कामकाजावर फारसा परिणाम झाला नाही. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील परिचारिका, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेल्यावर आरोग्य सेवाही काही प्रमाणात विस्कळीत झाली. संपामुळे नवीन रुग्णाची भरती व शस्त्रक्रिया हाेऊ शकल्या नाहीत. बँकांमध्ये एसबीआय वगळता महाराष्ट्र बँक, युनियन बँक आदी बँकांचे कामकाज ठप्प झाले. महावितरण कंपनीतील ९ टक्के कर्मचारीही संपात सहभागी झाले. दळणवळणावर मात्र संपाचा काहीही परिणाम झाला नाही.

मुस्लिम बांधवांकडून बंद

संपाच्या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी कडकडीत बंद पाळला. मिल्ली तहरीक संघटनेच्या वतीने एनआरसीच्या विरोधात बंदचे आयोजन करण्यात आले. ट्रेड युनियनच्या संपाला पाठिंबा व एनआरसीच्या विरोधात बंदचे आयोजन करण्यात आले होते. तथापि ट्रेड युनियनने एनआरसीचा मुद्दा संपात आणू नये अशी विनंती केल्याने मिल्ली तहरीकच्या वतीने एनआरसीच्या विरोधात बंदचे आयोजन करण्यात आले. शहरातील बर्की चौक, देगलूर नाका, निझाम काँलनी, पीर बुऱ्हाननगर, वजिराबाद, गांधी पुतळा आदि भागातील मुस्लीम बांधवांची दुकाने बंद होती.

लातूर : कार्यालये, बँका बंद राहिल्या, दुकाने मात्र सुरूच

विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला बुधवारी लातूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सरकारी कार्यालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. त्यामुळे सरकारी कार्यालयात अधिकारी उपस्थित असले तरी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला. बँकांतील कामगार संघटनाही संपात सामील झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बँकांतील व्यवहार होऊ शकले नाहीत. पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनाही संप करीत ठिय्या आंदोलन केले. तहसील कार्यालय, गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आघाडीतील कामगार संघटनांनी आंदोलने केली. दरम्यान, या संघटनांचे कर्मचारी संपात उतरल्यामुळे कामकाजावर परीणाम झाला असला तरी कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिला नसल्यामुळे बाजारपेठेवर संपाचा परिणाम झाला नाही. शहरासह जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या गावातील बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. त्यामुळे कार्यालयीन कामकाज शंभर टक्के आणि बाजारपेठा शून्य टक्के बंद राहिल्या.

बीड : जिल्ह्यात कष्टकरी उतरले रस्त्यावर

मोदीजी भांडवलदारांना पायघड्या घालू नका - कामगार, कर्मचारी, शिक्षक, मजुरांना न्याय द्या' अशा जोरदार घोषणा देत जिल्ह्यातील कष्टकऱ्यांनी बुधवारी दुपारी रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करावा, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरु करावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होत महसूल कर्मचाऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येऊन कामबंद आंदोलन करत निदर्शने केली. जिल्हा रुग्णालयात परिचारिका व कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून निदर्शने केली. शिक्षक संघटनांनी शाळा बंदचे आवाहन केल्यामुळे सकाळी अकरा वाजता शाळा सोडून देण्यात आल्या. दुसरीकडे अंबाजोगाई येथील स्वारातीतील परिचारिकांनी देशव्यापी संपाला पाठींबा देत सकाळी आठ वाजता काम बंद अांदाेलन केले. पाटोदा तालुकाही बंदमध्ये सहभागी दिसला. संपाला पाठिंबा देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.

ट्रेड युनियनचा मोर्चा

औद्योगिक संपाच्या निमित्ताने ट्रेड युनियनच्या वतीने आयटीआय चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये जवळपास २ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. अंगणवाडी सेविका मोर्चात सहभागी झाल्या.

हिंगोली : जिल्ह्यात संपाला मोठा प्रतिसाद

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महसूल विभागाचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाले होते त्यामुळे आज दिवसभर महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे इम्रान पठाण दिलीप कदम गोपाल कंठे सय्यद अयुब, सूर्यकांत मुस्तापुरे नवनीत शर्मा बालाप्रसाद धूत यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला ग्रामसेवक संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सचिव राजेश किलचे यांनी या संदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. यासोबतच तलाठी संघटनादेखील या संपात सहभागी झाली होती. तसेच महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने ही या संपात सहभाग नोंदवला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.

परभणी : जिल्ह्यातील कामकाज ठप्प

देशव्यापी संपात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कामगार, अंगणवाडी सेविका यांनी सहभाग नोंदवल्याने कामकाज ठप्प झाले होते. आयटकच्या वतीने शिवाजी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी उपाय योजना राबवण्यात यावी, रोजगार निर्मिती करून केंद्र व राज्य सरकारी खात्यातील २४ लाख रिक्त पदे भरण्यात यावी, रोजगार, कंत्राटी मानधनावर कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे, कामगार विरोधी धोरणात बदल करण्यात यावा, सीएए, एनपीआर व एनसीआर कायदे रद्द करण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आयटकच्या आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेने देशव्यापी संपात सहभाग नोंदवला. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने या संपात सहभाग नोंदवत जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडकर, सरचिटणीस विजय मोरे आदींसह महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने देशव्यापी संपात सहभाग नोंदवला. यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सरकारी व निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. २००५ नंतर नियुक्त झालेले शिक्षक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहेत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश जोशी, सचिव पी.सी.निरस आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

बातम्या आणखी आहेत...