आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महारणधुमाळी’त माया vs योगी; नागपुरात बसपची तर नाशकात योगी आदित्यनाथ यांची सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. आंबेडकरांना फसवून काँग्रेसने ‘३७०’ लादले -   मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांची टीका

नाशिक - कलम ३७० हटवून पंतप्रधान मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना फसवून राज्यघटनेत कलम ३७० घुसडवून काँग्रेसने केलेल्या पापाचे परिमर्जन केले, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाशिकमधील सभेत व्यक्त केले. उत्तर भारतीय मतांच्या संघटनासाठी कामगारबहुल सिडको परिसरात भाजपने सभा घेतली. जननी आणि जन्मभूमी यांच्याप्रती दायित्व निभावण्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. नेता, नीती आणि नियत नसलेले पक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संभावना केली.

सीता अपहरणामुळे रामायणाला मिळालेली कलाटणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व देशभर पोहोचविणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमीत ही सभा होत असल्याचा उल्लेख करून योगी आदित्यनाथ यांनी नाशिककरांना वंदन केले. ‘रावणाचा पराभव झाल्यावर लक्ष्मणास काही काळ लंकेत वास्तव्य करण्याचा मनोदय व्यक्त केला, मात्र आपल्याला तो मोह नसल्याचे स्पष्ट करून प्रभू रामचंद्राने अयोध्या गाठली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा मोह आवरता आला नाही’, अशी टिका त्यांनी केली. परिवारवादी, जातीवादी आणि स्वार्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून विकास, सुशासन आणि समृद्धीसाठी तसेच जननी आणि जन्मभूमी यांच्याप्रती दायित्व निभावण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. 
 

मुस्लिम महिलांना न्याय
मुख्यमंत्री योगी म्हणाले, मोदी सरकारने कलम ३७० रद्द करून दहशतवादाला पायबंद घातला आहे. मोदी सरकारच्या योजना फडणवीसांनी जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. माेदी सरकारने तीन तलाकचा कायदा करून मुस्लिम महिलांना न्याय दिला आहे.
 

डाॅ. बाबासाहेबांच्या विचारांमुळेच कलम ३७० ला पाठिंबा दिला - माजी मुख्यमंत्री मायावतींचे नागपुरात स्पष्टीकरण

नागपूर - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देशाची एकता व अखंडतेचे पुरस्कर्ते होते. म्हणून आम्ही जम्मू-काश्मीरमध्ून कलम ३७० हटविण्यास पाठिंबा दिला. पण, याचा अर्थ आम्ही सरकारच्या कोणत्याही चुकीच्या धोरणांचे समर्थन करू असे कदापि समजता कामा नये, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी ठणकावले. त्या  राज्यातील बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ इंदोरा मैदानावर आयोजित सभेत बोलत होत्या. 

दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत हे हिंदूराष्ट्र असल्याचे सांगितले. त्यामुळे मुस्लिमांसह इतर अल्पसंख्याकांच्या मनात भय निर्माण झाले आहे. भागवत यांच्या या वक्तव्याशी बसपा सहमत नाही हे सांगतानाच भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे प्रतिपादन मायावतींनी केले. त्या म्हणाल्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान केवळ हिंदुंना डोळ्यासमोर ठेवून लिहीले नव्हते. त्यांनाही सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक अपेक्षित होते. असे असताना भाजपा व संघ देशाला हिंदूराष्ट्र करायला निघाले आहे. हे आम्हाला मान्य नाही. काँग्रेस आणि भाजपाच्या हातमिळवणीमुळे नोकऱ्यांतील आरक्षण कमी झाले. खासगी क्षेत्रातही आरक्षणाचे कोणी नाव काढत नाही. बसपा सत्तेत आल्यास आम्ही खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करू, असे मायावती म्हणाल्या. 

योग्य वेळी बौद्ध धर्म स्वीकारेन 
मायावती यांनी यापूर्वी आपण बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर आयोजित त्या सभेला त्यामुळे तुफान गर्दी होती. परंतु त्यावेळी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारणे टाळले होते. सोमवारच्या सभेतही मायावतींनी आपण योग्य वेळी बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. अजून ती वेळ आलेली नाही, असे त्या म्हणाल्या. 
 

संविधान हाच जाहीरनामा
प्रत्येक पक्ष जाहीरनामा घेऊन लोकांसमोर येत आहे. लोकांना विविध आश्वासने आणि प्रलोभने दाखवण्यात येत आहे. परंतु ही प्रलोभने आणि डावपेचांना तुम्ही बळी पडू नका. बसपा म्हणूनच जाहीरनामा प्रकाशित करीत नाही. संविधान हाच आमचा जाहीरनामा, असे मायावती म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...