आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिराबाबत अध्यादेश काढून फायदा नाही, राज्यसभेत बहुमत नाही- दानवे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद/लातूर - राममंदिराच्या उभारणीबाबत समविचारी पक्षांनी एकत्रित यावे ही भाजपचीही भावना आहे. याबाबत अध्यादेश काढून काहीही फायदा होणार नाही. राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत संख्याबळ वाढवू आणि मग राममंदिर उभारणीचा निर्णय घेऊ असे म्हणत आपल्या आश्वासनांच्या पूर्ततेबाबतची पक्षाची हतबलता भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे-पाटील यांनी व्यक्त केली.

 

प्रदेशाध्यक्ष दानवे सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर पक्षाच्या आढावा बैठक घेत आहेत. ते रविवारी (दि.२५) उस्मानाबाद तसेच लातूर आले असता पत्रकारांशी बोलत हाेते. या वेळी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा व त्यांनी भाजप, मोदींना उद्देशून केलेल्या भाष्याबाबत छेडले असता त्यांचे हे बोलणे राजकीय असून यातून त्यांना काय फायदा होणार ते तेच सांगू शकतील, असे सांगितले. राममंदिर व्हावे ही केवळ पक्षीय भावना नसून ती समस्त हिंदूंची भावना आहे, असेही खा. दानवे यांनी सांगितले.

 

आढावा बैठकीबाबत माहिती देताना त्यांनी आतापर्यंत राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला असून परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले. आढावा बैठकीपूर्वीच २८८ विधानसभा व ४८ लोकसभा मतदारसंघांत पूर्णवेळ विस्तारक नेमले असून त्यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ कमिट्या, प्रत्येक बूथ प्रमुखाबरोबर २५ कार्यकर्त्यांची टीम नेमल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, माजी आमदार राजाभाऊ राऊत, अनिल काळे आदींची उपस्थिती होती.


भाजपच मोठा भाऊ...

राज्यात शिवसेना-भाजपत मोठा भाऊ कोण असे विचारले असता, राजकारणात ज्याच्या जागा, सत्तास्थाने जास्त तो मोठा भाऊ असतो. त्यानुसार भाजपच मोठा भाऊ आहे. आमच्या मित्रपक्षांच्या जागा ठरलेल्या आहेत. युतीची बोलणी अद्याप सुरू झालेली नाही, असे दानवे यांनी सांगितले.
उस्मानाबाद येथे बोलताना खासदार रावसाहेब दानवे.


लातूरच्या खासदारांचे काम उत्तम, त्यांच्या कामावरच इतरांकडून उमेदवारी मागणी
लातूरमधून उमेदवार कोण? या प्रश्नावर त्यांनी भाजपत हा निर्णय एकट्या - दुकट्याचा नसतो तर पार्लमेंटरी बोर्ड यावर निर्णय घेते, असे सांगितले. लातूरमधून अनेकजण भाजपकडून लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता विद्यमान खा. सुनील गायकवाड यांचे काम उत्तम असून इतर प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या कामाच्या बळावरच उमेदवारी मागत असावेत, अशी मिश्कील कोटी केली.


राममंदिर निवडणुकीचा मुद्दा नाही
लातूर येथे बोलताना खा. दानवे म्हणाले की, २०१४ सालापासून राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही. देशात आता विकासाच्या मुद्यावर निवडणुका होत आहेत. जनतेनेही विकासाच्या मुद्यावर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला निवडून दिले आहे. यापुढच्या काळातही विकासाच्या मुद्यावरच निवडणुका होतील. मराठा आरक्षण हा मुद्दा निकालात निघाल्यात जमा आहे. त्यासाठी भाजप सरकारने कायदा केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठ्यांना मागास दर्जा दिला अाहे. पहिल्यांदाच मराठा समाजाच्या मागणीला वैध स्वरूप आले आहे. मराठा - ओबीसी असा वाद विरोधकच उभे करत असून हा प्रकार चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...