आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पाटील यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान नाही - शिंदे, कर्डिले यांची मागणी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपने राज्यातल्या प्रत्येक विभागाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या भाजप मुख्यालयात शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातल्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याची माहिती आहे. दरम्यान, विखे पाटील यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान  होणार नाही, असेही  त्यांनी सुनावले. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे आदी नेते बैठकीला उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांनी  त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा पुत्र सुजय यांना जबाबदार धरले. तसेच त्यांच्यावर करावाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही, असे त्यांनी बैठकीत सुनावले.  राम शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या पराभवाबद्दल आणि राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील यांच्याबद्दल आपण आपले अनुभव पक्षासमोर मांडले आहेत. संघटनमंत्री विजय पुराणिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सर्व सविस्तर अनुभव कथन केले आहे़. आता कारवाईचा निर्णय ते घेतील.  माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की,  जोपर्यंत विखे पाटील पिता पुत्रावर कारवाई होत नाही, तोपर्यंत माझी नाराजी कायम राहील,  असेही ते म्हणाले.  सर्वच पक्षांमध्ये नाराजी असते. आज आम्ही सर्व नेत्यांनी बैठक घेतली आणि आपापली मते मांडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीचे आव्हान आहे. त्याच्याविरोधात लढण्याविषयी चर्चा केली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित नव्हते.  यापूर्वी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी पक्षातील सहकाऱ्यांनी आपल्या पराभवास हातभार लावल्याचा आरोप केला आहे. आता शिवाजी कर्डिले आणि राम शिंदे यांनी तसाच उघडपणे आरोप केला आहे. त्यामुळे भाजपातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.  राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यात  भाजपा मजबूत होईल, अशी फडणवीस यांची अटकळ होती. मात्र ती सपशेल चूक ठरली. उलट विखे पाटील यांच्यामुळे भाजपला जिल्ह्यात मोठा फटका बसला.  भारतीय जनता पार्टीमधील पराभूत उमेदवारांनी आता आपल्या पराभवावर स्पष्टपणे आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्यानंतर आता माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्या पराभवामागे पक्षातीलच नेते आहेत असा आरोप करत थेट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे.राम शिंदे यांनीच याबाबत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आपल्या पराभवाबद्दल आणि राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील यांच्याबद्दल आपण आपले अनुभव पक्षासमोर आणले. संघटनमंत्री विजय पुराणिक  देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनुभव कथन केले असं शिंदे यांनी सांगितले.

संघर्ष नेमका आहे काय?
शिंदे म्हणाले, “आज प्रथमच मी आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांना समोरासमोर आणून चर्चा केली. आज प्रथमच आम्ही समोरासमोर आलो आहोत. पुराणिक माहिती देणारा अहवाल मागवतील आणि पुढील कारवाई करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे.”

‘सर्वच पक्षांमध्ये नाराजी असते’ : विखे पाटील
राम शिंदे यांनी केलेले आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी फेटाळून लावले आहेत. गैरसमजातून शिंदे यांनी टीका केली असावी असं विखे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं. सर्वच पक्षांमध्ये नाराजी असते. आज आम्ही सर्व नेत्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि आपापली मतं मांडली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीचे आव्हान आहे. त्याच्याविरोधात लढण्याविषयी चर्चा केली असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.