आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्षांचे लोक सत्तालोलुप, मग राष्ट्राचा विकास कसा होईल? :शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सर्वच पक्षांचे लोक फक्त सत्तालोलुप झाले आहेत. कोणीही सत्तेवर आला तरी केवळ सत्ता टिकवण्यासाठी काहीही निर्णय घेतो. मग राष्ट्राचा विकास कसा होईल, असा परखड प्रश्न गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी उपस्थित केला. आजकाल अनेकांना प्रक्रिया मान्य नसते. प्रक्रियेविनाच फळ हवे असते. ते फळ त्यांना मिळतेही, पण त्यात प्रक्रियेतून मिळणारा खरा आनंद मिळत नाही. कपाळावर नव्हे, डोळ्यांवर चष्मा ठेवला तरच स्पष्ट दिसते, असेही त्यांनी सांगितले.

 

'दिव्य मराठी'तर्फे २३ ते २५ नोव्हेंबर कालावधीत दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी निश्चलानंद सरस्वती यांचे शहरात आगमन झाले. गुरुवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी त्यांनी तासभर विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला. विविध प्रश्नांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत उत्तरे त्यांनी दिली.

 

मठ-मंदिरांनाही सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न सुरू : भारतात ज्ञानाचे भांडार आहे. तरी आपण बौद्धिक पारतंत्र्यात का आहोत, या प्रश्नावर शंकराचार्य म्हणाले, शासन सनातन वैदिक परंपरा आणि प्राचीन ज्ञान-विज्ञानाचा आदर करते का? सनातन वैदिक आर्यवासीयांनी सांगितले आहे की, अमुक कार्याचे अमुक साधनाने अधिष्ठान, तर त्याचे अमुक फळ मिळते. मात्र, आताच्या लोकांचा सनातन कर्मावर विश्वास नाही. त्यांना मेथड, विद्या आणि प्रोसेस स्वत:ची हवी आहे, पण फळ मात्र वैदिक परंपरेचे हवे. असे कसे शक्य आहे? इंग्रजांनी देशातील शिक्षण पद्धती दिशाहीन केली. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. ब्रिटिशांच्या आधी देश स्वतंत्र होताच. मात्र, त्या वेळी शिक्षण, आरोग्य, ज्ञान, विज्ञान, सेवा, विवाह, न्यायव्यवस्थेतील एक टक्का भागही सेक्युलर नव्हता. पण आता हिंदूंची मठ आणि मंदिरेही सेक्युलर बनवण्याचा घाट घातला जातोय. एक टक्का व्यवस्थाही सनातन, वैदिक प्रकारची राहिलेली नाही. जगातील २०४ पैकी बहुतांशी राष्ट्रे बायबल किंवा कुराणावर चालतात. तेथील धर्मगुरू देशाचे आणि लष्कराचे प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशाने देश चालतो. मग हे भारतात का शक्य नाही? इंग्लंडमध्ये अजूनही व्हिक्टोरिया किंवा एलिझाबेथ राष्ट्राची प्रमुख आहे. तिबेटचे दलाई लामा केवळ बौद्ध धर्मगुरू नसून राष्ट्राचेही प्रमुख आहेत.

 

वेदातील सिद्धांतानेच प्रगती : तरुण पिढी संगणक, मोबाइलच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मागे धावत आहे. एक दिवस संगणक माणसाच्या बुद्धीला मागे टाकेल, असे म्हटले जाते, हे कितपत खरे आहे? यावर शंकराचार्य म्हणाले की, विज्ञान कितीही पुढे गेले तरी वेदांतील सिद्धांत मोडीत निघणारे नाहीत. सनातन धर्माचे पालन, त्यासोबत आधुनिक विद्या यांचा संगम साधला तरच पारलौकिक उत्कर्ष साधता येऊ शकतो. मात्र, या देशात सनातन धर्मसंस्कृतीला शासन मानत नाही. हा इंग्रजांच्या कूटनीतीचाच परिणाम आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या मनात स्वातंत्र्य म्हणजे काय होते, याचा विचार कोणी केलाय का? आजचे शिक्षण, संरक्षण, वाणिज्य, सेवा-उद्योगला आधारही आपला नाही.

 

वेद कोणाला वर्ज्य नाही 

महिलांना वेद शिकता येतात का? या प्रश्नाला उत्तर देताना शंकराचार्य म्हणाले, गार्गी आणि मैत्रेयी कोण होत्या? त्यांना वेदांचे सखोल ज्ञान होते. परंपरागत शास्त्राच्या अधीन राहून जे कोणी वेदांचे अधिष्ठान करते त्याला त्याचे फळ मिळते. वैदिक परंपरेत कोणालाही वर्ज्य केलेले नाही. काही मंत्रांचे उच्चार किंवा वापर यावर विशेष भर दिला गेला आहे. यात स्त्री- पुरुष असा भेद नाही. मात्र, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर उपासना केली तर त्याचे फळ मिळते. मनात विकल्प ठेवून कोणतीही साधना केली तर त्याचे फळ मिळत नाही.

 

आज शंकराचार्यांचे अभ्यासपूर्ण, दिशादर्शक व्याख्यान ऐकण्याची अमूल्य संधी 

देव, धर्म, देश, विज्ञान, राजकारण, अशा अनेक मुद्द्यांवर शंकराचार्यांचे अभ्यासपूर्ण, दिशादर्शक व्याख्यान २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरीत आयोजित दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये हे सर्वांसाठी खुले व्याख्यान होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा.

 

'दिव्य मराठी' लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक :

सकाळी ११ वाजता : वेद आणि विज्ञान या विषयावर स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या व्याख्यानाने उत्सवास प्रारंभ होईल. दुपारी २ ते ३ या वेळेत तंत्र उत्तम कथा आणि पटकथा लिहिण्याचे या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रख्यात लेखक अमोल उदगीरकर, महेशकुमार मुंजाळे सहभागी होतील. त्यांच्याशी प्रख्यात नाट्य दिग्दर्शक पद्मनाभ पाठक संवाद साधतील. 

दुपारी ३.३० वाजता : प्रख्यात इंग्रजी लेखिका डॉ. मंजिरी प्रभू यांच्याशी कॉफी विथ देसी अगाथा ख्रिस्ती या विषयावर विकास सिंग संवाद साधणार आहेत. 

सायंकाळी ५.३० वाजता : मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या पु. ल. देशपांडे लिखित आणि मुकेश माचकर यांनी नाट्य रुपांतरित, मंगेश सातपुते दिग्दर्शित प्रयोगाचे सादरीकरण पार्थ थिएटर्सतर्फे होईल.

 

बशर नवाज सभागृह 

दुपारी २ वाजता : 'ग्रामीण साहित्य वास्तवापासून दूर आहे का?' या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात प्रख्यात साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, आसाराम लोमटे यांचे सहभाग असेल. डॉ. रामचंद्र काळुंखे त्यांची मते जाणून घेणार आहेत. 

दुपारी ३.३० वाजता : वेब मॅगेझीन : अ केस फॉर द क्युरिअस रिडर्स या विषयावर प्रख्यात लेखक देवांशी जैन, निर्भय कनोरिया यांच्याशी प्रा. डॉ. मुस्तजीब खान संवाद साधतील. हेच मान्यवर लेखक संवादानंतर रायटिंग अँड पिचिंग फॉर मॅगझीन या विषयावरही मते मांडतील. 

सायंकाळी ५.३० वाजता: दलित साहित्याचे भविष्य या विषयावर प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. डॉ. प्रकाश कुंभार बोलणार आहेत. त्याचे सूत्रसंचालन कैलास अंभुरे करणार आहेत. 

 

डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह 
दुपारी २ वाजता : प्रा. शेषराव मोरे यांचे १८५७ चा उठाव या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

दुपारी ३.३० ते ४.३० वेळेत : अनुवादाची कला या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात प्रख्यात लेखिका, अनुवादक डॉ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी, प्रा. डॉ. छाया महाजन यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधणार आहेत. 

सायंकाळी ५.३० वाजता : मुशायरा होईल. त्यात चंद्रशेखर सानेकर, डॉ. इक्बाल मिन्ने, वैभव देशमुख, केतन पटवर्धन, कमर एजाज, गणेश घुले यांचा सहभाग असेल. संचालन महेश अचिंतलवार करतील. 

 

नोटबंदी चांगली की वाईट तुम्हीच ठरवा 
नोटबंदी चांगली की वाईट? या प्रश्नावर अतिशय मुत्सद्दी उत्तर देताना शंकराचार्य म्हणाले, पंतप्रधान म्हणाले होते की एका परिवारालाच नोटबंदीचा त्रास होतोय. एका रात्रीतून नोटबंदी जाहीर करून मोदींनी अतिघाईचा परिचय दिला. त्यामुळे ८४ लोकांचा रांगेत उभा राहून मृत्यू झाला. पण गीतेच्या १८ व्या अध्यायात तीन प्रकारचे दृष्टांत सांगितले आहेत. पहिल्या प्रकारात आधी कष्ट, नंतर सुख मिळते. दुसऱ्या प्रकारात आधी सुख, नंतर कष्ट मिळतात, तर तिसऱ्या प्रकारात सुरुवात, मध्य आणि अंत मोहक असतो. आता नोटबंदी कुठल्या प्रकारात मोडते हे तुम्हीच ठरवा. 

 

झाडे जगवा, नव्या जलस्रोतांचा शोध घ्या 
मराठवाड्यात कायम दुष्काळ पडतो. यावर तुमच्याकडे काही उपाय आहे काय? या प्रश्नावर ते म्हणाले, नवीन जलस्रोतांचा शोध घेतला पाहिजे. जंगले, नद्या, समुद्राचे संरक्षण करणे गरजेचे आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. ४ वर्षे हे काम का सुरू झाले नाही, या प्रश्नावर शंकराचार्य म्हणाले, सनातन वैदिक पद्धतीने जे संत झाले ते या वादात कधीही पडत नाहीत. आम्ही कधी टीव्हीवर येत नाही. आम्ही राम मंदिरासाठी सदैव आग्रही आहोत. 

 

संतांचा सरकारसोबत समन्वय बिघडला तर तुरुंगवारी!
भारत एकीकडे विश्वगुरू होण्याचे भाषा करतोय, तर दुसरीकडे विश्वगुरू होण्याचे सामर्थ्य असणारे संत महंत तुरुंगात डांबले जातायेत. यावर शंकराचार्य म्हणाले, ज्या संतांना सरकारसोबत समन्वय साधण्याची कला जमली ते कधीही तुरुंगात गेले नाहीत. सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे सत्यसाईबाबांच्या दर्शनाला गेले होतेच की? त्यांनी कधीही समन्वय बिघडू दिला नाही. या उलट चंद्रास्वामी किंवा कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य असो, यांचा सरकारशी समन्वय बिघडला आणि तुरुंगात जावे लागले.

 

आज ‘वेद अाणि विज्ञान’ विषयावर व्याख्यान 
‘दिव्य मराठी’च्या वतीने २३ ते २५ सप्टेंबर कालावधीत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २३ रोजी सकाळी ११.३० वाजता शंकराचार्यांचे ‘वेद आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यासाठी ते औरंगाबादेत आले  आहेत. त्यांनी गुरुवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला.

 

बातम्या आणखी आहेत...