आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित नव्हे ही ‘किंचित’ आघाडी; तिसऱ्या आघाडीला स्कोप नाही; प्रकाश आंबेडकरांच्या प्रयोगाची रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 
प्रश्न :  वंचित आघाडीची क्रेझ वाढतेय. तुमचं काय मतं?
उत्तर : मी २००९ च्या विधानसभेला डाव्या, आंबेडकरी व समाजवादी पक्षांना घेऊन ‘रिडालोस’चा प्रयोग केला होता. प्रतिसाद नाही मिळाला. महाराष्ट्राच्या जनतेला तिसरी आघाडी मान्य नाही, असा माझा अनुभव आहे. वंचित आघाडीचा या निवडणुकीत काही परिणाम नसेल. त्यामुळे मी तिला ‘किंचित आघाडी’ म्हणतो.

 

प्रश्न : बहुजन वंचित आघाडीच्या सभा मोठ्या होतायत?
उत्तर : ‘रिडालोस’च्या सभाही मोठ्या व्हायच्या. राज ठाकरेंच्या सुद्धा मोठ्या होतात. पण त्याचे मतांत परिवर्तन होत नाही. तिसऱ्या आघाडीला सत्ता मिळवण्याइतपत स्कोप नाही. म्हणून मी भाजपत आलो. वंचित आघाडीच्या मतांच्या विभागणीचा लाभ महायुतीलाच होईल.

 

प्रश्न : युतीने रिपाइंला जागा न सोडल्याने नाराज आहात?
उत्तर : होतो. राजकारणात सर्व दिवस सारखे नसतात. कधी कधी थांबावं लागतं. कुठे थांबायचे ज्याला कळते, त्याला उद्या संधी असते. नाराज होऊन जायचं कुठं? काँग्रेस-राष्ट्रवादीतून इकडं आलोय. एक संधी गेली तर त्याची कसर दुसरीकडं भरून काढायची माझी पद्धत आहे.

 

प्रश्न : शिर्डीत विखेपाटलांनी तुमचा पराभव केला होता. आता नगरमध्ये रिपाइं कार्यकर्ते त्याचे उट्टे काढणार का?
उत्तर : असं काही नाही. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, ‘तुम्हाला आहे शिवाजी महाराज अन् बाबासाहेबांची आन, निवडून द्या कमळ अन् धनुष्य बाण’. मी २००९ मध्ये शिर्डीत पराभूत झालो. या वेळी उलटी स्थिती आहे. मी सुजय विखेंसोबत आहे. रिपाइंच्या कार्यकर्त्यांना तसं बजावलं आहे.

 

प्रश्न : कोरेगाव भीमा प्रकरणी भूमिका घेतली नाही, असा तुमच्यावर आरोप आहे?
उत्तर : मी कोरेगाव भीमा जयस्तंभाला गेली ३५ वर्षे जातोय. या वेळी हिंसाचार झाला, तरी राज्यात दलित-सवर्ण संघर्ष झाला नाही. बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला. पण, मी केंद्रात मंत्री आहे. कसं आंदोलन करणार? मी बंदमध्ये कार्यकर्त्यांना पाठवलं. बंद काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यातील ८०% कार्यकर्ते रिपाइंचे आहेत.

 

प्रश्न : केंद्रात मंत्री होऊन समाजासाठी काय केले?
उत्तर : ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. अडीच कोटी दिव्यांगांसाठी शिक्षण व नोकऱ्यातील आरक्षण एका टक्क्याने वाढवलं. भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाची वर्गवारीचा निर्णय घेतला. माझ्या खात्याचे ५६ कोटींचे बजेट ७८ हजार कोटींवर नेले.

 

प्रश्न : तुमच्या मागे इतके कार्यकर्ते कसे? 
उत्तर : मी २४ तास कार्यकर्त्यांना उपलब्ध असतो. प्रत्येकाचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्त्यांवर कधीच चिडत नाही. घरच्यांवर चिडतो. मला स्टाइल आवडते. मला रंगांचाही सेन्स आहे. माझे कपडे वेगळे वाटत असले तरी ते मी एक ‘पँथर’ असल्याची निशाणी आहे.

 

प्रश्न : कविता तयार करता की ऐनवेळी सुचतात?
उत्तर : तसा मी गंभीर माणूस आहे. पण, कवी आहे. वडाळ्यातील सिद्धार्थ हाॅस्टेलचा तो वारसा आहे. सभांत कुणाला गंभीर ऐकायचं नसतं. त्यामुळं यमकं जुळवतो.

बातम्या आणखी आहेत...