रामदास आठवलेंचे पुन्हा ऐक्याचे पालुपद; अॅड. आंबेडकरांना नेतृत्व घेण्याचे आवाहन, स्वत: दुय्यम स्थानी राहण्यास तयार

दिव्य मराठी

Apr 15,2019 10:11:00 AM IST


मुंबई - रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुन्हा रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली. ऐक्य होणार असेल तर आपण केंद्रीय मंत्रिपद सोडण्यास तयार आहोत. शिवाय, त्याचे नेतृत्व अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केले तर त्यांना माझा पाठिंबा राहील, असे आठवले यांनी जाहीरही करून टाकले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त आठवले यांनी रविवारी दुपारी चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना वंदन केले. त्यानंतर वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.


या वेळी आठवले म्हणाले, रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर नेतृत्वाच्या वादात मी पडणार नाही. रिपब्लिकन ऐक्याचे प्रमुख कुणालाही करावे; दुय्यम स्थान स्वीकारण्याची माझी तयारी आहे. सर्व रिपाइं गट एकत्र येऊन ऐक्य झाल्यास त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी केले तर त्यास माझा पाठिंबा राहील. आम्ही एकत्र आलो तर रिपब्लिकन ऐक्याची ताकद वाढेल. राजकीयदृष्ट्या समाजाचे महत्त्व वाढेल. त्यामुळे ऐक्यासाठी मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. मात्र माझे मंत्रिपद घालवण्यापेक्षा मंत्रिपदांची संख्या वाढवण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करायला हवे,’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. शिवशक्ती व भीमशक्तीचा निर्णय आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांचा सल्ला घेऊन घेतला होता, असे सांगत काँग्रेसचे माजी खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर हे वाजपेयी सरकारच्या काळात नियोजन आयोगावर सदस्य होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.


आठवले उवाच....
> देशात मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होऊन एनडीएचे सरकार स्थापन होईल.
> महाराष्ट्रात महायुती लोकसभेच्या ४० पेक्षा अधिक जागा जिंकेल, तर देशात एनडीए ३५० जागा जिंकेल.

> वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि आठवलेंचे विरोधक मानले जाणारे अॅड. आंबेडकरांनी ‘ऐक्याचा पोपट मेलाय’ असे पूर्वीच जाहीर केले. तरीसुद्धा आठवले हे पुन:पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचा विषय मांडून आवाहन करत आहेत.

X