Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Ramdas Athawale share his memory about Nomination of Marathwada University

नामांतराचा यशस्वी लढा म्हणजे परिवर्तन चळवळीचा प्रेरणास्रोतच: रामदास आठवले 

प्रतिनिधी | Update - Jan 14, 2019, 11:04 AM IST

१४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला महामानवाचे नाव देण्यात आले होते. 

 • Ramdas Athawale share his memory about Nomination of Marathwada University

  औरंगाबाद- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे या मागणीसाठी नामांतर लढा उभारला गेला. १७ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अनेक शहिदांच्या बलिदानामुळे आंबेडकरी जनतेने हा लढा जिंकला. १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला महामानवाचे नाव देण्यात आले.

  तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी राजकीय रिस्क घेऊन नामांतर केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा यंदा २५ वा वर्धापनदिन आहे. नामांतराचा हा रौप्यमहोत्सव देशभर आंबेडकरी जनता साजरी करेल. देशभरातून लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनी औरंगाबादला येतील. नामांतराच्या आंदोलनाचा लढा आंबेडकरी जनतेने तब्बल १७ वर्षे लढलेला असून हा लढा पुढील पिढ्यानपिढ्या परिवर्तनवादी चळवळीला प्रेरणास्रोत ठरणार आहे.

  नामांतराच्या लढ्याचे सिंहावलोकन केले तर १९७८ पर्यंतच्या आठवणींचा काळ आठवतो. मराठवाड्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगोत्री निर्माण केली. मराठवाड्यात शिक्षणप्रसार कार्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान प्रचंड होते. संपूर्ण देशात आणि जगात समतेच्या चळवळीचे युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान सर्वश्रेष्ठ असल्याने त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे ही लोकभावना होती. नामांतराची ही मागणी पुढे आल्यानंतर त्याकाळात जातीभेद पाळणाऱ्या सनातनी विचारांच्या लोकांनी मोठा विरोध केला. त्यातून नामांतरासाठी प्रदीर्घ काळ आंबेडकरी जनतेने लढा लढला. या लढ्यात परिवर्तनाच्या समतेच्या लढ्याला साथ देणारे समविचारी आमच्या सोबत आंदोलनात येत होते. आम्ही अनेक आंदोलन, मोर्चे नामांतरासाठी काढले. नामांतराच्या लढ्यात भारतीय दलित पँथर अग्रणी होती. नामांतराच्या लढ्यात लाखो भीमसैनिकांनी लाठीमार खाल्ला. तुरुंगवास भोगला.

  दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी नामांतर आंदोलनात तुरुंगवासही भोगला होता. नामांतराच्या लढ्यात मराठवाड्यात दंगली होत होत्या. अनेक गावांत दलितांच्या वस्ती जाळण्यात आल्या होत्या. अनेक भीमसैनिक शहिद झाले. शहिद पोचिराम कांबळे, चंदर कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे आदी अनेक ज्ञात अज्ञात शहिदांच्या बलिदानातून नामांतर झाले. १९७८ च्या वर्षात दंगली झाल्या. त्याकाळात शिवसेना हा पक्ष मुंबई पुरता सीमित होता. शिवसेनेचे संघटन मराठवाड्यात आले नव्हते. त्याकाळात मराठवाड्यात नामांतर विरोधक आणि नामांतरवादी असे दोन गट पडले होते. आपले प्राणप्रिय मुक्तीदाते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील श्रद्धेपोटी आंबेडकरी जनतेने नामांतराचा लढा प्राणपणाने लढला. तब्बल १७ वर्षे हा लढा लढला गेला. जगाच्या पाठीवर असा प्रदीर्घ लढा लढल्याचे उदाहरण हे एकमात्र असेल. नामांतराचा लढा हा सदैव परिवर्तनाच्या चळवळीला प्रेरणादायी ठरला आहे.

  रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
  नामांतर झाले नाही तर मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असा पवित्रा घेणारे रामदास आठवले यांनी या लढ्याविषयी त्यांनी ते सांगितले. या लढ्यात परिवर्तनाच्या समतेच्या लढ्याला साथ देणारे समविचारी आमच्या सोबत आंदोलनात येत होते. अनेक आंदोलन ;मोर्चे नामांतरासाठी आम्ही काढले. नामांतराच्या लढ्यात भारतीय दलित पँथर अग्रणी होती.

Trending