आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाेच्च न्यायालय आणि फली नरिमन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या राज्यघटनेने न्यायालयाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असून राज्यघटनेच्या रक्षणाची जबाबदारी पूर्णपणे न्यायालयावर टाकलेली आहे. तिथे जाणारे न्यायाधीश भयापासून आणि कृपेपासून दूर असले पाहिजेत. न्यायालये राजकारणापासून दूर असली पाहिजेत. तरच आपल्या लोकशाहीचे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या अधिकाराचे, जीविताचे, संपत्तीचे, रक्षण होऊ शकेल. नरिमन यांची सर्व हयात न्यायालयात गेलेली आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात- परमेश्वरा, आमच्या सर्वोच्च न्यायालयाचे रक्षण कर तेव्हा हा विषय सहज घेण्यासारखा नसतो. 

 

सामान्यतः कायदेपंडितांची पुस्तके वाचनाच्या भानगडीत सर्वसाधारण माणूस पडत नाही. एक तर कायद्याची भाषा किचकट व शब्दांचे अर्थ समजायला प्रचंड वेळ लागतो. असे असले तरीही कायदा, राज्यघटना, राजकारण यावर खुसखुशीत शैलीत सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहिणाऱ्या लेखकांत फली नरिमन यांचे नाव घ्यायला पाहिजे. त्यांचे ‘बीफोर मेमरी फेड्स’, ‘स्टेट ऑफ अ नेशन’ आणि आताच प्रकाशित झालेले ‘गॉड सेव्ह द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट’ ही पुस्तके अत्यंत वाचनीय व ज्ञानात प्रचंड भर घालणारी आहेत.

 

या लेखात त्यांचे तिसरे पुस्तक ‘गॉड सेव्ह द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट’ यातील आताच्या परिस्थितीला लागू होणाऱ्या निवडक भागावर लेखाच्या मर्यादेत लिहायचे आहे. या वर्षाच्या १२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगाेई, न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यशैलीबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. या घटनेचे वर्णन यापूर्वी कधीही न झालेली, जगातही कुठेही न झालेली घटना म्हणून केले गेले. नरिमन यांच्या पुस्तकाचे शीर्षक ‘गॉड सेव्ह द...’ परमेश्वराने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे रक्षण करावे, अशा अर्थाचे आहे.

 

नरिमन यांनी न्यायालयाचा अवमान न्यायालयच कसे करत चालले आहे याचे आणखी एक उदाहरण दिले. हायकोर्टाच्या एका न्यायमूर्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शिक्षा ठोठावली. नरिमन म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाचा हा व्यवहार काळजी करावा असा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये परस्पर स्नेह आणि भातृभाव यांचा अभाव जाणवल्याशिवाय राहत नाही.  


याबद्दल नरिमन यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रथेचे उदाहरण दिले आहे. आपापल्या आसनावर बसण्यापूर्वी मार्शल एका परिच्छेदाचे वाचन करतो. मूळ इंग्रजीचा भावार्थ असा आहे - युनायटेड स्टेट ऑफ सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांचे सहकारी यांच्यापुढे कामकाजाचे विषय मांडण्यात आलेले आहेत. त्यांना असा सल्ला दिला जातो की, या कामाकडे त्यांनी जागरूकतेने लक्ष द्यावे, न्यायालयाचे कामकाज सुरू होत आहे. युनायटेड स्टेटचे परमेश्वर रक्षण करो आणि त्याचप्रमाणे या सन्माननीय कोर्टाचेही रक्षण करो.

 

नरिमन यांनी त्यात थोडा बदल करून म्हटले,‘गॉड सेव्ह द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट’.  
आपल्या राज्यघटनेने न्यायालयाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असून राज्यघटनेच्या रक्षणाची जबाबदारी पूर्णपणे न्यायालयावर टाकलेली आहे. तिथे जाणारे न्यायाधीश भयापासून आणि कृपेपासून दूर असले पाहिजेत. न्यायालये राजकारणापासून दूर असली पाहिजेत. तरच आपल्या लोकशाहीचे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या अधिकाराचे, जीविताचे, संपत्तीचे, रक्षण होऊ शकेल. नरिमन यांची सर्व हयात न्यायालयात गेलेली आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की, परमेश्वरा, आमच्या सर्वोच्च न्यायालयाचे रक्षण कर तेव्हा हा विषय सहज घेण्यासारखा नसतो. नरिमन यांनी अत्यंत स्वच्छ शब्दात आपले मत मांडले आहे की, एक तर आपापसात बसून प्रश्न सोडवायला पाहिजे होते, नाही तर राजीनामा द्यायला पाहिजे होता.

 

पृष्ठ ९७ वर त्यांनी आपले जे मत मांडले आहे त्याचा भावार्थ असा आहे, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सल्ला देण्याचे धाडस मी करू शकत नाही, परंतु न मागितलेली माझी सूचना -पहिल्या पाच (पत्रकार परिषद घेतलेल्या) आणि उरलेल्या पाच जणांना अशी आहे की, कृपा करून लक्षात ठेवा, बालेकिल्ला बाहेरून कोसळत नाही, तो आतूनच कोसळतो.’ 
नरिमन यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘कायदेतज्ज्ञ आणि कायदा बनवणारे.’ कायदेतज्ज्ञांना आपण वकील म्हणतो आणि कायदा बनवणाऱ्यांना खासदार म्हणतो. हे दोघेही जण लोकांच्या दृष्टीने विशेष आदरास पात्र आहेत असे नाही, हे मत आहे फली नरिमन यांचे. वकील मंडळी केस दीर्घकाळ कशी चालेल हे पाहतात आणि संसदेत खासदार काय करतात हे आपण दूरदर्शनवर बघतो. वकील की खासदार यातील कोण, लोकांच्या वाईट मतास कारणीभूत आहेत, यांच्यात जणू स्पर्धा चालू आहे. नरिमन स्वतः राज्यसभेचे सभासद होते. प्रत्येक खासदाराला कोणत्या आणि कशा प्रकारच्या सवलती मिळतात हे त्यांनी सांगितले. तो खासदार झाला की त्याला शपथ घ्यावी लागते.

 

‘मी प्रामाणिकपणे माझ्या कर्तव्याचे पालन करीन,’ असे एक वाक्य त्यात असते. पण ते प्रामाणिकपणे त्यांचे कर्तव्य पार पाडतात का? त्यांचे मुख्य काम सभागृहात बसणे, वेगवेगळ्या बिलांवर चर्चा करणे, कायदे पास करणे हे आहे, हे काम ते किती करतात? नरिमन यांनी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 


खासदारांसाठी त्यांनी काही सूचना केल्या आहेत. लोकसभेत आपले आसन सोडून सभापतीपुढे गर्दी करू नये. दुसरी गोष्ट त्यांनी केली पाहिजे, ती म्हणजे सभात्याग शांतपणे केला पाहिजे आणि दहा-पंधरा मिनिटानंतर पुन्हा सभागृहात येऊन बसले पाहिजे. सभागृहाच्या कामकाजात त्याने भाग घेतला पाहिजे, ज्यासाठी लोक त्यांना निवडून देतात आणि पगारही त्यांना दिला जातो. खासदाराला पेन्शन मिळते, त्यांना मोफत आरोग्यसुविधा पुरवल्या जातात त्या एवढ्याचसाठी की त्यांनी राज्याची सेवा करावी. लोकसभेतील कामाचे हे नैतिक मूल्य आहे.’ भारतीय राज्यघटनेप्रमाणे सर्व समान असले तरी काही जण इतरांपेक्षा अधिक समान असतात - उदा - विद्यमान खासदार’ असे नोंदवून फली नरिमन म्हणतात, ‘प्रत्येक खासदाराच्या मनात ही जाणीव सदैव असली पाहिजे आणि ती निर्माण झाल्यानंतर सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा आनंद तो घेऊ शकतो.’ हा आनंद कशा प्रकारचा असतो हे एका उदाहरणाने त्यांनी सांगितले.

 

पाचव्या लोकसभेत पिलू मोदी आणि इंदिरा गांधी लोकसभेच्या सभासद होत्या. त्या दोघांत अनेक वेळा वादविवाद होत. पण दोघांनीही कधी आपला संयम ढळू दिला नाही. एकदा पार्लमेंटरी नोट पेपरवर पिलू मोदी यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिले, एका ठरावावर त्यांनी आपली नाराजी प्रकट केली होती. पत्राची सुरुवात त्यांनी, ‘Dear I G’ अशी केली आणि खाली सही केली PM (याचा अर्थ पंतप्रधान आणि पिलू मोदी असाही होतो) इंदिरा गांधींनी लगेचच शांतपणे उत्तर पाठवले, ‘पत्राची सुरुवात, ‘Dear P. M.’ आणि शेवट केला ‘I G’ सभागृहात असे खेळीमेळीचे वातावरण हवे. सभागृहाचे मुख्य काम पक्षीय राजकारण करण्याचे नसून देशासाठी आवश्यक ते कायदे करण्याचे आहे आणि त्याच्यावर उलटसुलट चर्चा सर्वांच्या हिताची असते, फली नरिमन यांना हे सुचवायचे आहे.  


पुस्तकात वाजपेयी आणि के. नटवरसिंग (माजी परराष्ट्रमंत्री) यांच्यातील प्रश्नोत्तराचा किस्साही दिला आहे. वाजपेयी विदेश दौऱ्यातून आले होते. ते खासदारांना प्रवासाचा वृत्तांत सांगत होते. नटवरसिंगांनी त्यांना सहा प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नात त्यांचा आवाज चढत गेला आणि शेवटच्या प्रश्नात रागाचा पारा वरच्या पट्टीत गेला. वाजपेयी यांनी त्यांना अतिशय शांतपणे उत्तर दिले, ‘नटवरसिंग बुद्धिमान आहेत, ते श्रेष्ठ संसदपटू आहेत, त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे.’ एवढी स्तुती करून अटलजी पुढे म्हणाले, ‘लेकिन उनको गुस्सा बहोत जल्दी आता है’ आणि त्यानंतर हास्याचा स्फोट झाला. नटवरसिंगांचे प्रश्न त्यात विरून गेले. नरिमन लिहितात की, आपल्या विरोधकांनाही त्यांची स्तुती करून कसे शांत करायचे याचा पाठच जणू अटलजींनी दिला.अशी पुस्तके आवर्जून वाचली पाहिजेत. कारण ती पक्षीय दृष्टिकोनातून लिहिलेली नसतात, तर त्यातील तटस्थता मनाला मोहून टाकणारी असते.  

 

रमेश पतंगे ज्येष्ठ पत्रकार

 

 

बातम्या आणखी आहेत...