आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमामुळे मार्ग सापडला... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमेश पाटील  

मधुरिमाच्या नवरात्र विशेषांकात स्त्रीविषयक कायदे,  त्यांच्या आधाराने यशस्वी लढा देणाऱ्या स्त्रियांच्या कथा प्रकाशित झाल्या होत्या. त्यास वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मधुरिमातील लेखाच्या आधारे आपल्या नातीचं जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिशा सापडल्याचं कळवणाऱ्या लढवय्या आजोबांचं हे हृद्य मनोगत...
 


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला गावात मी शेती करतो. सहा वर्षांपूर्वी माझ्या मुलीचा तिच्या पतीने छळ सुरू केला. बराच जाच आणि कायदेशीर लढाई दिल्यावर अखेरीस तिला न्यायालयातून घटस्फोट मिळाला. तो लढा कठीण हाेता. त्या वेळी तिच्या पदरात तीन वर्षांची लेक होती. तेव्हापासून त्या दोघी आमच्याकडे राहत आहेत. सध्या माझे वय ७० वर्षे आहे. आपल्या पश्चात आपली लेक आणि नात यांचे कसे होणार या काळजीने अाम्हाला झाेप नाही. लेकीचे आयुष्य तर या कौटुंबिक कलहामुळे उद्ध्वस्त झाले, मात्र नातीचे भविष्य तरी शिक्षण आणि नोकरी याद्वारे सुरक्षित व्हावे ही एकमेव इच्छा. मात्र, घटस्फोटातील कटुतेमुळे आमच्या जावयाने नातीचे कोणतेच दाखले किंवा कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे तिचे जात प्रमाणपत्र काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. प्रांत कार्यालयात खेटे मारून मी त्रस्त झालो होतो. अशा वेळी आईच्या जातीचा दाखला मिळू शकतो याबाबतचा लेख ‘मधुरिमा'मध्ये मी वाचला आणि ताे अंक घेऊनच मी थेट प्रांत कार्यालय गाठले. संबंधित कर्मचाऱ्यांना तो दाखवला. ते म्हणाले, लेखाच्या आधारावर दाखला देता येणार नाही, त्यात नमूद केलेल्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली तर काहीतरी करता येईल. त्यावर मी ‘दिव्य मराठी’चे  कार्यालय आणि त्या लेखात नमूद केलेले निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांच्याशी संपर्क करून नागपूर खंडपीठाच्या आदेशाची प्रत मिळविली. माझ्या मुलीच्या अर्जासोबत ती जोडली आणि आम्हाला तिच्या जातीच्या आधारे लेकीचा जातीचा दाखला मिळाला. वर्तमानपत्रातील एखादा लेख किंवा एखादी बातमी एखाद्याच्या आयुष्यात किती आधार ठरते याचा प्रत्यय आम्ही घेतला. गेली अनेक वर्षे सरकारी कार्यालयात अर्ज-विनंत्या करून, खेटे मारून आम्हाला नातीच्या जातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते. परंतु, ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून योग्य तो मार्ग सापडला आणि आमचा प्रश्न सुटला. आम्ही ‘दिव्य मराठी’चे, मधुरिमा टीमचे आणि निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांचे विशेष आभार मानतो. तसेच, घटस्फोट किंवा परित्यक्ता यामुळे एकाकी संघर्ष करणाऱ्या महिलांना त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे मुलांचे जात प्रमाणपत्र मिळावे. यातील अडचणी दूर व्हाव्यात ही शुभेच्छा.

लेखकाचा संपर्क : ९४२३९०३९८०

बातम्या आणखी आहेत...