आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या रामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा थाटामाटात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मानसिक शांततेच्या शोधात असलेल्यांना आध्यात्मिक अनुभूती मिळवून देणाऱ्या रामकृष्ण ध्यान मंदिराचे शनिवारी (१७ नोव्हेंबर) हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. ९ वर्षांपूर्वी या मंदिराची पायाभरणी झाली होती. 

 

बीड बायपास येथील या मंदिराच्या लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवारी (१७ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजेपासून सुरुवात झाली. ६.३५ वाजता संन्याशांच्या चमूने श्रीरामकृष्ण देव यांचा महिमा विशद करणाऱ्या भजनांची सुरुवात करताच वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले. 'रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् शरणम्' या भजनाच्या तालावर ८ वर्षे ते ९० वर्षे वयोगटातील आबालवृद्ध भक्तांनी टाळ्यांनी ताल धरला होता. भजनात तल्लीन झालेल्या अनेक ज्येष्ठ महिला-पुरुषांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. 


सकाळी ७.१३ वाजता श्रीरामकृष्णांच्या प्रतिमेचे जुन्या देवघरातून नवीन मंदिराकडे प्रस्थान झाले. बेलूर (कोलकाता) येथील मठाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष स्वामी वागीशानंद, स्वामी गौतमानंद आणि स्वामी शिवमयानंद यांनी हातात अनुक्रमे श्रीरामकृष्ण, सारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा घेतल्या होत्या. समोर आणि मागे भगव्या कपड्यांतील काही संन्यासी तसेच पांढऱ्या वेशातील भक्त हार्मोनियम, टाळ-मृदंगाच्या तालावर भजने गात होते. स्वामी विष्णुपादानंद चवऱ्या ढाळत होते. तीन परिक्रमांनंतर ७.३० वाजता श्रीरामकृष्ण देव, सारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांनी नवीन मंदिरात प्रवेश केला. स्वामी वागीशानंद यांच्या हस्ते सार्वजनीन (युनिव्हर्सल) मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि गेल्या ९ वर्षांपासून स्वामी विष्णुपादानंद, त्यांचे सहकारी आणि औरंगाबादमधील असंख्य भक्तांनी पाहिलेले नवीन मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले. सकाळी ८ वाजता मंदिर भक्तांसाठी खुले झाले. ते पाहून जगभरातून आलेल्या भक्तांच्या मनात आत्यंतिक श्रद्धा, समाधानाची भावना दिसत होती. अनेकांनी परस्परांना मिठाई भरवून हा आनंदसोहळा साजरा केला. 


सकाळी १० ते दुपारी १.३० अशी सुमारे साडेतीन तास उद््घाटनानिमित्त आयोजित सार्वजनिक सभा पार पडली. विषय होता 'श्रीरामकृष्ण आणि त्यांचा सार्वजनीन (युनिव्हर्सल) संदेश.' स्वामी वागीशानंद अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर स्वामी गौतमानंद, स्वामी शिवमयानंद, स्वामी विष्णुपादानंद, स्वामी योगात्मानंद, स्वामी बलभद्रानंद, औरंगाबाद शहराचे प्रथम नागरिक-महापौर नंदकुमार घोडेले आणि बारवाले समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बारवाले हजर होते. व्यासपीठासमोर औरंगाबादसह मराठवाडा आणि संपूर्ण राज्यभरातील विविध धर्मांचे संत-महंत विराजमान होते. 


धार्मिक सद््भावनेचे प्रतीक 
स्वामी वागीशानंद, स्वामी गौतमानंद आणि स्वामी शिवमयानंद यांची आशीर्वचनपर भाषणे झाली. स्वामी वागीशानंद म्हणाले, 'हे मंदिर सर्व धर्मांतील सद््भावनेचे प्रतीक ठरणार आहे. औरंगाबादच्या धार्मिक इतिहासात आज नवीन सूर्योदय झाला आहे.' स्वामी शिवमयानंद म्हणाले, 'औरंगाबाद येथील अनेक भक्तांच्या मनात बेलूरच्या मठात जाऊन दर्शन घेण्याची आस होती. अनेकांची ती इच्छा विविध कारणांमुळे पूर्ण होऊ शकली नाही. आता साक्षात श्रीरामकृष्णच या मंदिरात राहतील आणि सर्वांना आशीर्वाद देतील.' स्वामी योगात्मानंद यांनी 'सब के लिए खुला है, मंदिर यह हमारा' अशी भावना व्यक्त केली. अमेरिकेहून खास या कार्यक्रमासाठी आलेले स्वामी योगात्मानंद म्हणाले, 'आपले शरीर हेच मंदिर आहे. येथे ध्यानस्थ बसल्यानंतर प्रत्येकाला अंतर्मुख होण्याची प्रेरणा मिळेल.' मंदिरात येताना अशुद्धतेचा त्याग करावा, असे आवाहन स्वामी बलभद्रानंद यांनी केले. त्यानंतर स्वामी पीतांबरानंद यांचे भाषण झाले. राजेंद्र बारवाले यांनी आभार मानले. 


स्वामी गिरिशानंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुपारच्या सत्राचा विषय 'श्री सारदादेवी आणि त्यांचे सार्वजनीन संदेश' असा होता. स्वामी सुमनसानंद, स्वामी सर्वभुतानंद, स्वामी विमलात्मानंद, स्वामी मुक्तिदानंद, स्वामी ध्रुवेशानंद, स्वामी गिरिशानंद यांनी मते मांडली. ५.४५ ते ६.३० या काळात संध्याआरती झाली. सायंकाळी ६.३० ते ९ पर्यंत 'महाराष्ट्राची भक्तिपरंपरा' या विषयावर आधारित हिंदी भाषेतील संगीत नाटक सादर झाले. 
आध्यात्मिक सोहळा  देश-विदेशातील ३०० पेक्षा अधिक साधूंची उपस्थिती, स्वामी वागीशानंद म्हणाले : हे मंदिर सर्वधर्मीयांच्या सद््भावनेचे प्रतीक अन् ऐतिहासिकही 
स्वामी वागीशानंद, स्वामी गौतमानंद आणि स्वामी शिवमयानंद, स्वामी विष्णुपादानंद यांच्या हस्ते रामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. छाया : रवी खंडाळकर 
Á३०० वर संन्यासी संपूर्ण भारतभरातून या सोहळ्यासाठी आले. त्यात नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिका येथील संन्याशांचा समावेश. 


४००० : एकूण गृहस्थाश्रमी भक्तांची उपस्थिती 
३००० : औरंगाबाद शहराबाहेरचे(निवासी) गृहस्थाश्रमी भक्त. 
'श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचे शहर' अशी होईल नवीन ओळख : महापौर घोडेले 
महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'आता 'श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचे शहर' अशी या शहराची नवीन ओळख होईल.' स्वामी विष्णुपादानंद यांना उद्देशून घोडेले म्हणाले, 'सध्या संपूर्ण देशाचे लक्ष अयोध्येत श्रीरामांचे मंदिर केव्हा होते याकडे लागले आहे. अनेक अडचणी येऊनही स्वामी विष्णुपादानंद यांनी फक्त ९ वर्षांत हे अप्रतिम मंदिर साकारले आहे. स्वामींकडे अयोध्येतील मंदिराची जबाबदारी असती तर तेही आतापर्यंत प्रत्यक्षात आले असते. औरंगाबाद स्मार्ट सिटी होत आहे. देशाला अच्छे दिन आले की नाही हे सांगता येणार नाही, पण या मंदिरामुळे शहराला मात्र अच्छे दिन आले आहेत, असे आपण म्हणू शकतो.' 
१००० : निवासी/अनिवासी (औरंगाबादचे) गृहस्थाश्रमी भक्त. 
०७ : बेलूर येथील सारदादेवी मठातील माताजी. 


भक्तांनी भक्तांसाठी उभारलेले मंदिर, मी फक्त निमित्तमात्र : विष्णुपादानंद 
स्वामी विष्णुपादानंद यांनी स्वागतपर भाषणात या मंदिराच्या उभारणीशी संबंधित सर्व घटनांना उजाळा दिला. ते म्हणाले की, 'सुरुवातीला मंदिरासाठी २० लाख रुपये लागतील असा अंदाज होता. एवढ्या रकमेची जुळवाजुळव शक्य होईल असे दृष्टिपथात न दिसल्याने मंदिर १५ वर्षे तरी होणार नाही, असे मी बेलूर मठाला कळवले. पण साक्षात श्रीरामकृष्ण देव यांच्या काहीतरी वेगळेच असावे. त्यांनीच बहुधा मी १०-२० लाखांच्या मंदिरात राहणार नाही, असे ठरवले असावे आणि त्यातूनच हे भव्य मंदिर साकारले. साक्षात ठाकूरजींच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. मी फक्त निमित्तमात्र आहे. भक्तांनी भक्तांसाठी तयार केलेले हे मंदिर आहे.' 
नवचंडी, पूर्णाहुती : सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत स्वामी शांतात्मानंद महाराज यांच्या उपस्थितीत. 

बातम्या आणखी आहेत...