आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणे, शिवसेना, बविआ व भाजप यांच्या संमिश्र प्रभावाची शक्यता; यश टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खालसा होण्याच्या बेतात असलेले नारायण राणेंचे तळकोकणातील संस्थान, एका तपापूर्वीपर्यंत कायम असलेली पकड पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेली शिवसेना, निवडणुकीनुसार हेलकावणारा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव, तर राणेंचा स्वाभिमानी पक्ष आणि शिवसेनेपैकी कुणाला प्राधान्य द्यावे या संभ्रमात असलेला भाजप, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील ही राजकीय सद्य:स्थिती आहे. कोकणातील मुंबई आणि ठाणे वगळता पालघर, भिवंडी, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या चार लोकसभा मतदारसंघांचा कोकण विभागात समावेश होतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रभावी असलेली मोदी लाट आणि सेना भाजपच्या युतीच्या बळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत सेना आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा आपल्या खिशात घातल्या होत्या. यंदाही शिवसेना आपल्याकडे असलेले रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे दोन मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवेल, असेच चित्र असताना भाजपला मात्र मोदी लाट ओसरल्याने भिवंडी आणि पालघर मतदारसंघात पुन्हा गतवेळच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी झगडावे लागणार आहे. 

 

कोकणचा राज्यातील राजकारणावर प्रभाव 
भाजपचे विद्यमान खासदारच काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असल्याने भिवंडीत राजकीय वातावरण अस्थिर आहे. बहुजन विकास आघाडीसोबत काँग्रेसची आघाडी झाल्यास पालघरही भाजपच्या हातून निसटू शकते. भाजप व शिवसेना यांच्यात धुसफूस असली युती होण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहेच. २०१४ च्या तुलनेत यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नाही, याचीही जाणीव आहेच. युती झाल्यास मात्र भाजपसाठी लढाई काहीशी सोपी होईल, अशी चिन्हे आहेत. 

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : शिवसेना विरुद्ध राणेंदरम्यान थेट लढत 
शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी २०१४ मध्ये काँग्रेसच्या नीलेश राणेंचा धुव्वा उडवला. यामुळे शिवसेनेला येथे पुन्हा एकदा पाय रोवण्याची संधी मिळाली. आता राणेंनी काँग्रेसलाही रामराम ठोकत भाजपच्या मदतीने आपली स्वतंत्र चूल मांडली आहे. भाजप-शिवसेनेची युती झाल्यास राणे आपल्या स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाद्वारे नीलेश राणेंना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. युती न झाल्यास भाजप ही जागा राणेंसाठीच सोडणार आहे. युती झाली किंवा नाही झाली तरीही शिवसेना विरुद्ध राणे अशीच थेट लढत रंगणार आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे असली तरीही इथे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बरी आहे. शिवाय राणेंनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याने आघाडीला या येथे विजयाची फारशी आशा नाही.

 

रायगड : मताधिक्य वाढवण्याचे शिवसेनेसमोर असेल आव्हान 
शिवसेनेचे खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गिते सलग ६ वेळा येथून जिंकले आहेत. गतवेळी मोदी लाट असूनही २ हजार मतांनीच ते जिंकले. मताधिक्य वाढवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागेल. गितेंसमोर यंदाही राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हेच असतील. काँग्रेस आघाडी व जोडीला रायगडच्या पेण, अलिबाग या विधानसभा मतदारसंघांत प्रभाव असलेल्या शेकापची साथही तटकरेंना मिळेल. त्यामुळे तटकरेंचे पारडे जड आहे. मात्र, २०१४ मध्ये तटकरेंसोबतचे अनेक स्थानिक नेते आता गितेंच्या बाजूने आहेत. तसेच मधुकर ठाकूर, रविशेठ पाटील यांच्यासारखे काँग्रेसचे माजी आमदार व श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे हे तटकरेंविरुद्ध जाऊ शकतात. त्यामुळे तटकरेंना अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागू शकते.  

 

भिवंडी : विद्यमान खासदारांचा निर्णय ठरणार सर्वात महत्त्वपूर्ण
मोदी लाटेत २०१४ निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी राष्ट्रवादीतून आलेल्या कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ पाटलांना १ लाखापेक्षा जास्त मतांनी हरवले. राष्ट्रवादीत राहून सरपंच ते जि.प. अध्यक्ष असा प्रवास केलेल्या कपिल पाटलांना स्थानिक प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यातच येथे खुद्द मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, पंतप्रधान आवास योजना यांसारखे प्रकल्प मंजूर करून घेतले. त्याचा फायदा भाजपला मिळेल. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी घरवापसीची तयारी केल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप नेतृत्व सावध झाले आहे. कपिल पाटील खरोखरच काँग्रेस आघाडीत पुन्हा दाखल झाल्यास भाजपला येथून नवा उमेदवार शोधावा लागेल.

 

पालघर : ‘बविआ’ला काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास भाजप गोत्यात 
२०१८ पोटनिवडणुकीत शिवसेनेने वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपचे राजेंद्र गावित जिंकले. २०१९ मध्ये श्रीनिवास हे सेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी त्या वेळी केली होती. यंदा युती झाल्यास उमेदवार कोण हा पेच उद््भवू शकतो. दरम्यान, भाजपने श्रीनिवास यांच्या घरवापसीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघात ३ आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची भूमिका निर्णायक ठरेल. बविआने विधानसभेत भाजपला पाठिंबा दिला. मात्र, २०१८ च्या पोटनिवडणुकीत पाठिंबा न दिल्याने भाजपवर नाराज ठाकूरांची लोकसभेसाठी काँग्रेसशी बोलणी सुरू आहे. काँग्रेस ही जागा ठाकूर यांच्यासाठी सोडू शकते. तसे झाल्यास बविआ व काँग्रेसच्या मतांची बेरीज बविआच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल.

 

बातम्या आणखी आहेत...