केसापुरी शिवारातील घरात झालेल्या चोरीला वेगळे वळण; प्रकाश सोळंकेंविरुद्ध स्वयंपाकी महिलेची बलात्काराची तक्रार
१५ वर्षांपासून सोळंके बलात्कार करत असल्याची तक्रार महिलेने पोलिस अधीक्षकांकडे मंगळवारी रात्री केली.
-
बीड- माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या केसापुरी शिवारातील घरात झालेल्या चोरी प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तीन लाखांच्या चोरी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या स्वयंपाकी महिलेने सोळंकेंवर बलात्काराचा आरोप केला. १५ वर्षांपासून सोळंके बलात्कार करत असल्याची तक्रार महिलेने पोलिस अधीक्षकांकडे मंगळवारी रात्री केली.
केसापुरी शिवारात माजी मंत्री सोळंके यांचा बंगला आहे. दोन दिवसांपूर्वी सोळंके व त्यांच्या पत्नी जि.प.सदस्या मंगलताई सोळंके या नातेवाइकाच्या लग्नाला गेले असताना बेडरूममधील कपाटात ठेवलेले ३ लाख रुपये चोरीस गेले. सोळंकेंनी एक नोकर, स्वयंपाकी महिलेवर संशय व्यक्त करून सोमवारी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतर या महिलेने सोळंकेंवर आरोप केला. दरम्यान, या तपासासाठी उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश दिले असल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
मुलीचीही केली मागणी
तीन महिन्यांपूर्वी नवीन बंगल्यावर स्वयंपाकासाठी गेल्यावर त्यांनी अत्याचार केला. माझ्या मुलीस बँकेत नोकरीस लावतो, परंतु ती उपभोगण्यास पाहिजे, अशी मागणी केली. यावर मी त्यांचे काम सोडण्याचा विचार केला. हे सोळंके यांना सांगताच त्यांनी दमदाटी केली, असे तक्रारीत नमूद आहे.