Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Rape on minor girl in Khamgoan

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, प्रसूतीनंतर 2 महिन्यांनी फुटली वाचा 

प्रतिनिधी | Update - Feb 12, 2019, 08:05 AM IST

गंभीर बाब म्हणजे सदरील मुलीची प्रसूती होऊन दोन महिने उलटूनही या प्रकाराची एमएलसी पोलिसांना मिळाली नव्हती.

  • Rape on minor girl in Khamgoan

    खामगाव- फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार ठाणे हद्दीतील एका छोट्याशा गावातील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. मुलीची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. गंभीर बाब म्हणजे सदरील मुलीची प्रसूती होऊन दोन महिने उलटूनही या प्रकाराची एमएलसी पोलिसांना मिळाली नव्हती. परंतु घाटीतील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई केल्याने प्रकरण उजेडात आले. नितीन अशोक ऊर्फ पुंजाराम म्हस्के ( २१ , रा. शहागड ता. अंबड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    घटनेबाबत प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी सांगितले की, व पीडित मुलीच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. ती राहत असलेल्या गावात तिच्या नातेवाइकासोबत त्याचा मित्र म्हणून नितीन म्हस्के येत असे. नितीन याने जानेवारी १८ ते मे १८ या काळात वेळोवेळी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. त्यानंतर तो भूमिगत झाला. या अत्याचारातून गरोदर असल्याचे तिला नवव्या महिन्यात समजले. त्यानंतर तिने एका नातेवाइकाच्या मदतीने घाटी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा तिने आरोपीला संपर्क साधून गरोदर असल्याची माहिती दिली. मात्र त्याने अंग झटकले. उलट तुझे तुच बघून घे म्हणून तिला धमकावले. ती एकटीच बाळंतपणासाठी घाटी रुग्णालयात गेली. ४ डिसेंबर २०१८ रोजी ती प्रसूत झाली. या घटनेची तत्काळ एमएलसी पोलिसांना देणे गरजेचे होते. मात्र पोलिसांना वेळेत एमएलसी मिळालीच नाही. दरम्यानच्या काळात ती महिला बाल आश्रमात राहिली. घाटीतील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना ही घटना कळताच त्यांनी तिची भेट घेतली. वडोदबाजार पोलिसांना पत्रव्यवहार केला. पोलिस उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी तपास करून शुक्रवारी (दि. ८) वडोदबाजार पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून शनिवारी आरोपीला ताब्यात घेतले.

Trending