Crime / लग्नाच्या आमिषाने शारीरिक शोषण, कारवाईस पोलिसांची टाळाटाळ; बिहारच्या तरुणीची पत्रकार परिषदेत तक्रार

मंदिरात कुंकू लावून प्रतीकात्मक लग्न करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले पण जाहीर लग्नास दिला नकार 

प्रतिनिधी

Jun 15,2019 09:37:00 AM IST

लातूर - लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच शारीरिक शोषण करून लग्नास नकार दिला. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर ठाण्यात तक्रार करूनही पोलिस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप बिहारच्या एका तरुणीने लातूरमध्ये पत्रकार परिषदेत केला.


पटणा येथील या तरुणीने सांगितले की कोलकाता येथील इरेक्सोन कंपनीत ती काम करीत असताना तेथे पाटण्याचा रहिवाशी असलेला आशिष बृजभूषण पांडे हा तरुणही काम करीत होता. एकत्रित काम करीत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात मार्च २०१३ मध्ये एका मंदिरात कुंकू लावून प्रतीकात्मक लग्न करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आशिषने जाहीर लग्न करण्यास नकार दिला. आपल्या कुटुंबीयांनाही अपमानास्पद वागणूक दिली. आरोपी आशिष पांडे हा सध्या लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाजवळील एसबीआयच्या शाखेत कार्यरत आहे. आपल्याला लग्न करू, असे सांगून त्याने २३ मार्च २०१९ रोजी लातूरला बोलावले. एका हॉटेलमध्ये ठेवले. नंतर मात्र लग्नास नकार देऊन मारहाणही केली आहे. याबाबतीत शिवाजीनगर पोलिसांत तक्रार केली. परंतु पोलिसांकडून आपत्तीजनक वागणूक मिळाली. आरोपीपासून आपल्या जीवाला धोका आहे. फसवणूक करणाऱ्या आशिष पांडेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आपल्याला न्याय मिळावा ,अशी अपेक्षाही तरुणीने व्यक्त केली. या प्रकरणी आपण राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितल्याचे सांगून आपल्याला सहकार्य करण्याऐवजी आपल्यासोबत आपत्तीजनक व्यवहार करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी तिने यावेळी केली.

X
COMMENT