आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार पीडितेचा गळा आवळून खून; आरोपीचा अपघाती मृत्यू; मुलगाही बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - अत्याचार प्रकरणातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीतून जामिनावर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपघातात मृत्यू झाल्याची घटना मस्साजोगजवळ रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. तर पीडित महिलेचा मृतदेह शिंदी शिवारात सोमवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. पीडितेस मारहाण करून तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र रुग्णालयातूूून उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

अपघातात मरण पावलेल्या संतोष दगडू वाघमारे (३२, रा. विडा ता. केज ) व मृत कविता शहादेव वायबसे ( ३०, रा. नामेवाडी ता. केज) हे दोघे ही विवाहित होते. महिलेस दोन मुले, एक मुलगी अशी तीन अपत्ये होती. तीन वर्षांपूर्वी ऊसतोडीसाठी गेल्यानंतर त्या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून कविता ही पती पासून विभक्त केज शहरात समतानगर किरायाने रूम करून राहत होती. कविता आणि संतोष हे दोघे पती पत्नीप्रमाणे राहत असल्याने कविताने त्याच्या घरी दुसरी पत्नी म्हणून नेण्यासाठी तगादा लावला. मात्र घरी पहिली पत्नी असल्याने संतोषने तिची मागणी धुडकावली होती. त्यामुळे कविताने संतोष वाघमारे याच्या विरोधात २७ ऑगस्ट रोजी ओळखीचा फायदा घेत घरात घुसून मारहाण करत बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. तर अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने संतोष वाघमारे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

आरोपी संतोष वाघमारे हा शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री जामिनावर सुटका करून गावाकडे आला होता. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विड्याहून केजकडे दुचाकीवर ( एम.एच.४४ व्ही. ६९०२ ) येत असताना केज - मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगावजवळ केजकडून बीडकडे निघालेल्या अॅपेरिक्षाची ( एम.एच.०४ ई. वाय. ०९७२ ) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या संतोष वाघमारे याचा मृत्यू झाला. अॅपेरिक्षा चालक फरार असून पोलिसांनी अॅपेरिक्षा ताब्यात घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच संतोषच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिस ठाण्यात गर्दी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी सोमवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले होते. 
 

काही तासांतच महिलेचाही मृतदेह आढळला
सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीच्या तयारीत असलेल्या पोलिसांना पीडित महिला कविता वायबसे हिचा मृतदेह मस्साजोगपासून जवळच असलेल्या शिंदी शिवारात आढळून आल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे, जमादार बाळकृष्ण मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृत कविता हिच्या ओठावर मार लागल्याचे आणि तिचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. उत्तरीय तपासणीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

खून करून पळून जाताना अपघात ?
आरोपी संतोष वाघमारे हा पीडित महिलेसोबत राहून रात्री तिचा खून करून पळून जाताना त्याचा अपघात झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मात्र तपासात आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 
 

कविताचा नऊ वर्षांचा मुलगाही बेपत्ता 
मृत कविता हिच्या थोरल्या मुलीचा विवाह झालेला अाहे. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा बाहेरगावी शिक्षणासाठी आहे. तर तिच्या सोबत धाकटा मुलगा हनुमंत शहादेव वायबसे ( ९ ) हा होता. तो बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.