आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धपौर्णिमा विशेष : भगवान गौतम बुद्धांवरील जगभरातील दुर्मिळ साहित्य आजपासून एका क्लिकवर उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भगवान गौतम बुद्धांनी जगाला मानवता, अहिंसेची शिकवण दिली. त्यांच्याविषयी तसेच त्यांच्या शिकवणुकीबद्दल जगभरात संशोधन झाले. दुर्मिळ साहित्य निर्माण झाले. हे सारे साहित्य बुद्धपौर्णिमेनिमित्त म्हणजे १८ मे रोजी एका क्लिकवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागाने ही किमया घडवून आणली आहे. 


 तथागत गौतम बुद्धांनी कायम ज्ञानप्राप्तीचा आग्रह धरला. प्रत्येक गोष्ट स्वत: तपासून, अभ्यासून बघा, असे सांगितले. त्यांच्या शिकवणुकीवर जगाच्या कानाकोपऱ्यात संशोधन झाले. अनेक मान्यवरांनी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली. बुद्ध तत्त्वज्ञानावर जगभरात ११९ महत्त्वाचे शोधप्रबंध सादर झाले. यातील १४ प्रबंध शोधगंगा थिसिस डेटाबेसमध्ये आहेत. ७० नेटवर्क डिजिटल लायब्ररी ऑफ थिसिस अँड डेझर्टेशन्स तर ५ ओपन अॅक्सेस थिसिस अँड डेझर्टेशन्स, २८ ओपन थिसिसमध्ये पाहण्यास मिळतात. पाकिस्तानी रिसर्च रिपॉझिटरीमध्येही दोन संशोधने आहेत. याशिवाय १५ ई-बुक, १४ ऑडिओ ई-बुक आहेत. मराठी भाषेतील २, हिंदीतील ३ आणि तेलगूतील १ चित्रपटही आहे. पण हे सारे विखुरलेल्या स्वरूपात होते. अभ्यासकांना संबंधित वेबसाइटवर किंवा ग्रंथालयांमध्ये जाऊनच ते अभ्यासता, पाहता येत होते. म्हणून बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधत विद्यापीठाच्या लिंकवर (Http:/www.bamu.ac.in/krc/e-resources.aspx) ते एकाच क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे सर्व संकलन ग्रंथालय विभागातील माहिती शास्त्रज्ञ गजानन खिस्ते यांनी केले, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. धर्मराज वीर यांनी दिली. 

 

पाली भाषा, बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास : विद्यापीठातील पाली व बुद्धिझम विभागातर्फे २००८ राजीव गांधी आणि मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती (पाच वर्षांपाठी २० लाख रुपये) दिली जाते. अशी शिष्यवृती देणारा हा देशातील एकमेव विभाग आहे. त्याचा लाभ घेत ८० विद्यार्थ्यांनी पाली भाषा, बुद्ध तत्त्वज्ञानावर मौलिक संशोधन केले आहे. ४४ जण संशोधन करत आहेत, असे विभागप्रमुख प्रा. प्रशांत पगारे यांनी सांगितले. जपान, थायलंड, नेपाळ, भूतान, तिबेटच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

 

याबाबत नुकताच जपानशी विद्यापीठाचा करार झाला आहे. त्याद्वारे भगवान गौतम बुद्धांचे जपानमध्ये उपलब्ध असलेले आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यासही करता येणार आहे, असेही ते म्हणाले. एकूणच याचा विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे दिव्य मराठीशी बोलताना वीर यांनी या वेळी सांगितले. 
 

जगात फक्त तीन पुस्तके, त्यातील एक विद्यापीठात
बौद्धकालीन संस्कृतीचे दर्शन अजिंठा लेण्यांतील कलाकृतींमध्ये घडते. त्याविषयी १८९६-९७ मध्ये जॉन ग्रिफिट यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या मूळ प्रतींपैकी फक्त तीन प्रती उपलब्ध आहेत. त्यातील एक प्रत विद्यापीठाच्या ग्रंथालयात आहे. उर्वरित दोन ब्रिटिश ग्रंथालय आणि लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन येथे आहेत. या पुस्तकात प्रत्येक लेण्याची रचना, चित्रांची लांबी, रुंदी याची अचूक माहिती आहे. शिवाय चित्रांचे रेखाटन आहे. महत्त्वाचे म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानाविषयी अमूल्य ठेवा वाचण्यास मिळतो, असेही डॉ. वीर यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...