आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नागपुरात टीका 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. येत्या २५ तारखेपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्या सोडवायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनांत विधेयक मांडून त्यावर चर्चा घडवून आणता आली असती. पण अण्णांच्या पाया पडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ महिने ते बोलणार नाहीत याची काळजी घेतली आणि आजचे संकट पुढे ढकलले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपुरात केली. अमरावती येथील मेळाव्याला जाण्यासाठी आले असता विमानतळावर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. 


पाटील म्हणाले, लोकपाल, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अण्णा हजारे वारंवार या मागण्या करत आहेत. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मोदींनी पाच वर्षे काहीच केले नाही. आता पाच राज्ये हातातून गेल्यावर घाबरलेल्या सरकारला शेतकऱ्यांची आठवण झाली. एका वर्षात सहा हजार मदत. तीही टप्प्याटप्प्याने. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. खरे तर सरकारने महिन्याला सहा हजार रुपये द्यायला पाहिजेत, असेही पाटील म्हणाले. सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, पण त्याऐवजी वर्षाला सहा हजार देऊ केले आहेत. संजय गांधी निराधार योजनेतही यापेक्षा जास्त मानधन मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 


दरम्यान, जयंत पाटील यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारीच मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी राळेगणसिद्धी येथे त्यांच्यासोबत तब्बल सहा तास चर्चा केली होती. त्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले. 


अॅड. आंबेडकरांना आघाडीत घेऊच 
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सहा उमेदवार जाहीर केले आहेत. ते आघाडीविराेधी वक्तव्ये करत आहेत. प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरी त्यांना सोबत घेऊ. कारण भाजप-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांची भेट का घेतली, त्यांच्यात काय चर्चा झाली, याविषयी मला काहीही माहिती नाही. ती त्यांची वैयक्तिक भेट असू शकते. पण, मनसेला आघाडीत घेण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही, असे पाटील म्हणाले. भाजप युवा नेत्या पूनम महाजन यांनी शरद पवार यांना शकुनी मामा म्हटले. निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपने खालच्या स्तरावरचे राजकारण सुरू केले. पण आम्ही तसे करणार नाही, असेही ते म्हणाले. 
 

बातम्या आणखी आहेत...