..तर राष्ट्रवादी करणार / ..तर राष्ट्रवादी करणार 'सर्जिकल स्ट्राईक', आंदोलन आमदार जगताप यांचा भाजप सत्ताधाऱ्यांना इशारा 

प्रतिनिधी

Feb 07,2019 11:56:00 AM IST

नगर - आम्ही विकासाच्या मुद्यावर वर बसलेल्यांना पाठिंबा दिला आहे, पण सामान्यांचे प्रश्न सुटणार नसतील, तर तुमच्या खुर्च्या मोडून तुमच्याच गळ्यात घालू. अधिकाऱ्यांना वाटत असेल, आम्ही वरच्यांना पाठिंबा दिला ते पाहतील, पण तुम्ही 'उरी' पिक्चर पाहिला असेल. राष्ट्रवादी काँग्रेस खाली व वर सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी सत्ताधारी भाजपसह प्रशासनाला दिला. दरम्यान, कचऱ्यासह विविध प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

शहर स्वच्छतेबाबत आमदार जगताप यांनी २९ जानेवारीला मनपा प्रशासनाला निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने या पत्राला कोणतेही उत्तर न दिल्याने बुधवारी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली मनपावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी माजी शहराध्यक्ष माणिक विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, समाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, वैभव ढाकणे, अमित खामकर, ऋषिकेश ताठे, महेश बुचुडे, प्रा. अरविंद शिंदे, दीपक सूळ, माजी नगरसेवक आरिफ शेख, विपुल शेटिया, नगरसेवक संपत बारस्कर, गणेश भोसले, अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, मीना चव्हाण, सागर बोरुडे, दीपाली बारस्कर, अमोल गाडे, संजय चोपडा, अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते.


जगताप म्हणाले, आम्ही निवेदन देऊनही त्याचे लेखी उत्तर मिळालेले नाही. यानुसार आम्हाला प्रशासनाच्या कामाची पद्धत कळाली. मला उपायुक्त कोण पवार कोण उपायुक्त पठारे माहीत नाही. आम्ही विकासात्मक कामासाठी वर बसलेल्यांना पाठिंबा दिला आहे, पण सामान्यांचे प्रश्न सुटणार नसतील, तर तुमच्या खुर्च्या मोडून तुमच्याही गळ्या घालू. आमच्या निवेदनांना तुम्ही सहज समजू नका, आमच्या महिला भगिनी तुम्हाला योग्य धडा शिकवतील. अधिकाऱ्यांना नगरसेवक कोण आहेत, ते माहीत नाही. तुम्हाला वाटत असेल, वरच्यांना पाठिंबा दिला. पण तुम्ही जर उरी चित्रपट पाहिला असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसही खाली व वर सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नगरसेवकांनी सांगितले की, पाठिंबा दिला म्हणजे काहीही खपवून घेणार नाही, अधिकारी व पदाधिकारी फक्त खुर्च्या उबवत आहेत. मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. अधिकारी नियम, कायदे दाखवून कामे टाळतात, हे यापुढे चालणार नाही. पक्षाने काढले असले तरी आम्ही पक्षाच्या व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठिशी आहोत, असे नगरसेवकांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना काळे फासणार
शहर स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासनाला २० फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत दोन्ही उपायुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे काम केले नाही, तर अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशारा राष्ट्रवादीचे सुरेश बनसोडे, सारंग पंधाडे यांनी दिला. या आंदोलनात महिला आघाडीही सहभागी होईल, असे शहराध्यक्षा रेश्मा आठरे यांनी सांगितले.

उद्या बोलावली बैठक
उपायुक्त सुनील पवार यांनी आंदोलनाला सामोरे जाताना २० फेब्रुवारीपर्यंत सर्व घंटागाड्या दुरुस्त केल्या जातील, असे सांगितले. त्याबरोबरच शुक्रवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता सर्व नगरसेवकांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जाणार आहे, असे आंदोलकांसमोर पवार यांनी जाहीर केले. जास्तीत जास्त कचरा उचलण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा
महापालिका अावारात धडक मोर्चाच्या निमित्ताने जमलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त सुनील पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. तर घनकचरा विभागप्रमुख नरसिंह पैठणकर यांना 'नीट करा..' अशाही घोषणा यावेळी दिल्या गेल्या.

उपायुक्तांनी केली दिलगिरी व्यक्त
घनकचरा विभाग माझ्याकडे आहेच आहे. आमदारांच्या निवेदनावर उत्तर दिले नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला येथे येऊन दोन महिने झाले असून अडचणींबाबत घनकचरा विभागाची बैठक घेतली. आपल्याकडे असलेल्या ३० घंटागाड्यांपैकी १० घंटागाड्या व १ कॉम्पॅक्टर बंद आहे. आमदार जगताप यांच्या पत्राला ठोस उत्तर द्यायचे होते.

अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली
एका माजी नगरसेवकाबाबत जो प्रकार घडला, त्यावेळी माजी नगरसेवक उठून बोलत होता. पण अधिकारी तेथे टेकून बसलेला होता. अधिकाऱ्यांचा मुजोरपणा वाढल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले. जर तुम्ही असे वागणार असाल तर राष्ट्रवादी खपवून घेणार नाही. सामान्यांना तुम्ही अशी वागणूक देणार असाल, तर तुमच्या अनुभवाची नगर शहराला गरज नाही, अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.

X
COMMENT