आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशातील मोठा दहशतवादी' - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आर्थिक पडझडीवरचे लक्ष विचलित करण्यासाठी संघ-भाजप देशात हिंसा पसरवत आहे. त्यासाठी विद्यापीठांना लक्ष्य करण्यात येत आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेला हल्ला त्या कटाचा पूर्वनियोजित भाग होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशातला सर्वात मोठा आतंकवादी आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकारला आर्थिक पातळीवर सर्वत्र अपयश आलेले आहे. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो त्याच मार्गाने मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या एक-एक कंपन्या विकून कारभार हाकत आहे. हे सर्व अपयश उघड होऊ नये म्हणून संघ-भाजपला देशात यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

संघ, भाजप संघटनेत हिंसा अंगभूतच आहे, असे ते म्हणाले. तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा लढा हा विद्यापीठ कॅम्पसपुरता मर्यादित नसून चातुर्वर्ण्यांची प्रतिगामी पद्धत आणि भारतीय संविधानाची पुरोगामी व्यवस्था या दोन व्यवस्थेमधील तो संघर्ष असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.

देशात संघ, भाजप भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. मात्र ही भीती झुगारून आपण उभे राहिले पाहिजे. अर्बन नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच देशातला सर्वात मोठा दहशतवादी असल्याचे आंबेडकर म्हणाले.

ओबीसी नाेंदीला पाठिंबा

अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा होणार असा दावा आंबेडकर यांनी केला. वाशीम जिल्हा परिषदेत धर्मनिरपेक्ष पक्षांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. जनगणनेत ओबीसीची जातवार नोंद केली पाहिजे, त्याला पाठिंबा असल्याचे आंबेडकर म्हणाले. संघ विचाराचे कुलगुरू बदललेच पाहिजेत, असे सांगून सत्ता कशी वापरायची हे सरकारला आम्ही शिकावयाचे का, असा प्रश्न आंबेडकर यांनी केला.