आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा न करताच राष्ट्रवादी गुजरातेत स्वतंत्र लढणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असताना गुजरातमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत न करताच परस्परच लोकसभेच्या सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे, तर केंद्रीय स्तरावर गुजरातमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांद्वारे देण्यात आले आहे. परिणामी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा मुद्दा मार्गी लागत असतानाच गुजरातमधील जागावाटपावरून नव्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.   


आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे गुजरातमधून लोकसभेच्या सर्वच्या सर्व २६ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या गुजरात प्रदेश कार्यालयातर्फे केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाच्या वाटाघाटींवर एकमत न होऊ शकल्याने राष्ट्रवादीने गुजरातेत लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गुजरातमधील जागावाटपासाठीच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीने काँग्रेसकडून पोरबंदर, पंचमहल आणि गांधीनगर हे मतदारसंघ मागितले होते. यापूर्वी २००४ मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला राजकोट मतदारसंघ सोडला होता, तर २०१४ मध्ये जागावाटपात पोरबंदर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला होता. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. यंदा दोन्ही  पक्षात गुजरातमध्ये आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...