आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी घेतले भाजपचे कमळ हाती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते. 


दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांपासून तयारी करत असलेल्या डॉ. पवार यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देऊन युतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, यामुळे डॉ. पवार नाराज झाल्या होत्या. त्यांच्या या नाराजीचा फायदा पालकमंत्री महाजन व भाजपचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेऊन डॉ. पवार यांची भेट घेत भाजपमध्ये या, तुमचा सन्मान करू, असे सांगून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. मात्र, डॉ. पवार यांनी आपण भाजपमध्ये येऊ पण उमेदवारी पाहिजेच असा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे त्यांचा बुधवारचा प्रवेश लांबला होता. यावर भाजपची वरिष्ठ समिती, मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री महाजन यांच्यात चर्चा झाली आणि त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे कळते.


मतदारसंघातून आलेल्या अहवालानुसार व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार डॉ. पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामुळे डॉ. पवारांनी आज मुंबईत समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान मिळणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघात असलेला जनसंपर्क, उच्चशिक्षित व अभ्यासू नेत्या असलेल्या डॉ. पवार यांच्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होईल. 
 

बातम्या आणखी आहेत...