Magazine / प्रस्थापितांचं "चांगभल'!

या विषयावर एक सकारात्मक चर्चा घडवून आणणे हीच "दिव्य मराठी रसिक' ची भूमिका आहे आणि त्यानिमित्ताने घडवून आणलेला हा परिसंवाद... 

दिव्य मराठी

Jul 21,2019 12:19:00 AM IST

गेल्या आठवड्यात १४ जुलै रोजी "रसिक' पुरवणीत मराठी साहित्यात काय चाललयं यासंबंधीचा धांडोळा घेणारा "मराठी साहित्याचं चांगभलं' हा लेख नामदेव कोळी यांनी लिहिला आणि सोशल मीडियावर या लेखासंबंधी अनेक उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडला. पुरस्कार मिळणं... अभ्यासक्रमात साहित्यकृतीचा समावेश होणं... म्हणजेच साहित्याचं "चांगभलं' नसून त्यापलिकडे मराठी साहित्यात बरचं काही घडतयं ज्याचा लेखात वेध घेणं गरजेचं होतं, असे मत अनेक मान्यवर लेखक-कवींनी व्यक्त केले. या विषयावर एक सकारात्मक चर्चा घडवून आणणे हीच "दिव्य मराठी रसिक' ची भूमिका आहे आणि त्यानिमित्ताने घडवून आणलेला हा परिसंवाद...

प्रस्थापित व्यवस्थेवर ओरखडाही उमटत नाहीये
"मराठी साहित्यात काही घडतच नाही असं म्हणणारे लोक आणि नामदेव कोळी यांनी केलेले चिंतन यात मूलभूत फरक आहे. काहीतरी चांगलं घडणं याचा अर्थ शैली, भाषा, आशय तंत्र अनुभव, कल्पनाशक्ती या अनुषंगाने म्हटलं जातं. कोळी यांनी पारितोषिक, प्रसिद्धी, विक्री, प्रदर्शन यांचा वरवरचा आढाव घेतला आहे. पण मराठी साहित्य वैचारिक वाड्मयात, समीक्षेत, नवनव्या तत्वज्ञानाला अपुरं पडतयं हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. पोस्ट मॉर्डन विचारसरणीबद्दल मराठीत अतिशय त्रोटक लिखाण होतंय. विक्री वाढली आहे, प्रदर्शन भरतात, बहूजन समाजातले तरुण तरुणी लिहिते झाले आहेत, पण त्याने प्रस्थापित व्यवस्थेला ओरखडाही जाऊ नये हे जास्त काळजी करण्यासारखं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या मार्गांनी बंधनं घातली जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले देखील वाढले आहेत. त्यावर मराठी साहित्यिक काय भूमिका घेत आहेत किंवा तसं भूमिका घेणारं लिखाण पुढं येत आहे काय, यावर मूकता पाळली गेली आहे. साहित्य निरुपद्रवी होत चाललं की पारितोषिकं देणं वाढलं. प्रस्थापितांना साहित्य आपल्या आवती-भोवती पिंगा घालावं असं वाटत असतं. त्यातून पारितोषिके, नेमणूका, निवड होत राहतात. याविषयी सावधताच बाळगली पाहिजे. हा काळ हूरळून जाण्याचा नाही, हा काळ नवनिर्मितीचा आहे. त्यामुळे "चांगभलं' म्हणण्यामध्ये काय अर्थ नाही".
- जयदेव डोळे (माध्यम तज्ज्ञ)

पुरस्काराच्या पलिकडे खुप काही घडतयं...
"पुरस्कार मिळालेली पुस्तकं किंवा अभ्यासक्रमात लागलेलं साहित्य फक्त हेच महत्त्वाची आहेत असं नसून याच्या पलिकडे मराठीत खूप काही घडतयं. मराठी लेखक हे वेगवेगळी राजकीय भूमिका घेत आहेत. त्यामुळे मराठी लेखकांची सामाजिक बाजू या नामदेव कोळींच्या लेखात पूर्णपणे दुर्लक्षित केलेली आहे. पुरस्कार मिळणं, अभ्यासक्रमात लेखाची निवड होणं या गोष्टी आता अतिशय खालच्या थरावर गेल्या आहेत. त्यामुळे याला फार महत्व देण्याची गरज नाही. त्यामुळे प्रसिद्धीत न येणारे, वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या लेखकांचा विचार आताच्या काळात करावा लागेल. कोळींनी त्यांच्या लेखात अशी दखल घेणं गरजेचं होतं. अवधूत डोंगरे, अनिल साबळे यासारख्या लेखकांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. मराठी साहित्याबद्दल लिहिताना सर्वंकष आढावा घेणं गरजेचं आहे.
- प्रवीण बांदेकर (कादंबरीकार)

हे दखल घेणारे कोण आहेत?
"दरवर्षी कलाकृतींना पुरस्कार मिळतंच असतात, त्यामुळे नवं काही घडलंय असं काही नाही. पुस्तकात लेख येणं हीदेखील काही क्रांतिकारक गोष्ट नाहीये. लेखकाचा लेख, कविता, लघुकथा पाहून वाचकातर्फे लेखकाचा शोध घेतला जातो काय? पण असं काही होताना दिसतं नाही. लिहणाऱ्या लोकांना "स्पेस' मिळतेय, पण आपण लिहितो तेच ग्रेट आहे, असा अविर्भाव निर्माण होताना दिसतोय. स्वीकारणं म्हणजे काय...? पुरस्कार दिला म्हणजे दखल घेतली किंवा स्वीकारलं असं बोललं जातं... पण स्वीकारणं, दखलं घेणं म्हणजे काय आणि ही दखल घेणारे, स्वीकारणारे कोण आहेत असा प्रश्न मला पडतो. नामदेव ढसाळांच्या शिव्या पण स्वीकारल्या गेल्या. मराठी साहित्यात कळप तयार झालेले आहेत आणि काही पुरस्काराने किंवा सत्काराने हुरळून जातात आणि मिरवतात. लेखक असणं म्हणजे काय असतं, याचाच विचार होणं गरजेचं आहे. कारण हा काळ संघर्षाचा आहे. आपल्या विचारांसोबत जगणं खूप अवघड झालं आहे. त्यामुळे पुरस्कार मिळणे किंवा ते भाषेत भाषांतरित होणं यात यश मानणे योग्य नाही.
- वीरा राठोड (कवी/लेखक)

लेखकाचं सामान्यीकरण करण्याचा डाव
"इतकं ‘गुडीगुडी’ मराठी साहित्यचं मुळात नाहीये. साहित्य व्यवहार हा इतका सहज नसतो. एखादा पुरस्कार मिळणे, अभ्यासक्रमात एखादी कविता आणि धडा समाविष्ट करणे म्हणजे यश नव्हे. या प्रत्येकवेळी राजकीय कृती असतात. यात जातीय, सामाजिक समीकरणं असतात, अनेकांचे हितसंबध गुंतलेले असतात. काही लोकं एका सिस्टीममध्ये घुसतात मग त्यांच सगळं निवडलं जातं. फेसबुक, सोशल मीडिया सुरु झाल्यापासून लाईक कल्चर सुरु झालं आहे. तू मला लाईक कर, मी तुला लाईक करतो.. अशी एक पद्धत रुढ झाली आहे. त्यामुळे आपण एकमेकांना लाईक किंवा आपल्या जवळच्या लोकांचे कौतुक करत बसतो. कुणाला पुरस्कृत करायचं असल्यास त्यांना पुरस्कार दिले जातात. ज्याकाळात पुरस्कार दिले जातात त्यावेळी चांगल्याचं सामान्यीकरण केलं जातं. चांगल्याला डावलून दुय्यमला पुढं केलं जातं. हे नेहमीच सिस्टीममध्ये होतं असतं. नेहमी सोयीचं, आपल्या गटाचं किंवा दुय्यम दर्जाचं निवडंल जातं. हे मोठ्या साहित्यव्यवहारांपासून सर्वच ठिकाणी असं होतं असतं. पण असं स्पष्ट बोलणारे खूप कमी असतात. सतत लेखकांचं सामान्यीकरण करायचं हीच प्रस्थापित लोकांची हीच खेळी असते. गेल्या दहा वर्षांत जी साहित्यनिर्मिती झाली आहे त्यात एक दोन अपवाद वगळता दुय्यम साहित्यालाच पुरस्कृत केलं गेलयं.
- मंगेश नारायणराव काळे (कवी आणि समीक्षक)

साहित्यातले "व्हर्च्युअल मॉब लिंचिंग'
"या काळात अभिव्यक्तीची साधनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मराठी साहित्यातही अनेक गट-तट बनले आहेत. सजातीय लोकं एकत्र येऊन समोरच्यावर हल्ला करतात, हा हल्ला करण्याचे प्रकारही खूप वेगवेगळे आहेत. "व्हर्च्युअल मॉब लिंचिंग' सुद्धा केलं जातं. प्रस्थापित लेखक हे सुरुवातीला सोशल मीडियावर लिहणाऱ्यांना कुत्सित समजायचे. इथं काय हाती लागणार नाही असं बोललं जायचं. प्रस्थापितांनी अनेक वेळा आपले कंपू निर्माण करुन जाणीवपूर्वक अनेकांकडे दुर्लक्षित केलं. पण सोशल मीडियामुळे हे फार काळ टिकू शकले नाही. अजूनही साहित्यातली ताकद ही ठराविक लोकांकडेच आहे. समाजमाध्यमांमु‌ळे जरी लेखकांना स्पेस मिळत असली तरी फक्त समाजमाध्यमांवर लिहिणं म्हणजे साहित्यात योगदान देणे नाही. समाजमाध्यमातही आपआपले गटचं बनले आहेत आणि या गटबाजीतून मराठी साहित्य बाहेर पडले पाहिजे.
- सुदाम राठोड (युवा कवी)

X