आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्याच्या जागेचा तिढा सुटला; राष्ट्रवादीने अखेर उस्मानाबाद आणि माढ्याच्या उमेदवाराचे नाव घोषित केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर माढा आणि उस्मानाबादच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याआधी 16 उमेदवारांची यादी जारी करण्यात आली होती. आता या दोन उमेदवारांसह राष्ट्रवादीचे एकूण 18 उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहे.

 


संजय शिंदेंचा परिचय ?

संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. तसेच संजय शिंदे हे मोहिते पाटील कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असून, अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय, संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू असून, माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात त्यांनी केली आहे. ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. 2014 मध्ये त्यांनी स्वाभिमानी पक्षाकडून करमाळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. शिंदे हे विठ्ठल कार्पोरेशनचे संस्थापक चेअरमन असून, या माध्यमातून साखर कारखाना आणि सूतगिरणीची माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे उभारणी त्यांनी केली आहे. माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पदही त्यांनी सांभाळले आहे. याआधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, तसेच माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही संजय शिंदे यांनी भूषवले आहे.


राणा जगजित सिंह पाटील यांचा परिचय ?

राणा जगजित सिंह हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. ते उस्मानाबादचे विद्यमान आमदार असून, राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्षही आहेत. तर डॉ. पाटील यांच्या सून अर्चना पाटील या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. त्यामुळे उस्मनाबाद पाटील परिवाराचा बालेकिल्ला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी तीन दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्जही घेऊन ठेवला होता. पण त्यांच्याऐवजी मुलाला संधी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...