आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी मराठी आहे आणि हिंदू देखील आहे, मी धर्मातरण केलेलं नाही', येत्या 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात मनसेचा मोर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन केंद्र सरकारला पाठींबा
  • अधिवेशनात राज ठाकरेंनी हा झेंडा निवडण्यामागचे कारण सांगितले
  • 'जे मुसलमान देशाशी प्रामाणिक आहेत ते आमचेच आहेत'

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाची सांगता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. भाषणादरम्यान राज यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला जाहीर पाठिंबा तर दिलाच पण 9 फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याचेही राज ठाकरेंनी सांगितले.यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जे मुसलमान देशाशी प्रामाणिक आहेत ते आमचेच आहेत. यावेळी राज ठाकरेंनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या बाजूने भूमिका घेतली आणि मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत बेकायदेशीर नागरिकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. माझ्याकडची घुसखोरांबदद्लची माहिती घेऊन मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहे, असेही राज यावेळी म्हणाले.झेंड्याबद्दल बोलताना राज म्हणाले की, मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता तो हा झेंडा होता. मी माझ्या पहिल्या सभेत सांगितले होते, तेव्हा माझे आजोबा हजर होते. त्या संघटनेला दिलेलं नाव देखील माझ्या आजोबांनी दिलं होतं. तो जो झेंडा होता तो संयुक्त महाराष्ट्र समितीने देखील वापरला होता. त्यानंतर ही समिती विखुरली आणि शिवसेना तयार झाली. पुढे जे काही घडलं ते बाळासाहेब ठाकरेंमुळे घडलं. हे सर्व करण्यासाठी जे करावं लागतं त्यासाठी माणसं असावे लागतात मी एकटा होतो. तेव्हापासून माझ्या डोक्यात हा झेंडा होता. अनेकांना वाटतात आत्ताच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा झेंडा आणला. मात्र हा केवळ योगायोग आहे. हा मुळ डीएनए आहे, तो झेंडा आणायचाच होता. मात्र, कसा आणायचा हा विचार करताना पक्षाच्या अधिवेशनात हा झेंडा आणण्याचे ठरवले.एक गोष्ट सांगतो ही महाराजांची राजमुद्रा आहे. दुसरा कोणता झेंडा नाही. तो जेव्हा हातात घ्याल, तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसायला नको. आपले दोन झेंडे आहेत. निवडणुकीच्यावेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान राखलाच पाहिजे. त्याचा कुठेही गोंधळ व्हायला नको. असेही राज म्हणाले.

पुढे राज म्हणाले की, येत्या 9 मार्चला पक्षाला 14 वर्षे होतील. आम्ही सर्व काही दिवसांपासून विचार करत होतो की पक्षाचे एक अधिवेशन घेणे गरजेचे आहे. सभा ज्यावेळी होते त्यावेळी सर्व एकत्र येतातच. मात्र, अधिवेशन होतं तेव्हा राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात वेळ घालवतात. तसंही अधिवेशनाची परंपरा कमी होत आहे. सर्वच जण उत्तम बोलतात. आपल्यापैकीही अनेकजण उत्तम बोलतात. तुम्ही लोकांनी अधिवेशनासाठी खूप मेहनत घेतली. 9 मार्चला वर्धापनदिन आणि 25 मार्चला आपली गुढी पाडव्याची सभा आहे. मला जे काही अनेक विषय बोलायचे आहेत ते विषय सुरु करण्याआधी मी दोन तीन संघटनात्मक गोष्टी सांगणार आहे. हे सांगितल्यावर मला तसं पक्षात होताना दिसता कामा नये.
त्यानंतर राज म्हणाले की, सोशल मीडियावर हा डावा आहे, उजवा आहे काही प्रतिक्रिया व्यक्त करतात. मला संघटनात्मक कोणतीही गोष्ट वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. तुम्हाला कुणाबद्दल जर काही भावना व्यक्त करायची असेल तर आम्ही आहोत आम्हाला सांगा. मात्र, पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर चालणार नाही. असं आढळलं तर मी त्या व्यक्तीला पदावरुन दूर करेल. संघटनात्मक बांधणीसाठी आपण एक सेल सुरु करत आहोत. आता दोन व्यक्तींची निवड होईल, उद्या त्यांच्याखाली तुमच्यापैकी अनेक लोक असतील. संघटनेचे काम करणाऱ्यांनी रायगड येथे कार्यालयात येऊन नाव नोंदवावे आणि पक्षासाठी काम करायचं आहे, निवडणूक लढवायची नाही असे सांगावे. बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके माझ्याशी बोलून संघटनात्मक काम मजबूत करण्यासाठी ते काम करतील. ते जे काम करणार नाही त्यांचंही नाव माझ्यापर्यंत येईल.

राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

> मी मराठी आहे आणि हिंदू देखील आहे, मी धर्मातरण केलेलं नाही. 


> जे देशाशी प्रामाणिक आहेत ते मुस्लीम आमचेच आहे.

> आम्ही एपीजे अब्दूल कलाम, जहीर खान, जावेद अख्तर यांच्यासारख्या लोकांना विसरू शकत नाही.

> आझाद मैदानावर रझा अकादमीच्या लोकांनी पोलीस भगिणींवर हात टाकला तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

> भारतात कलाकार राहिले नव्हते असं समजत पाकिस्तानी कलाकारांना भारतात आणलं तेव्हा त्यांन हाकलणारे मनसेचे कार्यकर्ते होते. 


> नमाज का पढता असं आम्ही म्हणत नाही. भोंगा लावून का नमाज करतात? 

> बांग्लादेशी भारतात आले याचा काहीच अंदाज नाही. हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावा.

> माझं केंद्र सरकारला सांगणं आहे. तुम्ही पहिल्यांदा समझोता एक्स्प्रेस बंद करा.

> काश्मीर, राम मंदिर विषयावर मी कौतुक केलं. मात्र, आज ज्या गोष्टी होत आहेत. जे बाहेरुन आले आहेत त्यांना का पोसायचं?

> माझा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर इतका विश्वास आहे, की त्यांना एकदा 48 तासांचा वेळ द्या बघा ते काय करुन ठेवतात.

> मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो

> जे योग्य त्याचं अभिनंदन, जे चुकीचं आहे त्यावर बोलणारच.

> महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील मौलवी येतात, तेथे पोलिसांनी जायलाही परवानगी नाही.

> मागे जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्या सर्व 25 मार्चला टराटरा फाडणार आहे. 

> 9 तारखेला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढेल, त्या मोर्चात सहभागी व्हा.

बातम्या आणखी आहेत...