आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्याेजक रतन टाटा निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत सांगताहेत...८१ वर्षीय रतन टाटा म्हणाले, मी आजही विमान-हेलिकाॅप्टर उडवताे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाला अव्वलस्थानी पाेहाेचवणारे रतन टाटा ८१ वर्षांचे झाले आहेत. आपल्या मालमत्तेतील ६५% हून अधिक भाग त्यांनी शिक्षण, आराेग्य व गावांसाठी दान केला आहे. निवृत्तीनंतरही त्यांचा दिनक्रम व्यग्र आहे. ते समाजसेवा व व्यवसायाशिवाय कार संग्रह करत आहेत. विमान व हेलिकाॅप्टर उडवत आहेत. यासाेबत संगीत, चित्रपट व खेळाचाही आनंद घेत आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील संपादित अंश...

 

> अशी कोणती बाब आहे, जी तुम्ही जतन करून ठेवता?
मला घर डिझाइन करण्याचा छंद आहे. ज्या घरी मी राहतो, ते मीच डिझाइन केले आहे. एके काळी समुद्रकिनाऱ्यावरील मोडकळीस आलेले कॉटेज होते. अलिबागमधील पहिले घरही स्वत:च डिझाइन केले होते. हे १८०० चौ. फुटांचे लहान घर होते. आता या भागात सर्वांनी मोठमोठे महाल उभारले आहेत.

> व्यवसाय व समाजसेवेशिवाय सध्या काय-काय करत आहात? काेणत्या कामांत व्यग्र आहात?
मला कार खूप आवडतात. मी त्यांचा संग्रहही सुरू केला आहे.


>  जुन्या व अँटिक्स कार किंवा नव्याही...
नाही-नाही! साठच्या दशकातील व सध्याच्या कार. विशेषत: त्यांची स्टायलिंग व त्यातील तंत्राबद्दल माझा जास्त आेढा आहे. त्यांना समजून घेता यावे यासाठी मी त्यांची खरेदी करताे. मी आजही कंपनीचे विमान उडवताे, हेलिकाॅप्टरही उडवताे. त्यांचा उपयाेग मी पुण्याला जाण्यासाठी करताे. हवाई तंत्रज्ञानामध्येही मला रस आहे.


> एखादा खेळ खेळायला आवडते?
मला फुटबाॅल, टेनिस व गाेल्फ पाहायला आवडते, मात्र तेही टीव्हीवर. खरे सांगायचे झाल्यास अनेकदा काेण खेळते ते माहीत नसते. केवळ खेळाडूंच्या क्रीडा क्षमतांचा आनंद घेताे. काेण खेळतेय असे विचारल्यावर मला त्याची माहिती नसते.


> आम्ही एेकलेय, तुमचे लग्न पाच वेळा हाेता-हाेता राहून गेले?
चार वेळा. एकदा तर मी अमेरिकेत हाेताे तेव्हा लग्न झालेही हाेते. मात्र, माझ्या आजीने मला अचानक बाेलावून घेतले व त्या वेळी भारत व चीनच्या युद्धाला ताेंड फुटले. त्या मुलीचे लग्न झाले. नंतर कळले तिच्या पतीचे निधन झाले आहे. काही वर्षांपूर्वी मी बाॅम्बे हाऊस आॅफिसमध्ये बसलाे हाेताे तेव्हा, एका व्यक्तीने हातात चिठ्ठी टेकवत सांगितले की, पॅरिसमधील एका महिलेने मला देण्यासाठी दिली आहे. ही चिठ्ठी त्याच मुलीची हाेती. तिचं आपलं एक कुटुंब आहे, मुलेही आहेत. जग किती लहान आहे. एक वेळ अशी हाेती, आमच्यात काहीच संपर्क नव्हता, आज आम्ही मैत्रीच्या नात्यातून भेटत आहाेत.


> तुमच्या घरी श्वान आहेत?
हाे, माझ्या घरी दाेन जर्मन शेफर्ड आहेत. आम्ही नवी मुंबईत श्वानांसाठी दवाखाना करत आहाेत. कुलाब्याच्या यूएस क्लबमध्ये २० हून जास्त श्वानांना मी स्वत: खाऊ घालत हाेताे. त्यांना विष देऊन मारल्याचे मला कळले, ताेपर्यंत हे सुरू हाेते. त्यानंतर आजपर्यंत मी त्या क्लबमध्ये पाऊल ठेवले नाही.


> तुमच्या आवडीचे चित्रकार काेणते?
लक्ष्मण श्रेष्ठ, त्यापैकी एक आहेत. अकबर पद्मसीही आवडतात. मात्र, माझ्याकडे त्यांच्या एक-दाेनच पेंटिंग आहेत. कलाकृतींची खरेदी करणे महाग झाले आहे. 


> तुम्हाला काेणत्या प्रकारचे संगीत आवडते?
६० व ७० च्या दशकातील संगीत मला आवडते. उदा. बीटल्स. मात्र, मी शास्त्रीय संगीत वाजवू शकल्यास मला त्याचा जास्त आनंद हाेईल. मला शाॅपेन आवडते. सिम्फनीही चांगली वाटते. बिथाेवन, चेकाेस्की आवडते.


> तुम्ही कधी चित्रपट पाहू शकता?
थिएटरमध्ये नाही. घरी, टीव्हीवर पाहताे. नाव आठवायला सांगू नका. मी ‘द आर्ट आॅफ रेसिंग इन द रेन’ वाचायला सांगेन. मी ते पाच वेळा वाचले आणि प्रत्येक वेळा डाेळे आेलावले.


> जेआरडी टाटांचे उत्तराधिकारी झाला तेव्हा या वारशात तुम्हाला काेणती बलस्थाने दिसली?
टाटा ग्रुपमध्ये नैतिकता व मूल्यावर भर हाेता. तसे नसते तर आम्ही वेगवेगळ्या दिशांना गेलाे असताे. आम्ही जिथे  हाेताे  तिथे आत्मसन्मान भाव हाेता. 


> तुम्ही समूहाच्या समस्येवर काय उपाय शोधला? 
मी ग्रुपच्या सर्व कंपन्यांना एक लोगो, एका ब्रँडच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न केले. 


> त्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांची अडचण झाली असावी...सर्वांना टाटा सन्सअंतर्गत आणायचे होते. याबाबतीतच अडचण होती. खरे तर वर्षानुवर्षांपासून ते स्वत:च स्वत:चे बॉस होते. 
काही प्रमाणात त्यांची नाराजी राहिली असावी. पण परिवर्तन घडवण्याच्या कामात मला जेआरडींचे समर्थन होते, हे चांगली बाब होती. परंतु प्रत्यक्षात बदल मात्र त्यांच्या पश्चात होऊ शकले. 


> टाटामध्ये ब्रँडला प्राधान्य आहे. व्यक्ती-उत्पादन किंवा नवा उद्योग नाही ?
टाटा स्टीलमध्ये मी ऐन तारुण्यात शॉप फ्लोअरमधून प्रवेश केला होता. तेव्हा टाटा स्टील, टाटा इंजिनिअरिंग यांच्यात परस्पर संवादही नसायचा. अशी परिस्थिती मी पाहिली होती. ही गोष्ट पोषक नव्हती. टाटा-टीला टाटा इंजिनिअरिंगकडून एखादी गोष्ट खरेदी करायची तरीदेखील टाटा-टी त्यासाठी बाहेरून अपेक्षा ठेवत. अशा पद्धतीने आम्ही अनेक प्रकारच्या संधी गमावल्या होत्या. कारण आमच्यात एकजूट नव्हती. एकीकरण झाल्यावर तेव्हा बहुतांश कंपन्या एकत्र आल्या आणि परस्परांना टाटा समूह म्हणून आेळखू लागल्या. त्यानंतर कुठे संयुक्त महसूल, आकार व लाभाबाबत त्यांच्यात चर्चा होऊ लागली. 


> तुमच्या मते भविष्यातील उद्योग कोणता असू शकतो ? किंवा टाटा कोठे गुंतवणूक करू शकतो ?
हा प्रश्न कठीण आहे. आमच्या मोठ्या व्यवसायांकडे पाहाल तेव्हा स्टील उद्योग यातून हटणार नाही. तो उद्योगाचा नेहमीच पाया राहील. वेगवेगळ्या परिस्थितीतही हा उद्योग अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत राहील. स्टीलला कधीही रबर, लाकूड किंवा अॅल्युमिनियमचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. अशाच प्रकारे वाहतूकही आहे. त्यालाही पर्याय नाही. मात्र या वाहतूक क्षेत्रातील स्पर्धेमुळे व्यापार कठीण होऊ शकतो. 


> वाहतूक म्हणजे कार किंवा विमान उद्योगाशी संंबंधी म्हणायचे का ?
नाही. मी रस्ते वाहतुकीबद्दल बोलतोय. जवळपास जगातील सर्व कार कंपन्या भारतात आहेत. त्यामुळे स्पर्धा खूप आहे. परंतु आपण आयातीला बंद करता कामा नये. उलट त्यातून दर्जा वाढवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. या क्षेत्रात एकेकाळी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो. आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. बाजारपेठेतील आपले आधीचे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आपण काय करावे, असा प्रश्न स्वत:लाच िवचारला पाहिजे. 


> आज फांग (FAANG) अर्थव्यवस्था आहे. त्यात फेसबुक, अॅमेझॉन, अॅपल, नेटफ्लिक्स, गुगल आहे. यात तुम्ही असायला हवे होते ? 
या क्षेत्रात राहू शकलो असतो असे मला वाटत नाही. कोणतीही भारतीय कंपनी या क्षेत्रात टिकली असती असे मला वाटत नाही. कारण या क्षेत्रात यशस्वी होण्याची मानसिकता नसती. 


> तुमच्या संस्थेत स्टार्टअप्सला स्थान आहे ?
हो. स्थान आहे. मात्र अशी जागा भरतील असे लोक आमच्याकडे असतील असे मला वाटत नाही. सर्जेई ब्रिन व लॅरी पेज यांनी कॉलेजातून बाहेर पडताच गुगलविषयी विचार केला होता. ही गोष्ट भारतात होऊ शकते. मी त्यावर साशंक आहे.  


> एखाद्याची मानसिकता त्याला पारंपरिक क्षेत्रातच रोखून ठेवते का ?
आमची मानसिकता इतर कंपन्या उदाहरणार्थ- जनरल मोटर्स, जनरल इलेक्ट्रिक्स, ऑटोमोबाइल्स व स्टील कंपन्यांपेक्षा वेगळी नाही. इतर क्षेत्रांत जाणे म्हणजे एखाद्या बँकेला एक ब्लॉक व चेन कंपनी होण्यास सांगण्यासारखे आहे. असे होऊ शकत नाही. आमच्या काही कंपन्यांनी अशा काही लोकांना सोबत घेतले तर अशी बाब काही अंशी शक्य होऊ शकेल. नवीन मानसिकतेबरोबर आलेल्या अशा लोकांच्या मदतीने नवीन क्षेत्राबद्दल विचार केला जाऊ शकतो. 


भारताची वेळ आली आहे, परंतु अर्थव्यवस्थेला छोट्या-छोट्या गोष्टींनी नियंत्रित करणे याेग्य नाही. भलेही ते नेता किंवा अधिकाऱ्यांच्या मार्फत असो. ही गोष्ट थांबवली पाहिजे. तेव्हाच 
भारताला त्याची नियती असलेले 
ध्येय गाठता येईल. - रतन टाटा  

बातम्या आणखी आहेत...