Home | Editorial | Agralekh | Rational mathematics of power

सत्तेच्या गणिताचे तार्किक

दिव्य मराठी | Update - May 15, 2019, 10:17 AM IST

तामिळनाडूमधील वेल्लोर मतदारसंघात द्रमुकच्या उमेदवाराने पैशाचा भरमसाट वापर केल्याने आयोगाने तेथील निवडणूक रद्द केली.

  • Rational mathematics of power

    लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील ६० पैकी ५९ जागांचे मतदान बाकी आहे. तामिळनाडूमधील वेल्लोर मतदारसंघात द्रमुकच्या उमेदवाराने पैशाचा भरमसाट वापर केल्याने आयोगाने तेथील निवडणूक रद्द केली. निवडणुकांचा काळ खूप लांबल्याने सत्तेच्या गणिताची व खुर्चीच्या स्वप्नाची मांडणी करण्यास सगळ्याच पक्षांना खूप वेळ मिळतोय. शेवटच्या टप्प्याकडे जाताना हिशेब करण्याचे वेग वाढले आहेत. २३ मेनंतर आपला मित्र कोण असेल? याचा शोध प्रत्येक पक्ष घेतोय. मोदींसहित भाजप वा मोदींशिवाय भाजप वा काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडी किंवा प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी, या चार शक्यता डोळ्यासमोर ठेवून हालचाली होत आहेत. तमाम प्रादेशिक पक्षांना भाजप, काँग्रेसविरहित तिसऱ्या आघाडीचा पर्याय नेहमीच आकर्षित करत असतो.


    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांनी त्यासाठी जुळवाजुळवीची सुरुवातही केली. खरे तर निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा केसीआर यांचा प्रयत्न होता. तेव्हाच ते जमले नाही. यावरून त्यांनी समजून घ्यायला हवे. प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी उभी करणे, हे एवढे साधे व सोपे गणित नाही. कारण ज्यांना आघाडीत सामील करून घेण्यासाठी ते धडपडत आहेत, त्या संभाव्य घटक पक्षांमध्येच आंतर्विरोध मोठ्या प्रमाणावर आहेत. कथित तिसऱ्या आघाडीतल्या प्रत्येक पक्षाचा नेता हा पंतप्रधान पदाचा दावेदार आहे. हाच मोठा अडसर आघाडीच्या मार्गात आहे. तरी पण केसीआर यांची आघाडीसाठी धडपड आहेच. कदाचित तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांचा मुलगा केटीआरसाठी रिकामी करायची तर त्यासाठी दिल्ली गाठण्याचे त्यांचे गणित असावे. केसीआर यांनी द्रमुकचे मुख्य स्टॅलिन यांच्याशी तिसऱ्या आघाडीत सामील होण्याची बोलणी केली. पण स्टॅलिनना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत रस आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेही त्याच विचाराचे अाहेत.


    ममता बॅनर्जी २३ मेपर्यंत थांबा म्हणतात. पण काँग्रेसशी जुळवून घेण्याचा पर्याय त्यांनी खोडून काढलेला नाही. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारचा पाठिंबा बसपने काढून घेण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी मायावतींना केले होते. त्यास सक्त विरोध करत २३ मेनंतरच्या गणितात त्यांचा कल कुणाकडे असेल, हेच मायावतींनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले. राहुल गांधींनीही त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत मायावतींशी जुळवून घेण्याचा पर्याय खुला केला. उत्तर प्रदेशात ते एकमेकांचे शत्रू असले तरी दिल्लीत मैत्रीची त्यांना आशा आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी मात्र शेवटच्या टप्प्यातही प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या विरोधात बोलतच आहेत. असे सरकार आले तर देशात अस्थिरता माजेल, हा त्यांचा मुद्दा आहे. भाजपने २७२ चा जादुई आकडा गाठला तर मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता अधिक. पण ते न हाेता भाजपच्या आघाडीचे बहुमत झाले तर पंतप्रधान कोण होईल? संघ कोणाच्या पारड्यात वजन टाकेल? हे आज सांगता येणार नाही. आघाडी सरकार चालवण्याची क्षमता,कौशल्य कोणात आहे, हा निकष नेता निवडीसाठी महत्वाचा ठरेल.

Trending