आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाखेड शुगर्सचे सर्वेसर्वा रत्नाकर गुट्टे यांना सीआयडीकडून अटक, 15 दिवसांची कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधी कर्ज उचलून तो पैसा कारखान्यासाठी वापरल्याप्रकरणी गंगाखेड शुगर्सचे चेअरमन तथा रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांना मंगळवारी औरंगाबादच्या सीआयडी पथकाने ताब्यात घेतले. तत्पूर्वी सोमवारी सीआयडीने गुट्टे यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. या नोटिसीनुसार गुट्टे हे स्वतःहून गंगाखेड न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.


प्रकरण काय? : चेअरमन गुट्टे यांच्या कारखान्याने २०१७ मध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या नावे विविध बँकांकडून कर्ज उचलल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात राष्ट्रीय बँकांसह खासगी बँकांनीदेखील कर्ज दिल्याचे स्पष्ट झाले होते. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत कारखाना प्रशासनाकडे विचारणा केली होती. मात्र त्याबाबतचे कोणतेही समाधान न झाल्याने शेतकऱ्यांनी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते.


गंगाखेड पोलिस ठाण्यात गिरिधर सोळंके, नंदकुमार भालके व अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीच्या गुन्ह्यासह अन्य कलमानुसार गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास परभणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर हा तपास औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे(सीआयडी) वर्ग करण्यात आला. सीआयडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार रतनलाल शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुलसीदास मारुती अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग महादू पडवळ या तिघांना अटक केली होती. 


या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीआयडीने गुट्टे व कारखान्याचे सहायक व्यवस्थापक दत्तात्रय गायकवाड यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. 


सीआयडीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कांबळे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांचे एक पथक मंगळवारी गंगाखेडमध्ये दाखल झाले. गुट्टे व गायकवाड हे नोटिसीप्रमाणे न्यायालयात मंगळवारी दुपारी हजर झाले. न्यायालयाने दोघांनाही १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.   


न्यायव्यवस्थेवर विश्वास : गंगाखेडच्या राजकारणात रत्नाकर गुट्टे यांचे राजकीय शत्रू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी गंगाखेड शुगर्सच्या कर्ज प्रकरणात मोठा पाठपुरावा केला होता. पत्रकार परिषदेतून त्यांनी गुट्टे यांच्यावर गंभीर  आरोप केले होते. गुट्टे यांना अटक झाल्याने महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी ताब्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया आ. केंद्रे यांनी दिली.