आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratnprabha Kapoor Article About Mukt Vyapith, Examination

एक मार्क, एक मिनिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 1959 ची गोष्ट असावी. माझी दहावी बोर्डाची परीक्षा चालू होती. त्या काळी शिकवण्या नव्हत्याच. शाळेत जे सरांनी शिकवले त्याची घरी येऊन पुन्हा उजळणी करायची. वाचन, मनन, चिंतन केलं की झाला होमवर्क. परीक्षेच्या वेळी ब्राह्म मुहूर्तावर उठून अभ्यास करणे आवडायचे. दहावीची परीक्षा सुरू झाली. माझे सर्व पेपर चांगले गेले. शेवटच्या पेपरला माझा एक प्रश्न सुटला. म्हणजे लिहायचा राहिला. कारण वेळ संपली होती. त्या दिवशी पेपर घेतल्यावर प्रश्नपत्रिका वाचायला मला थोडा जास्त वेळ लागला. सर्व प्रश्नांची उत्तरे मी बरोबर लिहिली. परंतु एकच शेवटचा प्रश्न लिहीत होते. इतक्यात टोल वाजला. सरांनी भराभर पेपर घेण्यास सुरुवात केली. ते माझ्याजवळ आले तेव्हा मी पेपरवर हात ठेवून विनवणी केली, फक्त एक मिनिट द्या मला. परंतु काही न ऐकता हाताखालून पेपर काढून घेतला. त्या विषयात मार्क कमी पडणार हे माझ्या लक्षात आले आणि डोळे भरून आले. घरी आले. सर्वांनी विचारले, पेपर कसा गेला? मी घडलेली हकीकत सांगितली. भाऊ रागावले, ‘तूच दिरंगाई केली असशील. तुला वेळेचे भान राहिले नसेल, हळूहळू लिहीत असशील.’ नाना तर्‍हेची बोलणी ऐकून घ्यावी लागली. तेव्हा मला एका मार्काची किंमत कळली.

फक्त एका मार्काने माझे सुवर्णपदक
हुकले होते. हे सुवर्णपदक माझ्या मैत्रिणीनेच जिंकले होते व तिचा नागपूर बोर्डातर्फे सत्कार झाला होता. आज माझी नात हर्षित हिने डॉ. खेडकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिल्या बॅचमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. माझी उणीव तिने भरून काढली. आज माझी नात इंजिनिअरिंगला टॉप करते आहे. दुसरी नात मेडिकलला आहे. आमच्या घरात अभ्यासाचा कुणालाच कंटाळा नाही. सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका वाचनात जास्त वेळ घालवू नका.