आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशाल हाती घेऊन निघाल्या तेजस्विनी गर्द अंधाराला छेदून गेल्या रातरागिणी!

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राच्या २२ हून अधिक शहरांमध्ये महिलांचा नाइट वॉक
  • सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील महिलांनी दाखवली एकजूट

नगर- सावेडीतील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक रस्ता रविवारी रात्री वेगळाच भासत होता... महिला शक्तीमुळे या परिसराला नवचैतन्य प्राप्त झालं होतं... अंधाराला पराभूत करत, आजवरचं दडपण झुगारून देण्यासाठी दैनिक दिव्य मराठीने आयोजित केलेल्या या ‘नाइट वॉक’ची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली होती.  रात्री आठ, साडेआठपासूनच शहरातील महिला प्रेमदान चौकात जमायला सुरूवात झाली होती.  मशाली पेटवून घोषणा देत रात्री नऊ वाजता नाइट वॉकला प्रारंभ झाला. उपमहापौर मालन ढोणे, धर्मादाय आयुक्त हिराताई शेळके, महिला व बालविकास अधिकारी विजयामाला माने, ऊर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे व बेटी बचाव मोहिमेच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया, नगरसेविका आशाताई कराळे, सुरेखा विद्ये आदींच्या हस्ते मशाल पेटवून या नाइट वॉकला सुरुवात झाली. ‘बेटी बचाव’ची शपथ सर्वांनी घेतली. वॉकच्या मार्गावर नारी शक्तीचा विजय असो, हम सब एक है, भारतमाता की जय, नारी शक्तीचा मान, देशाचा मान... अशा घोषणा देण्यात येत होत्या. रचना कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाईट वॉकच्या मार्गावर रातरागिणीच्या लोगोवर आधारित रांगोळी रेखाटली होती. हेल्पिंग हँड फॉर हंगर्स ग्रूपच्या वतीने उपस्थितांना चहा व बिस्किटे देण्यात आली. शहर व उपनगरांतील विविध क्षेत्रातील महिला या नाइट वॉकमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्यात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनी, वकील, अभियंत्या, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापिका, खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्त्या, नगरसेिवका अशा अनेकजणींचा समावेश होता. या उपक्रमाबद्दल अनेक महिलांनी दैनिक दिव्य मराठीला मनापासून धन्यवाद दिले. प्रोफेसर कॉलनी चौकात समारोप करताना पथनाट्य सादर करण्यात आले. रात्री रस्त्यावर उतरलेली प्रत्येक ‘ती” पणती झाली होती.. हीच सामूहिक मशाल अंधाराला नामशेष करत नवी प्रकाशवाट दाखवणार आहे. “महिलांसाठी सुरक्षित शहर’ असे नगरचे वैशिष्ट्य तयार करण्यासाठी महिलाच पुढे सरसावल्या. रविवारी रात्री ९ वाजता सावेडीत ‘दिव्य मराठी’ आयोजित रातरागिणी नाइट वॉकमध्ये शहरातील शेकडो महिला “आम्ही रातरागिणी, नाही घाबरत जुलमी अंधाराला, छेदून-भेदून जाऊ त्या काळ्या गर्द अंधाराला...’ असे म्हणत अंधारावर मात करून गेल्या. असुरक्षित वातावरणामुळे कुठेही एखाद्या महिलेला दबाव सहन करावा लागू नये, तिच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन “दिव्य मराठी’ने वर्षातील सर्वात मोठी रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २२ डिसेंबरला रातरागिणी नाइट वॉकचे आयोजन केले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...