आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही अत्याचार हाणून पाडू, बंधनांना झुगारून टाकू, अकोला शहरातही या नाइट वॉकला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘होय आम्ही हाणून पाडू शकतो इथली पुरुषी, अत्याचारी, अहंकारी व्यवस्था ! आम्ही झुगारुन टाकू शकतो बंधनांचा अंध:कार. आम्ही उखडून फेकू शकतो वाईट प्रथा-परंपरांची विषारी रोपटे हे  व्यवस्थेला ठणकावून सांगण्याचं बळ आमच्यात आहे,’ असा सूर रातरागिणींनी नाइट वॉकमधून व्यक्त केला. निमित्त होते दैनिक दिव्य मराठीच्या पुढाकाराने आयोजित ‘मौन सोडू, चला बोलू’ या अभियानाचे. वर्षातील सर्वात मोठी रात्र असलेल्या २२ डिसेंबरच्या रात्री राज्यातील २२ शहरातील महिला अंधारावर चालून गेल्या. अकोला शहरातही या नाइट वॉकला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. शिक्षण, कृषी, आरोग्य, साहित्य, उद्योग, राजकारण, कला, अंगणवाडी सेविका, श्रमिक महिला, गृहिणी आदी विविध क्षेत्रातील महिलांसह महाविद्यालयीन युवती या नाइट वॉकमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. २२ डिसेंबरच्या नाइट वॉकच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून रातरागिणी उत्स्फूर्तपणे कार्यऱत होत्या. पथनाट्य, एकपात्री प्रयोग, प्रात्यक्षिके, कविता, वेषभूषा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पूर्ण तयारी झाली होती. मात्र दुपारच्या एका घटनेमुळे उद्भवलेल्या तणावाच्या परिस्थितीतही रातरागिणी डगमगल्या नाहीत. केवळ घडलेल्या घटनेमुळे कार्यक्रमाच्या वेळेत बदल करावा लागला. हा बदल होऊनही महिला नाइट वॉकला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. त्यांचा उत्साहदेखील भरभरून वाहत होता.अशोक वाटिकेतील सभागृहात शहरातील विविध भागातून महिला एकत्र आल्या. या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण करुन, तसेच रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या पाच रातरागिणींच्या हस्ते मशाली पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू, उद्देश व महत्त्व सांगणाऱ्या ‘दिव्य मराठी”च्या भूमिकेचे जाहीर वाचन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात सात रातरागिणींनी मनोगत व्यक्त केले. या मनोगतात त्यांनी, यापुढे आम्ही अंधाराला न घाबरता निर्भिडपणे समाजात वावरू, असे सांगत ‘दिव्य मराठी’च्या या अभियानाचे कौतुक केले व आभार व्यक्त केले. या वेळी रातरागिणींनी एकपात्री प्रयोग, पथनाट्य, कविता, क्रीडा प्रात्यक्षिक सादर केले.  

वेशभूषांचे आकर्षण  : या अभियानात महिलांमध्ये उत्सूकता होती. या अनुषंगाने विविध कार्यक्रमांसह रातरागिणींनी आदिशक्ती, कालीमाता, भारतमाता, मॉ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले,  आदी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. या वेशभूषा नाइट वॉकचे आकर्षण ठरले.
छायाचित्रे, वृत्तांत उद्याच्या अंकात.

अकोल्याच्या लेकी, दाखवूया एकी 
अभियानाच्या उद्घाटनानंतर रातरागिणींनी परिसरात नाइट वॉक काढला. यामध्ये ‘मौन सोडू, चला बोलू’, ‘अकोल्याच्या लेकी, दाखवूया एकी’, ‘एक होऊ अंधार भेदू’, ‘हात लावाल खाक व्हाल’ आदी विविध घोषणा देणारी फलक हातात घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. घोषणा देत महिलांनी नाइट वॉक पूर्ण केला.  

बातम्या आणखी आहेत...