आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळोखाचा दोरखंड तोडत रातरागिणींनी पेटवली मशाल; पाच महिलांच्या हस्ते नाईट वॉकचे उद्घाटन, पथनाट्यातून केला जागर

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सावित्री ज्योतिबा फुले समाजशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर

यवतमाळ- दैनिक दिव्य मराठीच्या वतीने मौन सोडू चला बोलू अभियानांतर्गत रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी तिरंगा चौकातून काढण्यात आलेल्या 'नाईट वॉक'चे उद्घाटन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि रात्रीलासुद्धा कर्तव्य बजाविणाऱ्या पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून मोठ्या थाटात करण्यात आले. तद्नंतर नाईट वॉकला सुरूवात करण्यात आली. रात्री उशिरा पेटलेली मशाल घेवून महिलांनी ह्या वॉकमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. शहरातील विविध समाजिक, राजकीय संघटनांसह सर्वसामान्य महिलांची वॉकमध्ये लक्षणीय उपस्थिती होती.

महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सर्वचस्तरातून केल्या जाताे. हा आवाज बुलंद व्हावा, ह्या दृष्टीने दैनिक दिव्य मराठीने मौन सोडू चला बोलू उपक्रमांतर्गत अंधारावर चालून जाणार रातरागीणी ह्या उपक्रमाचे आयोजन केले होते. वर्षांतील सर्वांत मोठी रात्र असलेल्या २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजतापासूनच स्थानिक तिरंगा चौकात महिलांच्या गर्दीला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सावित्री ज्योतिबा फुले समाजशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. सादर केलेल्या पथनाट्यात सामाजिक जाणीवतेची जाणं करून देण्यात आली. त्याचप्रमाणे महिलांसाठी प्रेरणादायी असलेले गीत सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचीच वाहवाही मिळवून घेतली. त्यानंतर यंग इंडीया फोरमच्या सदस्यांसह अस्तित्व फाऊंडेशनच्या महिलांनीसुद्धा पथनाट्य सादर केले. 

या पथनाट्यातून समाजजागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई वैशाली खीरडकर, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कार्यरत तथा महाराष्ट्र गव्हरमेंट नर्सेस असोसिएशनच्या उपाध्यक्ष परिचारीका छाया मोरे, नगर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी लता गोंधळे, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक संगिता सरोदे, केटरींगचा व्यवसाय करणाऱ्या नयना लभाने यांच्या हस्ते मशाल पेटवून नाईट वॉकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद माधूरी आडे यांनी विचार व्यक्त करून नाईट वॉकचे कौतूक केले. त्याचप्रमाणे दैनिक दिव्य मराठीने ह्याचे आयोजन केल्यामुळे आभारसुद्धा मानले. विशेष म्हणजे कु. ज्ञानदा देशमुख ह्या चिमुकनेसुद्धा विचार व्यक्त केले. मान्यवर महिलांचे भाषण आटोपताच नाईट वॉकला सुरूवात झाली. नाईट वॉकमध्ये बिनधास्त चालून आपणही अंधाराला घाबरत नसल्याचे महिलांनी दाखवून दिले. रॅलीमध्ये विविध क्षेत्रात नावलौकी केलेल्यांची वेशभूषा परिधान करून मुलींनी सहभाग नोंदविला. नाईट वॉक दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचीत घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 

बातम्या आणखी आहेत...