आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारावर चालून गेल्या रातरागिणी; हजारो महिलांचा बीड, माजलगावमध्ये नाइट वॉक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तायक्वांदोच्या प्रात्यक्षिकांचा थरार

बीड- २२ डिसेंबर ही वर्षातील सर्वात मोठी रात्र.  दिव्य मराठीच्या ‘मौन सोडू, चला बाेलू’ या अभियानाच्या पुढील टप्प्यात रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी रविवारी (दि. २२) रात्री नऊ वाजता बीड शहर आणि माजलगाव शहरात महिलांनी नाइट वॉक काढला. रातरागिनींची अंधारावर मात अशी भूमिका घेत ही मशाल रॅली काढण्यात आली.  दोन्ही ठिकाणच्या नाइट वॉकमध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. शेकडोंच्या संख्येने महिलांनी सहभागी होत अंधारावर मात करण्याचा निर्धार केला. बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुलेंच्या पुतळ्यास  अभिवादन करून हातात मशाल घेत नाइट वाॅकला सुरुवात झाली. तत्पूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला परिचारिका शीला मुंडे, एसटी वाहक सीमा कांबळे, पोलिस उपनिरीक्षक राणी सानप, पोलिस कर्मचारी बबिता इंगोले, शेतकरी मोहराबाई कापसे, स्वयंपाकी महिला प्रतिनिधी वैशाली भट, सफाई कर्मचारी जया कटक, वनिता साबळे यांच्यासह इतर महिलांच्या उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून नाइट वॉकला सुरुवात झाली. यानंतर  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सांगली बॅक कॉर्नर मार्गे सुभाष रोडहून अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केले.  छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नाइट वाॅकमध्ये हजाराे महिलांनी सहभाग नोंदवला. विविध प्रकारच्या घोषणा महिलांनी दिल्या.

तायक्वांदोच्या प्रात्यक्षिकांचा थरार 
 
महिलांनी स्वसंरक्षणासाठी सज्ज रहावे, कोणत्याही परिस्थितीत न घाबरता परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असावे असा संदेश देण्यासाठी विद्यार्थिनींनी प्रशिक्षक जयश्री बारगजेंच्या नेतृत्वात तायक्वांदोचे चित्तथरारक प्रात्यक्षिके या वेळी सादर केली. टाळ्या वाजवून इतर महिलांनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले. बंधनं तोडीत तू यावं... गाण्याला प्रतिसाद 
 
नाइट  वॉकच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले व मैत्री मंचच्या महिलांनी ‘तू यावं, समतेच्या वाटेनं, बंधन तोडीत यावं...’ हे गीत सादर केले. महिलांनी या गीताला प्रतिसाद दिला. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे यांनीही गीत सादर केले. 

महिलानी आता सक्षम बनावे : अजित कुंभार
 
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत महिलांनी सक्षम बनावे, दिव्य मराठीच्या वतीने आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले. मशाल रॅलीचे उद्घाटन करताना पोलिस उपनिरीक्षक राणी सानप, पोलिस कर्मचारी बबिता इंगोले, परिचारिका शीला मुंडे, एसटी वाहक सीमा कांबळे, मोहराबाई कापसे, जया कटक आदी.