म्‍हटलं करून पाहू...केलं! / म्‍हटलं करून पाहू...केलं!

रवींद्र चुनारकर

Aug 12,2018 06:53:00 AM IST

तसा तो इंजिनियर. पण गावाच्या समस्या त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. कधी दारूचा महापूर, तर कधी आदिवासींचे नाकारले जाणारे हक्क. सगळंच त्याला टोचत होतं. यावर उत्तरं शोधण्यासाठी तो डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी सुरू केलेल्या ‘निर्माण’ उपक्रमात गेला. तेथून थेट ‘वयम’च्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवर लहान मुलांसाठी त्याने काम केलं. आता तो सीएम फेलो बनून गडचिरोलीच्या आदिवासी भागात नागरिकांच्या हक्कासाठी लढा देतोय.

मी मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ गावचा. जवळपास ४०० लोकवस्तीचं हे गाव. प्राथमिक शिक्षण गावातच झालं. उत्तम शिकून नोकरी मिळवावी आणि शहरात स्थायिक व्हावे, अशी घरच्यांची एकमेव अपेक्षा होती. यात गाव सोडणं महत्त्वाचं, कारण गावातील ८० ते ९० टक्के लोक दारू पिणारे. त्यातले ३० ते ४० टक्के लोक जुगार खेळणारे. एकंदरीत विकास आणि विचारांच्या दृष्टीने गाव खूपच मागासलेलं. पण लहानपणापासून गावातच वाढल्यामुळे या समस्यांना बघतच मोठा होत गेलो. त्यामुळे या समस्या केवळ गावाच्या असं कधीच वाटलं नाही. त्या समस्या माझ्याही होत्या. त्या त्रयस्थपणे बघणं मला शक्यच नव्हतं.

गावात मुख्य प्रश्न होता दारूचा. या दारूचा सोक्षमोक्ष लावणं मला फारच महत्त्वाचं वाटत होतं. २०१४ च्या डिसेंबरचा एक दिवस असावा. हातभट्टीवरील दारू काढणे आणि विकणे बंद केले जाऊ शकते, ही कल्पना मी गावातील चार मित्रांसमोर मांडली. त्यांचा नकार नव्हता, पण विश्वासही नव्हता, की हे आपण करू शकू. कारण गावातील महिलांनी दोनदा दारूबंदीचा प्रयत्न केला होता, पण तो व्यर्थ ठरला. त्यामुळे घिसडघाई चालणार नव्हती. तत्पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने दारूबंदी करण्यात आली होती. यासाठी त्यांनी दिलेला लढा, केलेले प्रयत्न आणि अभ्यास याबद्दल मी ऐकलं होतं. त्यामुळे संपूर्ण गावाचा आणि दारूच्या व्यवहाराचा अभ्यास केला. गावातील दारू पिणारे व जुगार खेळणाऱ्यांची संख्या काढली. प्रत्येक घरातून महिन्याला किती रुपये खर्च होतात त्याचा तपशील तयार केला. यात एक महिना निघून गेला. जानेवारी २०१५ मध्ये ‘निर्माण ६’चे पहिले शिबिर झाले. या शिबिरात प्रथमच डॉ. अभय बंग यांच्याशी परिचय आला. माझ्यासारखे विचार करणारे अनेक जण मला तिथे भेटले. आपण दारूबंदीचं काम करू शकतो, असा विश्वास वाटू लागला. गावात गेल्या-गेल्या काम सुरू केलं. सर्वप्रथम निवेदनपत्र लिहिलं. सगळ्या गावाची जाहीर सभा घेतली. त्यात आम्ही आमची बाजू मांडली. गावकऱ्यांनी होकार दिला. चार दिवसांची सवलत देऊन दारू पूर्णपणे बंद करण्याचं आवाहन केलं. आम्ही दहा मुलांची नावं गावच्या ग्रामसुरक्षा दलामध्ये दिली. आपल्या मनासारखं घडतंय म्हणून आम्ही सुरुवातीला खूप खुश होतो. पण आम्ही नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचारच केला नव्हता. त्यामुळेच एक महिना जवळ-जवळ ६० ते ७० टक्के दारू बंद राहिली. पण हळूहळू परिस्थिती हातातून सुटू लागली. हातभट्टीने दारू काढणारे परत लपून-छपून दारू काढू लागले. आम्ही पुन्हा गावाची सभा घेतली. पण या वेळी चित्र बदललेलं होतं. लोक आमच्याविरोधात बोलू लागले होते. साहजिकच आमचं मनोबल खचू लागलं. पण एक गोष्ट कळली की, या प्रकारचं धोरण सुरू करणं तर सोपं असतं, पण ते टिकवून ठेवणं खूप कठीण. ४०० लोकांच्या गावात जर हे काम करायला इतक्या अडचणी येत असतील तर पूर्ण जिल्हा दारूमुक्त ठेवणं...? खरंच खूप मोठं आव्हान ठरतं हे.

या दरम्यान इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष सुरू झालं. जानेवारी २०१६ ला ‘निर्माण’च्या तिसऱ्या शिबिरादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण विकास आणि मुलांचे कृतिशील शिक्षण या संबंधात काही तरी काम करायचे, हा माझा विचार पक्का झाला. याच दरम्यान ‘निर्माण’तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कर के देखो’ फेलोशिपसाठी फेलो म्हणून माझी निवड झाली. त्यानुसार मे महिन्यात माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यात आदिवासींसाठी काम करणाऱ्या “वयम” या संस्थेला भेट दिली. त्याचं काम समजून घेतलं. १५ दिवस ‘वयम’मध्ये प्रत्यक्ष काम करून पाहिलं आणि संस्थेच्या ‘बिन बुका, या शिका’ या नवीनच सुरू झालेल्या उपक्रमासोबत एक वर्ष काम करण्याचं निश्चित केलं. पण जसा जव्हारला पोहोचलो, स्तब्धच झालो. सगळ्या कल्पना ‘इज इक्वल टू झीरो’ झाल्या. तीन खोल्यांची कौलारू भाड्याची खोली, म्हणजेच “वयम्”चं कार्यालय. सकाळी सहाला उठून पाणी भरलं नाही, तर पिण्याचे आणि अंघोळीचे हाल. अगदीच जर्जर व जुनी इमारत आणि तेच ऑफिस कम घर. दिवसभर तिथेच काम करायचं. रात्री तिथेच झोपायचं. माझे कम्फर्ट झोन मला चिमटे घेऊ लागले. मी तिथे काम न करण्याचं ठरवलं. पण जेव्हा मी परत घरी यायला निघालो, तेव्हा माझ्यातला मी मला टोचून-टोचून विचारू लागला.रात्रभर विचार सुरू होते. विचारत करत चंद्रपूरच्या स्टेशनवर आलो. पण गाडीतून खाली जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वीच ठरवलं, मागे हटायचं नाही, ‘वयम’ मध्ये काम करायचं!

परतलो. पाच पाड्यामधील मुलांसोबत ‘बिन बुक या शिका’ हा उपक्रम राबवण्याचं काम सुरू झालं. हा उपक्रम शाळाबाह्य वेळात म्हणजे शनिवारी आणि रविवारी होता. मग बाकीचे दिवस ‘वयम’च्या इतर कामात (आदिवासी हक्क व कायदे) सहभाग घ्यायचो. गावात गेल्यानंतर कुणाच्याही घरी जाऊन सांगायचो की, मी तुमच्याकडे राहायला व खायला येणार आहे. ते जे बनवतात, तेच खायचं, ते जसे राहतात तसच राहायचं. त्यामुळे मुलांसोबत रुळायला फार वेळ लागला नाही. हळूहळू काम समजू लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, माझी सामाजिक कामाची व्याख्या बदलली. मला आनंद मिळू लागला. शांत झोप लागू लागली आणि प्रत्येक दिवशी काही तरी नवीन शिकायला मिळू लागलं. इथेच वनहक्काच्या अपील अर्जांसाठी आम्ही अख्खा जव्हार तालुका पिंजून काढला. लोकांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून काम करताना फार आनंद व्हायचा आणि जिंदगी वसूल झाल्यासारखी वाटायची! याच कामाचा आणि अनुभवांचा उपयोग मला आता मुख्यमंत्री ग्रामीण विकास ‘फेलो’ म्हणून काम करताना होतोय. मागील एक वर्षापासून मी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील आरकतोंडी या ग्रामपंचायतीत फेलो (ग्रामपरिवर्तक) म्हणून काम करतोय. त्यात शेतीच्या विविध योजना, शाळा आणि अंगणवाड्यांचा विकास, कौशल्य विकास, युवकांचे एकीकरण अशा विविध विषयांवर आजवर मला काम करता आलंय. यासोबतच रखडलेली कामे मार्गी लावण्यास मदत करणे, हाही माझ्या कामाचा महत्वाचा भाग आहे. माझ्या गावाची नळयोजना मागील तीन वर्षांपासून बंद होती. परंतु मी आणि ग्रामपंचायतमधील पदाधिकारी मिळून ती नळ योजना सुरू केली. अशा वेळेस फक्त गरज असते, ती निर्णय घेण्याची.

पुढच्या दृष्टीने विचार केला तर या फेलोशिपचा एक मोठा फायदा असा की, मला भविष्यात कुठल्या एका मोठ्या प्रश्नावर काम करायचं आहे, याची कल्पना येते आहे. शासनाच्या विविध योजना आणि त्यामधील अडचणी इत्यादींची माहिती मिळत आहे. मला भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातच ग्रामीण विकासासबंधी काम करायचं आहे. कारण, समस्या दुसऱ्याची असं काही नसतंच. ती आपलीच असते आणि आपण सोडवायचीही असते...

[email protected]

(शब्दांकन : स्वप्निल अंबुरे )

X