आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर घेताय...?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून अशी मराठी म्हण आहे. लग्न करतेवेळी आणि घर बांधताना पुरेशी चौकशी करायला हवी, दक्षता ठेवायला हवी, असा म्हणीमागचा अर्थ. मात्र घरासारखी मोठी, कायमस्वरूपी गुंतवणूक करताना छोटीशी चूकही महागात पडू शकते. नवरा-बायको असं दोघांनी मिळून घर घेणं असो अथवा एकट्या महिलेनं गुंतवणूक करणं असो, काळजी घ्यायलाच हवी. त्या दृष्टीनं उपयुक्त ठरतील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी.

 

स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी व्यक्तीची आयुष्यभराची कमाई पणाला लागलेली असते. ज्यांना हे शक्य होत नाही ती मंडळी बँकेचं कर्ज काढतात. आयुष्यभर भलं मोठं व्याज भरतात. घर घेतेवेळी डीलर घराच्या कागदपत्रांसह काही कागदपत्रं तुमच्याकडे देतो. ज्यामधे संपत्तीचं विवरण असतं. मेंटेनन्स, पार्किंग, टॅक्स, रजिस्ट्रीची किंमत, पूल, क्लब हाऊस इत्यादींची माहिती असते. बऱ्याचदा या सगळ्यांची अवास्तव किंमत प्रॉपर्टी डीलर ग्राहकांकडून वसूल करत असतो. 

 

टायटल व्हेरिफिकेशन
टायटल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ग्राहक अथवा गुंतवणूकदाराला ही माहिती मिळू शकते की जी प्रॉपर्टी तो खरेदी करतो आहे त्यावर ती विकणाऱ्याचा अधिकार आहे का? म्हणजे ज्याच्याकडून मालमत्ता विकत घेतली जातेय तो त्या मालमत्तेचा खरा मालक आहे किंवा नाही. संपत्ती विकणाऱ्याला ती विकण्याचा, हस्तांतरित करण्याचा हक्क आहे किंवा नाही हे कन्फर्म केल्याशिवाय स्थावर मालमत्ता विकत घेऊ नये.  शिवाय टायटल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून संबंधित मालमत्तेसंदर्भात काही कायदेशिर कारवाई सुरू नाहीए नं हे ही तपासून पाहता येतं. आपल्या वकीलामार्फंत संपत्ती विकत घेणाऱ्यांनी टायटल व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कुठलाच निर्णय घेऊ नये.

 

पूर्ण माहिती लिखित स्वरूपात
स्थावर मालमत्तेच्या संदर्भातला कुठलाही व्यवहार पूर्णपणे लिखीत स्वरूपात केेलेला असावा. विक्रेता-ग्राहक अॅग्रीमेंटमधले नियम, अटी आणि शर्ती, ग्राहकांचे हक्क, ग्राहकाला मालमत्ता सोपवली जाण्याचा निश्चित कालावधी, मालमत्तेचा कार्पेट एरिया इत्यादी सर्व माहिती लिखित स्वरूपात तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. ज्या भागात घर घेणार आहात त्या भागातले रजिस्ट्री चार्जेस वगैरेची माहिती करून घ्या. 

 

‘सँपल’वर विश्वास नको
फ्लॅट वगैरेच्या संदर्भात बिल्डर ग्राहकांना नेहमी सँपल फ्लॅट पाहण्याचा आग्रह करत असतो. पण बरेचदा हे सँपल फ्लॅट वास्तवातल्या घरांपेक्षा खूप वेगळे असतात. सँपल फ्लॅटमधल्या सुविधा जसं की सिलींग, आकर्षक लाईट फिटींग, घराची रंगसंगती, मॉड्यूलर किचन इत्यादीचं प्रलोभन ग्राहकांना दाखवलं जातं. अशा वेळी बिल्डरला या सुविधा तुमच्या नवीन घरामधेही नक्की दिल्या जाणार आहेत की नाही याची खात्री करून घ्या. 


‘हिडन चार्जेस’ची किंमत नका मोजू
बिल्डरकडून आलेल्या कागदपत्रांमधल्या सगळ्या सुविधांसाठी आकारलं जाणारं शुल्क काळजीपूर्वक तपासा. त्यातलं काही कळलं नाही तर तज्ज्ञाकडून समजावून घ्या. तुम्ही ज्या सुविधांसाठी पैसा मोजता आहात तो योग्य आहे की नाही हे तपासा. अनेकदा मालमत्तेशी संबंधित सुविधा नसतानाही त्याचं शुल्क आकारलं जातं. याबद्दल बिल्डरला प्रश्न विचारा. उत्तर मिळण्यास टाळाटाळ झाली तर धोक्याचा इशारा समजून घ्या. बऱ्याचदा बिल्डर पार्किंगसाठी वेगळी जागा न देता ओपन पार्किंग देतात. ओपन पार्किंगसाठी सामान्यपणे शुल्क आकारलं जात नाही.  

 

‘ऑनलाइन’ची विश्वासार्हता 
आजकाल मालमत्तेची माहिती ऑनलाइन देण्याची पद्धत सुरू आहे. मात्र, ऑनलाइनवरची माहिती 
आणि प्रत्यक्षातली माहिती यात बरेचदा विरोधाभास दिसतो. त्यामुळे विश्वासू माहितगाराकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. 

 

‘रेरा’ची मदत घ्या 
बिल्डरनं दिलेल्या माहितीबद्दल शंका असेल तर ‘रेरा’च्या वेबसाइटवर जाऊन माहिती घ्या. या वेबसाइटवर मालमत्तेसंदर्भातली सर्व माहिती जसे, मालमत्तेची नोंदणी, मालकी हक्क वगैरे, प्रत्येक राज्याची स्वतंत्र वेबसाइट आहे. त्यावर माहिती करून घेऊनच अंतिम निर्णय घ्या. घर अथवा फ्लॅट बघितल्यानंतर खूप आवडला म्हणून घाईत व्यवहार केला जातो. गुंतवणूक केली जाते. मात्र मालमत्ता खरेदी करण्याआधी कुटुंबाशी चर्चा करा. जिथं मालमत्ता घेणार आहात त्या जागेची भविष्यातली किंमत लक्षात घेऊनच निर्णय घ्या.

बातम्या आणखी आहेत...