आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविकांत तुपकरांची १८ दिवसांत काेलांटउडी; पुन्हा आठवला ‘स्वाभिमान’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर/ नाशिक - अवघ्या १८ दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ साेडून सदाभाऊ खाेत यांच्या रयत क्रांती पक्षात प्रवेश घेणारे युवा नेते रविकांत तुपकर पुन्हा काेलांटउडी घेत बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काेल्हापुरातील पत्रकार परिषदेत तुपकर यांना पुन्हा जुना लाल बिल्ला लावला. गेल्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना ‘स्वाभिमानी'पासून फोडून भाजपने राजू शेट्टी यांची ताकद कमी केली होती. मात्र या वेळी तुपकरांना फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. भाजपने दिलेले आश्वासन न पाळल्याने तसेच खाेतांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने पश्चात्ताप झालेले तुपकर पुन्हा स्वगृही परतल्याची माहिती आहे.

२०१४ च्या निवडणुकीत बारामतीतील धनगर आंदोलन असो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन असो, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर या दोन शिलेदारांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या विरोधात उठवलेल्या आंदोलनांमुळे भाजपचा सत्ताप्रवेश सुकर झाला होता. त्यानंतर मंत्रिपद देऊन खोत यांना राजू शेट्टींपासून फोडण्यात भाजपला यश आले होते. तर जानकरांना भाजपने दुसऱ्या टप्प्यात मंत्रिपद देत खुश करण्यात आले. मात्र या विधानसभा निवडणुकीत रासपची फक्त एका जागेवर बोळवण केली. रासपचे मावळते आमदार राहुल कुल या वेळी भाजपच्या ‘कमळ' चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जानकर भाजपवर नाराज आहेत.

तुपकरांचा डाव फसला
एनडीएतून बाहेर पडण्याच्या राजू शेट्टींच्या निर्णयाचे समर्थन करत रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानीत प्रदेशाध्यक्षपद मिळवले हाेते. मात्र विराेधी पक्षात जास्त काळ राहण्याचा संयम नसल्याने त्यांनी भाजपशी संधान साधले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘रयत’मध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यांनीही ताे ऐकला. मात्र अवघ्या १८ दिवसांतच त्यांना पश्चात्ताप झाला. चळवळीतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने अखेर तुपकर पुन्हा शेट्टींकडे आले.

चळवळीसाठी पुन्हा स्वाभिमानीत 
स्वाभिमानी साेडल्यापासूनच अस्वस्थ हाेताे. ‘रयत’मध्ये जाण्याचा निर्णय घोडचूक हाेती. तिकडे आश्वासने भरपूर हाेती, पण शेतकऱ्यांच्या हिताचं बाेलता येणार नव्हतं. चळवळ जिवंत रहावी म्हणून पुन्हा स्वाभिमानीत आलाे.  - रविकांत तुपकर
 
... असाे, तुपकरांना शुभेच्छा
^ सकाळीच तुपकरांशी बाेलणे झाले. काही  कारणास्तव आपण आज प्रचारात सहभागी हाेणार नसल्याचे त्यांनी सांगितले हाेते. मात्र पक्ष साेडण्याबाबत चर्चा झाली नाही. असाे, त्यांना शुभेच्छा.
- सदाभाऊ खाेत, अध्यक्ष रयत क्रांती

बातम्या आणखी आहेत...