आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदवाडीचे तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र भापकर यांना नॅशनल आयसीटी पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - सरदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रवींद्र शहाजी भापकर यांची राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (नॅशनल आयसीटी अवॉर्ड) पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार २१ ला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. या शिक्षकाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाची टीम सरदवाडी येथे आली होती. 


सरदवाडीची लोकसंख्या १२५० असून बहुसंख्य लोक ऊसतोडणीसाठी जातात. मात्र, त्यांची मुले शिक्षणासाठी गावातच आहेत. भापकर गेल्या सहा वर्षांपासून अध्यापनात संगणकाचा वापर करत आहेत. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी शिक्षण विभागाला त्यांची मदत होते. पाच वर्षांपूर्वी भापकर यांनी शाळेतील विद्यार्थी खासगी संस्थेच्या स्पर्धा परीक्षेत बसवली होती. त्यावेळी त्यांनी पॅकेजमध्ये एक आॅनलाईन टेस्ट मोफत दिली होती ही टेस्ट मुलांनी उत्साहाने सोडवली. त्यानंतर दुसऱ्या टेस्टसाठी संस्थेने १०० रुपये फी ठेवली होती. ही फी मुलांना भरणे शक्य नव्हते. अशा वेळी मुलांची ज्ञानांची कक्षा उंचवावी. म्हणून भापकर गूगल, यूट्यूबच्या मदतीने आॅनलाईन टेस्ट बनवायला शिकले. विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी ब्लॅागची निर्मिती केली. त्याद्वारे या टेस्ट राज्यात सर्वांपर्यत पोहोचवल्या. भापकर यांचे संकेतस्थळ राज्यातील सर्वाधिक आवडते बनले. या संकेतस्थळावर २७ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या. राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांना सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. म्हणून त्यांनी ravibhapkar.in या संकेतस्थळाची निर्मिती केली. विद्यार्थ्यांसाठी िवविध अँड्रॉइड अॅप्सची निर्मिती केली. राज्यातील प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही व्हावा यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिकसह राज्यात १०० कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षणाची वारी या शासनाच्या उपक्रंमातर्गत सलग २ वर्ष राज्यातील विविध ठिकाणी जाऊन शिक्षकांना मार्गदर्शन पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकातील क्यू आर कोडसाठी लागणााऱ्या ई-कंटेटची निर्मिती केली. त्यांनी बनवलेल्या डिजिटल कंटेटचा बालभारतीच्या पुस्तकात वापर होत आहे. शासनाच्या मित्रा, तसेच दिक्षा अॅप विकासनात महत्त्वाची भुमिका, ग्लोबल नगरी उपक्रमातर्गंत विदेशी भारतीयांशी शाळेतील मुलांच्या व्हिडीओ काॅन्फरन्सचे आयोजनात महत्वपूर्ण सहभाग. त्यांच्या कामाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. व त्यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवरून उपक्रमचा फोटो टाकून पोस्ट करून सन्मान केला. बालभारती पाठ्यपुस्तकातील क्यू आर कोडमधील ई-कंटेट निर्मितीबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीदेखील सन्मान केला आहे. मायक्रोसाॅफ्ट कंपनीकडून इनोव्हेटीव्ह एज्युकेटर म्हणून सन्मान झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भापकर यांचा सन्मान केला आहे. 


हा पुरस्कार सन २०१० पासून राज्यातील तीनच शिक्षकांना मिळाला आहे. त्यानंतर भापकर यांच्या रूपाने हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील तेही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. 


भापकर यांच्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाची गोडी लागली आहे. रिकाम्या वेळात ते मुलांसाठी संगणकावर नवनवीन प्रोग्राॅम तयार करत असतात. त्यांच्यासोबत राहून आता मलाही संगणकांची गोडी लागली आहे, असे सदरवाडी जि. प. शाळेतील शिक्षक विनोद सोनवणे यांनी सांगितले. 

 

भापकर यांचा आम्हाला अिभमान... 
भापकर सरांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांच्यामुळे आमच्या छोट्याशा वाडीचे नाव राष्ट्रीयस्तरावर गेले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमची मुले संगणकाचा वापर करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे. रामदास शिरसाठ, सरपंच, सरदवाडी. 


सरांमुळे संगणक समजले 
भापकर सर आल्यामुळे मला संगणक काय असते हे समजले व मी त्याचा वापर करू लागलो. त्यामुळे घटक समजण्यास सोपे जाते. मीही मोठा होऊन असेच काम करणार व गावाचे नाव मोठे करणार. सरांना पुरस्कार मिळाल्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे. सागर बापूराव सानप, विद्यार्थी, इयत्ता चौथी. 
 

बातम्या आणखी आहेत...