आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डरकाळीचा थरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्यप्राणी प्रगणनेच्या प्रयोगात आणल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी ‘भूखंड प्रगणना’ (Block Count) ही एक मान्यताप्राप्त पद्धत आहे. एक भूखंड निवडायचा, त्यातील प्रत्यक्ष दिसणाऱ्या सर्व प्राण्यांची नोंद करायची. प्राण्यांची स्थळनिहाय संख्या, आकारमान(मोठे/मध्यम/लहान) व लिंग यांच्या आधारे नोंदीतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करायचे. अशा विश्लेषणानंतर भूखंडांच्या क्षेत्रात प्रजातीवार प्राण्यांची संख्या निश्चित करण्यात येते. अशा पद्धतीने प्रति चौरस कि.मी. सरासरी प्राणी संख्येचा अंदाज बांधला जातो. हिवाळ्याच्या दिवसात चारा-पाण्याची उपलब्धता सर्वत्र असल्यामुळे बहुतांश वन्यप्राणी जंगलात समप्रमाणात विखुरलेले असतात. त्यामुळे भूखंड पद्धतीची प्रगणना हिवाळ्यात आयोजित केली जाते. या प्रगणनेच्या कार्याची पूर्ण जबाबदारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संशोधन अधिकारी या नात्याने माझ्यावर होती.


१९९२ मध्ये रायपूरच्या जंगलातील भुखंडात प्रगणना करण्यासाठी मी तेथील वन विश्रामगृहात पोहोचलो.  नियोजित भूखंड रायपूरपासून आठ कि.मी. अंतरावरील चुनखडी गावाकडे तलईच्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर होता. दुसऱ्या दिवशी सूर्य उजाडताच प्रगणना सुरू करायची म्हणून दुपारनंतरच भूखंडाजवळ जाऊन अंदाजे एक कि.मी. अंतरावर रात्री मुक्काम करण्याचे ठरले. मी, वनपाल, वनरक्षक बेलसरेंसह चार वनरक्षक व पाच श्रमिक असा अकरा लोकांचा चमू मुक्कामाच्या साहित्यासह जीपने निघालो. तलईपर्यंत (पाच कि.मी.) जीप पोहोचू शकली. पुढचे तीन कि.मी. पायीच कूच केली. रस्त्याने जाताना खूप घाण वास यायला लागला. आम्ही दुर्गंधीचा स्रोत शोधून काढला. रस्त्यापासून काही अंतरावर खोलगट भागात एका नर गव्याचा मृतदेह पडलेला होता. गव्याच्या पुठ्ठ्याचा भाग नदारद होता. मानेवर सुळ्यांनी केलेली छिद्रे दिसत होती व त्यातून रक्तस्राव होऊन रक्त गोठल्याचे दिसत होते. निरीक्षण केल्यावर ही वाघाने केलेली शिकार आहे हे सहज लक्षात आले. शिकार दोन दिवसांपूर्वीची असावी. आमचे नियोजित मुक्कामाचे ठिकाण तेथून दीड कि.मी. अंतरावर होते. वाघ शिकारीवर परत येणार हे निश्चित होते व प्रत्यक्ष व्याघ्रदर्शनाची संधी होती, परंतु अंधारून येण्यापूर्वी मुक्कामाचे ठिकाण गाठणे आवश्यक असल्यामुळे आम्ही मन घट्ट करून पुढे निघालो. 


पुढे जात असता रस्त्याच्या कडेला  दूरवर असलेल्या टेकडीवरून वाघाची डरकाळी कानी पडली. काही क्षणांनंतर पुन्हा आवाज आला. वनरक्षक बेलसरे म्हणाले, ‘सर, शेर शिकार पर वापीस आयेगा. आपुन ऐसा करते, सामान मुकाम पे रखकर शेर देखने के लिये वापस आते.’ वेगाने चालत उर्वरित अंतर कापून आम्ही मुक्कामाच्या जागी पोहोचलो. लहानशा नाल्यानजीक एक सपाट मोकळी जागा मुक्कामासाठी निवडली. साफसफाई इत्यादी व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन आम्ही पाच लोक वाघाने केलेल्या शिकारीजवळ परत जाण्यासाठी निघालो. डोंगरावरून त्याच दिशेने पुढे जाणाऱ्या वाघाचा आवाज सतत कानी पडत होता. शिकारीच्या स्थळापासून ४०-५० मीटर अंतरावर आम्ही थांबलो. मृत गवा गवतामुळे दिसून येत नव्हता. परंतु वाघ गव्यापाशी आला की, रस्त्यावर नक्की येईल अशी आम्हाला खात्री होती. आता सूर्यप्रकाश कमी होऊ लागला होता. कुठलीही हालचाल नजरेस येत नव्हती. तशात अचानक तब्बल दोन वाघ रस्त्यावर प्रगट झाले! आमच्यापासूनचे अंतर केवळ तीस फुटांचे! त्यांच्या नजरेने आम्हाला हेरले होते. त्यांनी निरखून आमच्याकडे पाहिले. आम्ही दगडासारखे निश्चल बसलो होतो, वाघसुद्धा सूतभर हलले नव्हते. काही क्षणांनंतर आमच्यातील एक कुजबुजला, ‘घास इकठ्ठा करो, जरुरत पडी तो अंगार लगायेंगे.’ असे म्हणत त्याने काड्यांची पेटी काढण्यासाठी हालचाल केली. तेवढेच निमित्त झाले आणि दोन्ही वाघ आल्यापावली परतून उंच गवतात दिसेनासे झाले. ऐन वेळेवर हालचाल करणाऱ्याचा मला रागच आला होता. 


वाघ डोळ्यांना तर दिसले, पण मन अतृप्त राहिले होते. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.  अर्ध्या तासानंतर रस्त्यावर एका वाहनाची चाहूल लागली. क्षेत्र संचालक ठोसरे साहेब जिप्सीतून उतरले. ते रायपूरला गेले असता, आमचा चमू या जंगलात मुक्कामाला आहे, अशी  माहिती त्यांना मिळाली होती. खराब रस्ता असूनही जिप्सी गाडी असल्यामुळे ते सहज येऊ शकले होते. त्यांना नुकत्याच झालेल्या व्याघ्रदर्शनाची माहिती दिली. साहेब म्हणाले, ‘दीड वर्ष उलटून गेलं पण अद्याप मला तुम्ही वाघ दाखवला नाही. चला, आज तरी दाखवा.’ वाघ दिसण्याची शक्यता जवळ-जवळ नव्हतीच हे मला माहीत होतं तरीही साहेबांसमोर अवसान आणत मी म्हटलं, ‘ठीक आहे,चला.’ साहेब, मी आणि वाहन चालक हसन असे तिघे जिप्सीने परत त्या ठिकाणी पोहोचलो. अंधारात जिप्सी बंद करून आम्ही शांतपणे बसून होतो. अर्धा तास आम्हाला धीर धरवला आणि नंतर भूकसुद्धा जोर मारू लागली. आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. साहेब हसत  म्हणाले, ‘तुम्ही मला वाघ दाखवणार नाहीच, अस दिसतंय!’ त्यावर मी म्हणालो, ‘सर, खिचडी तयार असेल. आपण जेवण करून पुन्हा एकदा प्रयत्न करू.’ साहेबांनी त्वरित होकार दिला. 


शिकारीपासून पन्नास मीटर अंतरावर जिप्सी उभी केली. दहा मिनिटांनंतर इंजिन सुरू न करता गाडी हळूहळू उतारावर पुढे वीस मीटर ढळू दिली. परत सर्व जण स्तब्ध होऊन बसलो. थोड्याच वेळात काळोखात काही तरी हालचाल जाणवली. साहेबांनी गाडीचा हेडलाइट ऑन केला. मिट्ट अंधारात गुडूप झालेले जंगल प्रकाशात न्हाऊन निघाले. तो होता!  वाघच होता! दबक्या चालीने आमच्या दिशेने त्याची आगेकूच सुरू होती. हेडलाइटच्या प्रखर प्रकाशात दिपलेले डोळे अर्धवट बारीक करून त्याची दबकत चाल सुरूच होती. आता गाडी आणि वाघातील अंतर केवळ दहा मीटरचे उरले होते. बंद जिप्सीमुळे आम्ही सुरक्षित होतो.  तरी साहेब सहज कुजबुजले, ‘जवळ आल्यावर काही गडबड तर नाही ना होणार?’ हा वाघ अस्सल पुणेरी असावा. इतकी बारीक कुजबूज त्याला कळली. क्षणार्धात तो अंधारात दिसेनासा झाला. साहेबांना दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वाघ दाखवू शकलो, या समाधानात मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. 


भल्या पहाटे पूर्ण टीम प्रगणनेकरिता सज्ज झाली. प्रगणनेच्या वेळी फारसे प्राणी दिसले  नाहीत. प्रगणनेनंतर पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही एकत्र झालो. आता सगळ्या सामानासह जीपपर्यंत तीन कि.मी. परतीची पायी वरात काढायची होती. काल ज्या ठिकाणी दोन वेळा व्याघ्रदर्शनाचा योग साधला होता, परतीचा रस्ता तेथूनच जाणार होता. ज्या वेळी त्या स्थळाजवळ पोहोचलो, त्या वेळी मला राहवले नाही आणि आता रानगवा किती उरला आहे ते पाहण्यासाठी अाम्ही पाचजण पुढे सरसावलो. एकामागे एक रांगेत आम्ही वरच्या बाजूने हळूहळू पुढे गेलो. सकाळी अकराचा  सुमार होता त्यामुळे वाघ शिकारीजळ असण्याची शक्यता नव्हती. तरीही खबरदारीने शिकारीच्या स्थळाकडे लक्ष केंद्रित करून आम्ही चालत राहिलो. गवताची उंची आमच्यापेक्षा अधिक असल्यामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते. सलामीला मी, नंतर वनरक्षक बेलसरे आणि त्यांच्या मागे अजून तिघे. सर्वकाही आलबेल होते. आणि ती आसमंत कापत जाणारी वाघाची डरकाळी कानावर पडली. अगदी जवळून. वाघ जणू काही आमच्या कानापाशी उभा असावा. जिवाचा थरकाप उडाला. बेलसरे जोरात ओरडले, ‘कोई मत भागना.’ सर्वात पुढे मी होतो. त्यामुळे मी धावण्याचा प्रयत्नही केला नाही. त्या तणावाच्या क्षणात आपसूकच बेलसरेंनी माझा हात घट्ट धरून ठेवला होता. काही क्षणांतच उमजले की वाघाचा हा लुटूपुटूचा हल्ला (Mock Charge) होता. 


प्रत्यक्ष वाघ दिसलाच नव्हता. जरासे सैल झालो आणि मागे वळून पाहिले तेव्हा लक्षात आले की ‘शोले’तील जेलरच्या ‘बाकी मेरे पिछे आव’प्रमाणे मागे कुणीच नव्हते.  मी व बेलसरे असे दोघेच वाघाच्या डरकाळीसमोर टिकलो होतो. पाठ न फिरवता एक, एक पाऊल मागे घेत आम्ही रस्त्यावर आलो. झालेला प्रकार रोमांचकारी होता. हिवाळ्याच्या थंड वातावरणातही घामाने आमचे कपडे ओले चिंब झाल्याचे थोड्या वेळाने लक्षात आले.


झाल्या प्रकाराने बसलेल्या धक्क्यातून अद्याप पूर्णत: बाहेर आलो नव्हतो. काल इथे दोन वाघ दिसले होते तरी आताची डरकाळी मात्र एकाच वाघाची होती. पुन्हा आमची खाज उमळली. ‘कहा है रे दुसरा फौजी?’ लगेच प्रश्न पडला. बेलसरेंनी माहिती दिली की तेथून सुमारे २०-३० मीटरवर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाणवठा आहे, तिथे वाघ असू शकतो मी म्हटलं, ‘चलो, देखते है.’ जंगलाचं वेड हे असंच असतं. ही नशा धोका पत्करायला भाग पाडते. जिवावर बेतणाऱ्या प्रसंगात सापडलो की तेवढ्यापुरती सटारते आणि पुन्हा तशा परिस्थितीतील रोमांच अनुभवण्यास जीव आसुसतो. डरकाळीच्या वेळी फुटलेला घाम जिरायचाच होता की आम्ही दुसऱ्या वाघोबांचा नाद धरण्याचे ठरवले. पाणवठ्यावर जाणाऱ्या सगरीवर वाघाच्या पंजाचे भरपूर ठसे होते. पाणवठ्याच्या जवळ पोहोचल्यावर तिथे ओल्या पंजांचे ठसे आणि नुकतच निथळलेलं पाणी जमिनीवर दिसून आलं. दुसरा वाघ नुकताच पाणवठ्यातून बाहेर येऊन दिसेनासा झाला होता. याचा अर्थ रात्री दिसलेल्या वाघांपैकी डरकाळी फोडणारा एक उर्वरित शिकारीवर ताव मारत होता आणि दुसरा पाणवठ्यात बसून टब बाथचा आनंद घेत होता. 


जंगलात वावरताना प्रत्येक वेळी सतर्क राहण्याची शिकवण या प्रसंगावरून मिळाली.  आणि ही शिकवण केवळ जंगलापुरती मर्यादित नव्हती. खरं पाहता, सतर्क राहण्याची गरज मानवी जंगलात अधिक असते.


रवींद्र वानखडे, raviw1962@gmail.com
संपर्क : ९४२३१२४८३८
gbdeshmukh21@rediffmail.com
शब्दांकन : जी. बी. देशमुख

बातम्या आणखी आहेत...