कुलामामाच्या देशात... / महाकाय आकांत!

सेंगरला ज्या जागी त्याने ठार मारले होते तिथेच नतमस्तक होऊन भोला शोक, श्रद्धांजली आणि पश्चात्ताप व्यक्त करत होता

दिव्य मराठी

Dec 01,2019 12:18:00 AM IST

रवींद्र वानखडे

आपल्या लाडक्या माहुताला क्षणिक संतापाच्या भरात चिरडणाऱ्या भोलाप्रसाद हत्तीची गत आता केविलवाणी झाली होती. सेंगरला ज्या जागी त्याने ठार मारले होते तिथेच नतमस्तक होऊन भोला शोक, श्रद्धांजली आणि पश्चात्ताप व्यक्त करत होता. दृश्य भावविभोर करणारे होते. हत्तीसारखा महाकाय प्राणी पण दु:खावेगाने हतबल झाला होता.

आपल्या लाडक्या माहुताला क्षणिक संतापाच्या भरात चिरडणाऱ्या भोलाप्रसाद हत्तीची गत आता केविलवाणी झाली होती. समोर त्याच्या लाडक्या माहुताचे निश्चेष्ट शरीर पडले होते आणि दु:ख व्यक्त करण्याचा मार्ग त्याला गवसत नव्हता. पोस्टमार्टेम आणि त्यानंतरच्या सोपस्कारांसाठी शव तेथून हलविणे गरजेचे होते. कुणी एकाने भोलाच्या जवळ जायचे, तो मागे लागला की सुरक्षित अंतर ठेवून पुढे-पुढे चालत राहायचे म्हणजे भोला मागे येत राहील आणि एकदा का तो नजरेआड झाला की इकडे मृतदेह हलवता येईल, अशी एक क्लृप्ती पुढे आली. आम्ही तसे प्रयत्न केले... पण चाणाक्ष भोला प्रत्येकवेळी आमच्या मागे पन्नास मीटर अंतर चालत येऊन परत फिरला. भोलाच्या नकळत सेंगरचे शव जर तेथून हलविले तर नंतर तो पूर्ण वस्ती उद्ध्वस्त करून सोडेल, ही गावकऱ्यांची भीती रास्त होती. “उसको बेहोश करके चंद्रपूर के जंगल मे छोड के आव और नहीं तो गोली मार दो.” गावकऱ्यांचा दबाव वाढत होता.


हत्तीसाठी गूळ म्हणजे मिष्टान्न. ठरावीक अंतरावर गुळाची एक-एक भेली रस्त्यावर ठेवत जायची म्हणजे भोला क्रमाने ती गिळंकृत करत पुढे जात राहील, तो सुरक्षित अंतरावर गेला की सेंगरचे शव उचलायचे अशी योजना तयार झाली. नवरा मेल्याचे दु:ख बाजूला सारत सेंगरच्या पत्नीने पहिली भेली ठेवून भोलाला आमंत्रित केले. भोला तिला चांगले ओळखत होता. ती ठरल्याप्रमाणे भोलाच्या पुढे, पुढे एक-एक गुळाची भेली ठेवत गेली. सेमाडोहच्या मुकिंदाच्या सुप्रसिद्ध हॉटेल समोर पोहोचल्यावर भोला ड्रममधील पाणी प्यायला आणि त्याने पवित्रा बदलला. तो यू टर्न घेऊ लागला. त्याने मागे वळू नये म्हणून सेंगरची पत्नी त्याच्या जरा जास्त जवळ जाऊन त्याला गुळाचे आमिष दाखवू लागली. भोला अचानक तिच्या अंगावर धावून गेला. सेंगरची बायको धडपडली आणि रस्त्यावरच कोसळली. गणवेशातील एक वनपालसुद्धा त्या गोंधळात घसरून पडला. क्षणभर सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. न जाणो कसा पण भोलाने काही सेकंदांचा अवकाश दिला आणि खाली पडलेले दोघेही सावरू शकले. तेवढ्या वेळात इकडे वनकर्मचाऱ्यांनी सेंगरचा मृतदेह हलवला होता. दुपारचे चार वाजत आले होते. भोलाप्रसाद पुनश्च सेंगरच्या शवाच्या ठिकाणी जाऊन उभा राहिला. अंधार होण्यापूर्वी भोलाप्रसादला गुंगीचे औषध देण्याचे ठरले. पाच मि.ली.चे इंजेक्शन पाठमोऱ्या भोलाप्रसादवर डागताच तो सावध झाला. तीन टन वजनाच्या महाकाय जीवाला गुंगी आणण्याकरिता किमान दहा मि.ली.चे इंजेक्शन आवश्यक होते. पण दुसऱ्या इंजेक्शनसाठी बंदूक रोखली की तो अंगावर धावून येत असे. पंधरा-वीस मिनिटांनी संधी मिळताच पुन्हा तीन मि.ली. चा डोज त्याच्यावर डागला. भोलाप्रसाद चवताळून माझ्या अंगावर धावला. मी एक अरुंद बोळ असलेल्या दोन घरांच्या मागे आडोशाला धावलो. त्याला चिंचोळ्या बोळीतून माझ्यापर्यंत येणे शक्य नव्हते. ह्याचा राग त्याने अतिक्रमणात असलेली टेलरची एक टपरी उलथवून व्यक्त केला आणि पुन्हा त्याच्या मुळ जागेवर जाऊन उभा राहिला. आता गुंगीच्या औषधाचा परिणाम होऊ लागला होता. भोलाप्रसाद सेंगरच्या घराच्या बांबूच्या ताट्या असलेल्या कुंपणात जाऊन उभा राहिला. दरम्यान, त्या परिसरातील पंधरा-वीस कुटुंबांच्या रात्रीच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था नदीपलीकडे असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन संकुलात केली गेली. रात्री अचानक भोलाप्रसाद बाहेर निघाला तर अघटित होऊ नये म्हणून ही सोय केली गेली. रात्रीचे दहा वाजून गेले. भोलाच्या घोरण्याचा आवाज कानी पडू लागला. तो उभ्या उभ्याच झोपी गेला होता. तीन पाय ताठ आणि एक पाय आळीपाळीने सैल सोडून हत्ती उभ्याने झोपत असतो. चाराकापी व तीन-चार जणांनी भोलाच्या पायात लोखंडी साखळी अडकवली आणि तीस फुटांवर असलेल्या आंब्याच्या झाडाच्या मजबूत बुंध्याला बांधली. रात्रभर आम्ही पहारा देत बसलो. उजाडेपर्यंत भोला जागीच शांतपणे उभा होता. नंतर त्याच्या हालचाली सुरू झाल्या. जवळच आणून टाकलेल्या वड, उंबर, पिंपळाच्या फांद्यांचा आस्वाद घेऊन आणि पाणी पिऊन भोलाप्रसादने उपवास सोडला. सकाळी नऊपर्यंत सगळे काही सुरळीत होते.


आणि रात्रभर टिकलेली शांतता वादळापूर्वीची होती हे थोड्याच वेळात सिद्ध झाले. अचानक भोलाप्रसादने रौद्र रूप धारण केले. पायाला असलेल्या साखळीच्या तीस फुटांच्या परिघातील पहिल्या झोपडीत तो शिरला आणि सोंड उंचावून त्याने झोपडी उद्ध्वस्त केली. ती झाल्यावर दुसरी... जे समोर दिसेल त्यावर भोलाचा बुलडोझर चालू लागला. एकच गोंधळ उडाला. मी पुन्हा गुंगीचे इंजेक्शन बंदुकीतून डागले. भोलाप्रसाद चाल करून आला. पशुवैद्यकीय अधिकारी, मी आणि दोघे-तिघे वनकर्मचारी आम्ही बंद अवस्थेत असलेल्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बंगल्यात आश्रय घेतला. भोला त्या इमारतीच्या आवारात घुसला. खिडकीतून सोंड पुरविण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्या हातात बंदूक पाहून त्याने इरादा बदलवला आणि तो पुन्हा सेंगरच्या त्याने मानलेल्या समाधिस्थळावर जाऊन उभा राहिला.


क्षेत्रसंचालक काकोडकर एव्हाना पोहोचले होते. गावकरी संतापले होते. भोलाला तेथून हटविण्यासाठी दबाव वाढू लागला होता. अजून एक इंजेक्शन देऊन त्याला रात्रीप्रमाणे उभ्याने घोरण्याच्या स्थितीत आणावे आणि मग क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये ठेवावे, असे ठरले. ह्या इंजेक्शनचा परिणाम लगेच दिसू लागला. परंतू ह्या वेळी उभ्याने झोपण्याच्या मुद्रेत न येता भोला समोरचे दोन पाय पुढे आणि मागचे दोन पाय सरळ उभे ठेवून, विजेच्या खांबाच्या आधाराने उभा राहिला. समोरच्या दोन पायांच्या मधे त्याची सोंड आणि मान विसावली होती. सेंगरला ज्या जागी त्याने ठार मारले होते तिथेच नतमस्तक होऊन भोला शोक, श्रद्धांजली आणि पश्चात्ताप व्यक्त करत होता. दृश्य भावविभोर करणारे होते. हत्तीसारखा महाकाय प्राणी पण दु:खावेगाने हतबल झाला होता. भोलाच्या प्रामाणिकतेचे मनातल्या मनात कौतुक करत असतानाच अचानक माझ्या पाठीच्या कण्यातून वीज चमकून गेली. ज्या स्थितीत भोला स्थिरावला होता तिला वैद्यकीय भाषेत ‘व्हेंट्रल रिकम्बंसी’ असे म्हणतात. ह्या स्थितीत शरीराचा पूर्ण भार छातीवर येतो, पर्यायाने हृदय आणि फुफ्फुसांवर येतो. ट्रँक्विलायजेशन प्रशिक्षणा दरम्यान ‘हत्ती सारखा वजनदार प्राणी ‘व्हेंट्रल रिकम्बंसी’ मध्ये आल्यास, ते जिवावर बेतू शकते’ प्रशिक्षकाचे हे उद्गार कानात घुमले. नकळत माझा कंठ दाटून आला, आणि मला हुंदका फुटला. काकोडकरांनी खांद्यावर हात ठेवून धीर देण्याचा प्रयत्न करताच माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. अघटिताच्या चाहुलीने मी हादरून गेलो होतो. बेशुद्धावस्थेत प्राणघातक स्थितीत बसलेल्या भोलाप्रसादला एका कडावर आणण्याच्या हेतूने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने गुंगीला उतार देण्याचे इंजेक्शन दिले. तीन टन वजनाचा भोला तसूभरही हलला नाही. अघटिताची शंका खरी ठरली होती. व्हेंट्रल रिकम्बंसीच्या स्थितीत राहिल्यामुळे हृदयावर अतिरिक्त दाब पडून भोलाच्या हृदयाची धडधड थांबली होती. आपल्या लाडक्या माहुताच्या दु:खात शोक, संताप, उद्विग्नता अशा सगळ्या भावनांचे प्रदर्शन त्याच्या पद्धतीने करत भोला शेवटी नतमस्तकतेच्या स्थितीत जग सोडून गेला होता. भोलाचे दु:ख त्याच्या अजस्र आकारापेक्षाही मोठे होते.


भोलाला येथून घालवा, त्याला गोळ्या घाला असे म्हणणाऱ्या ग्रामस्थांचे चेहरे आता उतरले होते. काल त्याच्या जिवावर उठलेली माणसं आज त्याला जंगली फुले वाहून अश्रुपूर्ण श्रद्धांजली देत होती. झुंडीच्या मानसिकतेची टोकाची दोन रूपे दोन दिवसांत बघायला मिळाली होती. ह्या प्रसंगी झालेली मनाची घालमेल आजवर टिकून आहे. ती आजन्म माझ्या सोबत राहील.


शब्दांकन : जी. बी. देशमुख

संपर्क : ९४२३१२४८३८

[email protected]

X
COMMENT