आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुश रहना मेरे यार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवींद्र वानखडे  

सेंगरचे वडील भोलाप्रसादचे पहिले माहूत होते. सेंगरचा जन्म भोलाप्रसादच्या समोरचा होता. सेंगर भोलाच्या नजरेसमोर लहानाचा मोठा झाला होता.  भोलाच्या नजरेत सेंगर हा त्याच्या आद्यगुरूचा मुलगा होता म्हणूनच तो भोलाच्या लाडाचा होता. तीन टन वजनाचा हत्ती म्हणूनच दारूच्या नशेत लटपटणाऱ्या हडकुळ्या सेंगरसमोर ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असा शिस्तीत उभा राहायचा.
“भोलाप्रसादने माहुताला चिरडल्याची बातमी आहे’’ कार्यालयात आल्याक्षणीच सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक चांदेकर यांचा निरोप मिळाला. बातमी धक्कादाक होती. भोलाप्रसादला आटोक्यात आणण्यासाठी ‘ट्रँक्विलाइज’ करावे लागणार होते. तासाभरातच आम्ही सेमाडोह येथील घटनास्थळी पोहोचलो.  

भोलाप्रसाद... वनखात्याच्या ताफ्याचा अतिशय लाडका हत्ती. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून भोलाप्रसाद वनविभागाच्या सेवेत होता. त्याचे सवंगडी होते रुस्तम, चंपाकली, सुंदरमाला, रामप्यारी आणि लक्ष्मी. या सगळ्यात वयाने व आकाराने ज्येष्ठ होता भोलाप्रसाद!  सगळे सोबती असले तरी प्रत्येकाचे आपले स्वभाववैशिष्ट्य होते. आकस्मिक प्रसंगी अतिदुर्गम भागात जाणे, पूरस्थितीत नदी-नाले पार करणे, अस्वल किंवा वाघासारख्या प्राण्यांच्या वावर क्षेत्रात उंच गवतातून गस्त घालणे ही त्यांची कामे.

भोलानाथच्या मस्तीच्या सुरस कथा मेळघाटात प्रसिद्ध होत्या. वर्षातून दोन वेळा भोला माजावर आला की त्याची मस्ती आवरण्याच्या पलीकडे असायची. त्या दिवसात त्याची गाठ चंपाकली किंवा सुंदरमाला ह्या सुंदरींशी (हत्तिणींशी) पडली की मग तर बघायलाच नको. त्यांच्या सात-आठ दिवस चालणाऱ्या दीर्घ हनीमूनच्या काळातील “हेवीवेट’ प्रणयाची किंमत परिसरातील शेतकऱ्यांना चुकवावी लागे. पूर्ण मस्तीत ह्या प्रणयधुंद जोड्या उभी  पिकं  हादडून आणि हुंदडून आडवी करत असत. नेहमीच्या तेल, गूळ, मीठ, रोटी ह्या मिळमिळीत आहाराची त्यांना ह्या दिवसात आठवणही येत नसे. भोलाप्रसाद तिथल्या भाषेत ‘मस्त मधे’ (माजावर) असला की त्याच्या गंडस्थळाहून दोन्ही बाजूने मद झिरपायचा. तसे लक्षण दिसले की आधीच त्याला मानवी वस्तीपासून दूर जंगलात नेले जायचे. काही वेळा अशा अवस्थेत त्याला गुंगीचे औषध द्यावे लागायचे. हा उपायही निष्फळ ठरला की मग शेवटचा उपाय असायचा सेंगर नावाच्या माहुताला बोलाविण्याचा. ट्रकवर जसे ड्रायव्हर आणि क्लीनर असतात तसे हत्तीवर एक माहूत आणि एक चाराकापी असतो. माहूत हत्तीची पूर्ण काळजी वाहतो तर चाराकापी त्याच्या कामात सहायक म्हणून सदैव तैनात असतो. रोजंदारी मजूर म्हणून कामावर असलेल्या सेंगरचे वडील वनविभागात माहूत पदावर नियमित कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात हा मुलगा माहुताचे काम पाहत असे. ज्युनियर सेंगर अव्वल दर्जाचा दारुडा होता त्यामुळे त्याला कामावरून घालवणे-बोलावणे सुरूच असे.  परंतु भोलाप्रसाद नियंत्रणाबाहेर मस्तीत आला की सेंगरला पाचारण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. ‘देशीप्रेमी’ सेंगरला आणायचे म्हणजे आधी त्याचे नखरे झेलावे लागायचे. त्याची पहिली मागणी असे, “ साहब, दो सौ रुपये दो. भोला को पकडने के लिये सुतली लाना है !” प्रचंड उन्मादात लोखंडी साखळदंडांना जुमानण्यास राजी नसलेल्या महाकाय गजराजास पकडण्यासाठी सुतळी हवी असे कुणी म्हटल्यास हसावे की रडावे तेच कळू नये.  परंतु “मरता क्या न करता’ ह्या चालीवर आम्ही त्याचे सगळे हट्ट पुरवत असू. दोनशे रुपये मिळाले की आधी सेंगरसाहेब मोहाच्या दारूचा मोठ्ठा रिचार्ज मारून घ्यायचे. दारूच्या हिमतीवर बाहुबली झालेला सेंगर नंतर दिलेल्या दोनशे रुपयातील पाच रुपयाची सुतळी विकत घ्यायचा. “साहब, तुम इधरीच रुको, मैं अभी आता ”असे म्हणत तो त्याच्या लाडक्या भोलाप्रसादकडे कुठलेशे मंत्र पुटपुटत जायचा. तीन टन वजनाचा अजस्र हत्ती दारूच्या नशेत लटपटणाऱ्या हडकुळ्या सेंगरसमोर ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असा शिस्तीत उभा असल्याचे ते दृश्य अद‌्भुत असायचे. हातातल्या मंतरलेल्या काटकीने सेंगर स्तब्ध उभ्या असलेल्या भोलाच्या भोवती प्रदक्षिणा घालत जमिनीवर एक वर्तुळ खेचायचा, नंतर भोलाच्या शेपटीला सात गाठींची सुतळी बांधायचा. मग टेचात आदेश द्यायचा, “ वो काटेवाली बेडी लाव.” भोलाचे समोरचे दोन भक्कम पाय जवळ खेचत सेंगरने सहजपणे काटेरी बेडी त्याच्या पायात अडकवली की झाले... सिपना वन्यजीव विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक धामगे तीन वेळा ह्या प्रकाराचे साक्षीदार राहिले होते.  

सुतळीला गाठी बांधून, मंत्र मारून ती सुतळी हत्तीच्या शेपटीला बांधणे, हत्तीभोवती जमिनीवर वर्तुळ खेचणे हा प्रकार मेळघाटातील आदिवासी समाजात परंपरेने चालत आलेल्या अंधश्रद्धेचा भाग होता आणि त्या भोळसट प्रकाराला मान्यता देणे तर शक्य नव्हते. मुळात भोला आणि सेंगरच्या अद्भुत ‘केमिस्ट्री’ला कारणीभूत होता त्यांच्यातील सेंगरच्या बालपणापासूनचा ऋणानुबंध. सेंगरचे वडील भोलाप्रसादचे पहिले माहूत होते. सेंगरचा जन्म भोलाप्रसादच्या समोरचा होता.  सेंगरचे बालपण भोलाच्या अंगाखांद्यावर बागडण्यात  गेले होते. सेंगर भोलाच्या नजरेसमोर लहानाचा मोठा झाला होता. भोलाच्या नजरेत सेंगर हा त्याच्या आद्यगुरूचा मुलगा होता म्हणूनच तो भोलाच्या लाडाचा होता. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला जसे डोळ्यादेखत मोठे झालेल्या लहान्यांचे, त्यांचे बालपण सरल्यानंतरही कौतुक असते तसे भोलाप्रसादला सेंगरचे कौतुक होते. भोलाप्रसादसारख्या अजस्र आकाराच्या, तापट आणि मनस्वी वागणूक असलेल्या ज्येष्ठ हत्तीला हाताळण्याचे कौशल्य जे सेंगरच्या बापाकडे होते, तेवढे  सेंगरकडे  नसावे. पण भोलाप्रसादला मुळातच सेंगरप्रति प्रेम असल्यामुळे तो सेंगरचा शब्द खाली पडू देत नसे. भोला केवळ सेंगरचे ऐकतो, ह्या एका कारणामुळे सेंगरला तिथे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होती. त्यामुळे भोलाप्रसादने सेंगर माहुताला चिरडले, ह्या बातमीवर विश्वास ठेवणे आम्हाला जड जात होते.  

आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा भोलाप्रसाद शांतपणे उभा होता. त्याच्या पुढ्यात त्याच्या माहुताचे निष्प्राण शरीर पडले होते. भोलाप्रसाद पश्चात्तापदग्ध अवस्थेत उभा होता. सेंगरच्या शवापर्यंत कुणी पोहोचण्याचा प्रयत्न केला की भोला त्याच्या अंगावर धावून जात असे. शवापासून तीस मीटरच्या परिघात जाण्याची भोलाने बंदी घातली होती. चौकशीअंती आम्हास घटनाक्रम कळला. त्या रात्री सेंगरच्या अंगात ताप भरला होता. सकाळी भोलाप्रसादला जंगलातून परत आणत असता तो वाटेतील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात गेला. डॉक्टरांनी सेंगरला तपासले, औषध दिले. सेंगरने खुश होऊन डॉक्टर साहेबांना भोलाच्या पाठीवर बसवून एक चक्कर मारून आणली. तेथून परत वनविभाग परिसरात पोहोचत असतानाच समोर चाराकापी आला. भोलाप्रसादने सोंड उगारून चाराकापीस धमकावले.  चाराकापी घाबरून मागे सरला. सेंगरने  दवाखान्यातील औषधासोबतच देशीचा पहिल्या धारेचा डोससुद्धा चढविला होता. तो भोलाप्रसादच्या समोर उभा राहिला आणि आपल्या बारक्या दंडाच्या बेंडकुळ्या दाखवत त्याने भोलाप्रसादला थेट आव्हान दिले, “तू उसको धवस देता, हिम्मत है तो मुझे मार...” त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत भोलाच्या सोंडेच्या तडाख्याने सेंगर जमिनीवर आपटला होता आणि पुढचे  काही कळण्यापूर्वीच भोलाचे हस्तिदंत शोभेचे नाहीत हे सिद्ध झाले होत. सुळ्यांचा जीवघेणा दाब पोट आणि छातीवर पडताच सेंगरच्या तोंडून उचकीसुद्धा निघाली नव्हती. सेंगर निपचित पडल्यानंतर मात्र भोलाप्रसादच्या लक्षात परिस्थिती आली आणि आपल्या हातून हे काय होऊन बसले ह्याची त्या मुक्या प्राण्यास टोचणी लागली.  म्हणूनच शोकाकुल अवस्थेतील भोलाप्रसाद कुणालाच सेंगरच्या शवापाशी येऊ देत नव्हता. अपराधी भावनेने पिचलेला भोलाप्रसाद सेंगरच्या शवाची राखण करत उभा होता. मदांध अवस्थेतसुद्धा माहुताचे ऐकणारा हा गजराज त्याच्या मनाप्रमाणे आपल्या लाडक्या माहुताच्या मृत्यूवर शोक प्रकट करू इच्छित होता. त्याच्या हातून क्षणभराच्या संतापात घडलेल्या अनर्थामुळे तो विचलित झाला होता. गंडस्थळाहून झिरपणाऱ्या मदाच्या दोन धारांसोबतच भोलाच्या मिचमिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. इतका महाकाय प्राणी भावना व्यक्त करण्यासाठी सैरभैर झाला होता. पश्चात्तापदग्ध गजराजाने पुढील दोन दिवस माहुताच्या मयतीचा मातम मनवताना कसले तांडव केले आणि पश्चात्तापाची वेळ आम्हावर आणली त्याची कथा पुढल्या भागात...


शब्दांकन : जी. बी. देशमुख

संपर्क : ९४२३१२४८३८

gbdeshmukh21@rediffmail.com