आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैराटची जंगलकथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवींद्र वानखडे  

मेळघाटच्या जंगलातून हरणांच्या शिंगांची तस्करी हासुद्धा एक रोचक मामला आहे. दरवर्षी पावसाळ्यात नरांची शिंगे आपोआप गळून पडतात. ह्या  शिंगांच्या व्यापारावर कडक बंदी आहे. पण मानवी बुद्धी काही ना काही अवैध मार्ग शोधून काढतेच. गळून पडलेली शिंगे काही लोक जंगलातून गोळा करतात. पानगळीचा थर आणि वाढलेल्या गवतामुळे गळून पडलेली शिंगे सहजासहजी दिसत नाहीत. त्यावर उपाय म्हणून ही मंडळी थेट गवताला काडी लावतात. तेथील पाचोळा, गवत, लहान झाडोरा जळून गेल्यावर जमिनीवर पडलेली शिंगे दिसतात. आग जंगलात पसरून वणवा भडकण्याचा धोका असतो, पण त्याची शिंगे तस्करांना तमा नसते.
समुद्रसपाटीपासून ११७८ मीटर उंचीवर वसलेले वैराट हे विदर्भातील सर्वात उंच ठिकाण.  कालकुंडी, राजनी, कोलामआम, पचांबा अशा खोऱ्यांनी घेरलेले हे ठिकाण येथे घोंगावणाऱ्या जोरकस वाऱ्यामुळे ‘हवाखांडी’ म्हणूनही ओळखले जायचे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्राच्या सीमेवर तीसएक घरांची येथे वस्ती.  म्हशीच्या दूधदुभत्याचा प्रमुख व्यवसाय असलेली कुटुंबे प्रामुख्याने इथे राहत असत.  त्यांच्या प्रचंड संख्येतील गुरांच्या वावरामुळे बोडखा झालेला हा भाग वनाच्छादित करण्याचे वनविभागाचे सगळे प्रयत्न फोल ठरले होते. पिढ्यान‌्पिढ्या जंगलातील वास्तव्यामुळे वन्यप्राण्यांविषयीचे ग्रामस्थांच्या मनातील भय लुप्त झाले होते. वर्दीधारी माणसे जणू त्यांचे शत्रूच. वाघ, बिबट, अस्वल,रानडुकरे यांच्यासोबतच अजून एका प्रजातीच्या उपद्रवाची तक्रार ते सांगायचे – ते म्हणजे वनकर्मचारी...   

अशा विपरीत परिस्थितीत १९९० साली पिलारीसेठ नावाचे कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग वनपरिक्षेत्राधिकारी येथे रुजू झाले. त्यापूर्वी ताडोबा तसेच मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील तैनातीचा त्यांचा प्रत्येकी पाच वर्षांचा अनुभव होता.  त्यामुळे त्यांना आदिवासींच्या समस्यांची जाण होती तसेच वन्यजीव व्यवस्थापनात कौशल्य प्राप्त होते. वनविभागात त्यांना “पिलारीबाबा” असे नाव पडले होते. अवैध चराई ह्या नाजूक विषयाला हात घातल्यामुळे ते स्थानिकांच्या रोषास पात्र ठरले होते. एकदा त्यांनी अतिसंरक्षित क्षेत्रात मुक्कामाला असलेली दोनशे गुरे चिखलदरा येथील कोंडवाड्यात घातली होती. त्या वेळी एका समाजसेविकेने मोर्चा काढून अत्यंत आक्रस्ताळेपणाची वागणूक पिलारीसेठ यांना दिली तरी ते डगमगले नव्हते.  

एकदा झाले असे की चिखलदरा गावात नागपूरच्या खाजगी ट्रॅव्हल कंपनीची एक बस सतत दोन ते तीन दिवस एकाच जागी उभी असलेली पिलारीसेठ ह्यांना दिसली. ह्या बसचा संबंध हरणांच्या शिंगाच्या तस्करीसोबत असू शकतो अशी गुप्तवार्ता त्यांना मिळाली. मेळघाटच्या जंगलातून हरणांच्या शिंगांची तस्करी हासुद्धा एक रोचक मामला आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या काळात हरीणवर्गीय प्राणी जसे सांबर, चितळ, भेडकी ह्यातील नरांची शिंगे आपोआप गळून पडतात. ती नियमित काळाच्या अंतराने होणारी नैसर्गिक प्रक्रिया असते.  ह्या  शिंगांच्या व्यापारावर कडक बंदी आहे. पण मानवी बुद्धी काही ना काही अवैध मार्ग शोधून काढतेच. गळून पडलेली शिंगे काही लोक जंगलातून गोळा करतात. पानगळीचा थर आणि वाढलेल्या गवतामुळे गळून पडलेली शिंगे सहजासहजी दिसत नाहीत. त्यावर उपाय म्हणून ही मंडळी थेट गवताला काडी लावतात. तेथील पाचोळा, गवत, लहान झाडोरा जळून गेल्यावर जमिनीवर पडलेली शिंगे दिसतात. आग जंगलात पसरून वणवा भडकण्याचा धोका असतो, पण त्याची शिंगे तस्करांना तमा नसते. तर, पिलारीसेठ ह्यांनी हेरलेल्या बसवर गुप्तहेर नजर ठेवून  होते. खात्री होताच, त्यांच्या चमूने मेमना गावातील एका घरावर छापा टाकला. त्यांचा अंदाज खरा ठरला होता. मोठ्या प्रमाणात हरणाची शिंगे त्या घरातून जप्त झाली. ताब्यात घेतलेल्या इसमाने दिलेल्या माहितीवरून मेळघाटात जोरदार अटकसत्र सुरू झाले. स्थानिक आदिवासींचे हे शिकारी नेटवर्क उलगडत, एका प्राथमिक शाळेच्या गुरुजीसह अटकसंख्या दहाच्या वर गेली. गुन्ह्याचे धागे शेवटी वैराट गावापर्यंत पोहोचले आणि संपूर्ण वनखाते हादरून जावे असा सुगावा हाती लागला. हरणांच्या शिंगांच्या तस्करीचा तपास इतक्या मोठ्या प्रकरणापर्यंत जाऊन पोहोचेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. वैराट गावालगत तब्बल दोन वाघांची शिकार झाल्याची माहिती पुढे आली होती. तपासाची कुणकुण लागताच प्रमुख दोन आरोपी भूमिगत होऊन वैराट गावात लपल्याची गुप्त वार्ता कळली. गावातून मोजक्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने आरोपींना ताब्यात घेणे महाकठीण काम होते. त्या वेळी मी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सहायक वनसंरक्षक संशोधन अधिकारी म्हणून तैनात होतो. एकूण चाळीस जणांचा चमू भल्या पहाटे वैराट गावात दाखल झाला. आरोपी लपून बसलेल्या घराला वेढा घालण्यात आला. काही केल्या आरोपी घराबाहेर येईनात. कुठलाही विरोध दिसून येत नव्हता. तशात अचानक शेजारच्या घरातील एका महिलेने दारात उभ्या असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गरम पाण्याचे घंगाळ रिकामे केले आणि गोंधळास सुरुवात झाली. आजूबाजूला जमलेले बघेसुद्धा चाल करून आले. काही कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या घराचे दार तोडले आणि दोन्ही आरोपींच्या बखोट्या धरून बाहेर आणले. त्यांना सरकारी गाड्यांपर्यंत नेताना जमावाच्या शिवीगाळ आणि आरडाओरडीने आमची चांगलीच त्रेधा उडाली. वाहनांमधे बसताच जबरदस्त दगडफेक सुरू झाली. आमच्या गाडी चालकाला वेगळेच स्फुरण चढले. बिनधास्त खाली उतरून त्याने दगडांचा प्रतिहल्ला केला तेव्हा जमाव थोडा मागे रेटला गेला व आम्ही तेथून अक्षरश: पळ काढला.  ह्या धुमश्चक्रीनंतर आरोपींना घेऊन चिखलदरा येथील कार्यालयात पोहोचलो. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला.  ते दोघे बाप-लेक होते.  शिकार नेमकी कुठे  केली गेली त्या घटनास्थळी पंच मंडळींना घेऊन आम्ही वैराटवरून दोन कि.मी. खाली व्याघ्र प्रकल्पा्याे अतिसंरक्षित क्षेत्रातील खोऱ्यात उतरलो. आरोपींची उपद्रवी पार्श्वभूमी लक्षात घेता ते पळून जाऊ नयेत म्हणून एका आरोपीच्या जोडीने मीसुद्धा स्वत:च्या हातात हातकडी घालून घेतली होती.  माझ्या हातातील हातकडी अधिकाराची, कर्तव्याची होती तर त्याच्या हातात कायदेभंगाची होती.
 
आरोपीच्या मुलाने सांगितले, “त्या दिवशी मी एकटाच म्हशी चारायला आलो होतो. अचानक आलेल्या वाघाने म्हशींवर हल्ला केला. चरणाऱ्या  म्हशी व मी जीव वाचविण्यासाठी पळालो पण एक म्हैस वाघाच्या हाती लागली.  घरी गेल्यावर वडिलांना घडला प्रकार सांगितला.  ह्या वाघाला जिवंत सोडायचा नाही असे ठरले. दुसऱ्या दिवशी जंगलात ‘न्यूक्रॉन’ विषाची बाटली घेऊनच गेलो. मेलेल्या म्हशीच्या पुठ्ठ्याचा जो भाग वाघाने खाल्ला होता त्याच जखमेवर न्यूक्रॉन शिंपडले व परत आलो. तिसऱ्या दिवशी पुन्हा घटनास्थळी जाऊन पाहिले तर मेल्या म्हशीजवळ दोन वाघ मरून पडलेले दिसले. पुढील दोन दिवस मी आणि माझ्या बापाने दोन्ही वाघांची चिरफाड केली. त्यांच्या शवांची खांडोळी करून खोऱ्यात फेकली आणि कातडे काढून व्यवस्थित ठेवले.”  कातडे वगळता त्या परिसरात सगळे पुरावे शोधण्यात आम्हाला यश आले.  

वनविभागाने खोऱ्यात दहशत माजवली असून तेथील काही पुरुषांना गायब केले आहे, अशी खोटी तक्रार आमच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. चिखलदऱ्याला दौऱ्यावर असलेल्या पोलिस अधीक्षकांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्याच्यासमोर आरोपींना प्रस्तुत करताच त्यांनी वाघाची कातडे ताब्यात देण्याचे कबूल केले. आरोपीसोबत भरपूर फिरणे झाले पण कातडे सापडले नाही. इकडे आमच्याविरुद्ध तीन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार त्याच समाजसेविकेकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे केली गेली. तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश झाले आणि तक्रार फोल असल्याचा निष्कर्ष निघाला. 

शब्दांकन : जी. बी. देशमुख

संपर्क : ९४२३१२४८३८

gbdeshmukh21@rediffmail.com