आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध मासेमारीचा अनोखा प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवींद्र वानखडे  

काहीतरी वेगळेच घडते आहे हे लक्षात घेऊन मी सतर्क झालो. त्यातील एकाने एका हाताने काडीपेटी उगाळली आणि दुसऱ्या हातातील फटाकासदृश वस्तूला टेकवून ती वस्तू डोहाकडे भिरकावून दिली. पाण्याच्या पृष्ठभागावर ती वस्तू पोहोचताक्षणीच जोराचा धमाका झाला... तो डायनामाइट होता. काठावरची दोन माणसं वगळता सगळ्यांनी भराभर डोहात उड्या मारल्या. स्फोटाने हादरलेले मासे, पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले होते.
 
 
मेळघाटच्या उत्तर सीमेवर तापी नदीचे अथांग पात्र आहे. खंडू, खापरा, सिपना आणि गडगा ह्या तापीच्या उपनद्या. तापी नदीत प्रत्यक्ष विलीन होण्यापूर्वी ह्या उपनद्या अनेक वळणं घेतात. आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावणं जणू त्यांना कबूल नसावं, इतके आढेवेढे त्या विलीनीकरणापूर्वी घेत असतात. तीव्र प्रवाहासोबत वाहून येणाऱ्या लहान-मोठ्या दगडांच्या आघातामुळे खडकाळ पात्रात लहान-मोठे खड्डे तयार होतात आणि त्यात पाणी साचतं. कालांतराने ह्या खड्ड्यांचा आकार रांजणाइतका होतो. काही खड्डे तर डोहाइतका मोठा आकार धारण करतात. अशाच काही डोहांना स्थानिकांनी हत्तीडोह, राजाडोह अशी नाव दिली आहेत. नदी कोरडी पडली तरी ह्या डोहांमध्ये अनेक दिवस पाणी टिकून राहतं. वाघ, बिबट, अस्वलांसारखे प्राणी, ज्यांना खोलगट कातळावर चालणं शक्य असतं, उन्हाळ्याच्या दिवसात ह्या डोहांमधे आरामात उतरून तहान भागवतात. दुसरीकडे जिथे नदीच्या उतारात अचानक उंचवटा तयार झालेला असेल अशी मोक्याची ठिकाणे स्थानिक आदिवासी हेरून ठेवतात. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे मोठेमोठे मासे जेव्हा उडी मारून असा उंचवटा पार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा प्रवाहात उभे असलेले शिकारी हवेतल्या हवेत हाताने मासे धरतात. वरच्यावर मासे झेलण्याचं अफलातून कौशल्य त्यांना सरावामुळे साधता आलेलं असतं. कुंड गावाच्या  नदीत असाच एक पंधरा मीटरचा उंचवटा आहे. अशा प्रकारच्या उंचवट्यांना ‘उपरी’ असे स्थानिक भाषेत संबोधलं जातं. रंगीबेरंगी कपडे घालून रंगूबेली गावच्या ‘उपरी’ वर जमलेल्या शेकडो आदिवासी अाबालवृद्धांची ही मच्छीमार-जत्रा एखाद्या उत्सवापेक्षा कमी मजेदार नसते. उंच खडकावरून उडी मारून नदीतला मासा एका हातात धरून वर येणे, असल्या उच्च दर्जाच्या कौशल्याचंसुद्धा वेगळं कौतुक होत नाही. सगळं काही मूलभूत गरजा भागविण्यासाठीचा प्रयत्न असतो. 

असंच दृश्य सिपना नदीच्या पात्रात पाटिया गावच्या मागच्या बाजूलाही दिसून येतं. पावसाळ्यापूर्वी गस्तीचा भाग म्हणून मी एकदा पाटिया गावाकडे गेलो. आमच्या चमूला दीडशे लोकांचा जमाव नदीपात्रात उतरलेला दिसला. सांबराच्या शिकारीचे हिस्से-वाटे करणे सुरू असावं ही माझ्या मनात आलेली पहिली शंका. पण जवळ जाताच लक्षात आलं की तो नदीपात्रातील डोहाच्या पूजेचा प्रकार होता. येत्या पावसाळ्यात डोहात खूप मासे येऊ दे, असं साकडं त्या पूजेद्वारे आदिवासी मंडळी डोहाला घालत होती. मेळघाटातील देवभोळ्या आदिवासींच्या जीवनरेखा असलेल्या ह्या नद्या, डोह त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करत असतात. आदिवासी मंडळीसुद्धा निसर्गाची आब राखून आयुष्यास आवश्यक तेवढे हसत-खेळत निसर्गाकडून हक्काने घेत असतात. परंतु ह्या स्वच्छ संस्कृतीला आधुनिक साधनांच्या मदतीने निसर्गाचे दहन करण्याची काही बाहेरच्या लोकांना वृत्ती सतत खुणावत असते. कमी श्रमात निसर्गाला ओरबाडून व्यवसाय करण्याचा हेतू राखणारी मेळघाटाबाहेरील मंडळी काही स्थानिकांना हाताशी धरून निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या कारवाया करत असतात. 

अवैध मासेमारीचा एक अघोरी प्रकार म्हणजे डोहांमधे रोगोर, एंडोसल्फॉन, अॅड्रिन सारखी घातक किटकनाशके टाकली जातात. त्यामुळे अक्षरश: क्विंटलच्या वजनाचे मृत मासे पाण्यावर तरंगू लागतात. आठवडी बाजारात लगेच त्यांची रवानगी होते. प्रत्येक मृत माश्यात कीटकनाशकातील घातक जहर काही अंशी तरी असतंच. खाणाऱ्यावर त्याचे दुष्परिणाम लगेच नसले तरी कालांतराने निश्चित होतात आणि माणसे विविध आजारांनी घेरले जातात. याशिवायही अवैध मासेमारीचे इतरही प्रकार बघायला मिळतात.  

रंगूबेली येथील वन-विश्राम गृह गावापासून एक कि.मी. अंतरावर आहे. उन्हाळ्याचे दिवस असूनही नदीपात्रातील डोहात मुबलक पाणी होतं. त्या दिवशी एक वनरक्षक, एक वनमजूर आणि मी असे तिघे डोहात अंघोळीचा आनंद घ्यायचा म्हणून नदीपात्राकडे गेलो. डोहातील कोंबट पाण्यात उतरून निसर्गाचा आनंद लुटत असताना मला काही लोकं पैलतीरी बसलेले दिसले. सर्वसामान्य कोरकू आदिवासी असलेल्या त्यातील एक-दोघांच्या हाताचे पंजे नदारद होते. मला आठवलं की यापूर्वीही मी जेव्हा ह्या भागात आलो तेव्हा मला हाताचा पंजा किंवा बोटे नसलेली माणसं लक्षात राहावी इतक्या प्रमाणात दिसली होती. तेव्हापासूनच त्यामागची  मेख काय असावी हा प्रश्न मला सतत छळत असायचा. तशात नदीच्या पैलतीराकडे मध्य प्रदेश सीमेकडून दहा-बारा लोक येताना दिसले. डोहाच्या काठावर त्यांनी जवळच्या पिशव्या ठेवल्या,अंगावरचे कपडे उतरवले आणि जलतरण स्पर्धा असल्यासारखे एका रांगेत उभे राहिले. काहीतरी वेगळंच घडतंय हे लक्षात घेऊन मी सतर्क झालो. त्यातील एकाने एका हाताने काडीपेटी उगाळली आणि दुसऱ्या हातातील फटाकासदृश वस्तूला टेकवून ती वस्तू डोहाकडे भिरकावून दिली. पाण्याच्या पृष्ठभागावर ती वस्तू पोहोचताक्षणीच जोराचा धमाका झाला... तो डायनामाइट होता. काठावरची दोन माणसं वगळता सगळ्यांनी भराभर डोहात उड्या मारल्या. स्फोटाने हादरलेले मासे, पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले होते.  पाण्यात उतरलेल्या  मंडळींनी स्फोटाने गर्भगळीत झालेल्या माश्यांना पटापट काठावर फेकण्यास सुरुवात केली. काठावरील माणसांनी सराईतपणे मासे पिशव्यांमधे भरून घेतले. काही क्षणांतच हा प्रकार घडला होता. डायनामाइट वापरून मासेमारी केली जाते हे ऐकून होतो, पण प्रत्यक्ष प्रकार आजच बघायला मिळाला होता. मी पाण्यातून बाहेर आलो, कपडे चढविले आणि सोबतच्या वनरक्षक व वनमजूरासोबत उथळ पाणी असलेल्या जागेवरून नदीच्या पैलतीरी पोहोचलो. पैलतीर मध्य प्रदेशाच्या सीमेत  होता. अवैध मच्छिमारांना शंका न येऊ देता जवळ जाऊन एक-दोघांना ताब्यात घेण्याचा इरादा होता. परंतू त्यांना शंका आलीच. आम्ही त्यांच्यापर्यत पोहोचण्याआधीच त्यांनी पाण्याबाहेर निघून पलायन केलं.  आम्ही त्यांचा पाठलाग केला. शेवटचे दोघे तिघे आमच्या हाती येण्याच्या बेतात होते पण त्यांनी पटापट नदीपात्रात उड्या घेतल्या. पोहणे मला चांगले येत असलं तरी हिंदी सिनेमातल्या हिरोसारखी मला पाण्यात हाणामारी करण्याइतकी गती प्राप्त नाही.  परिस्थिती त्यांच्या ध्यानात आल्यावर तर ते तिघे मला पाण्यातूनच आव्हान देऊ लागले, “तू पानी मे आ, तेरे को दिखाते है !”  तसंही त्यांच्यामागे जाणे धोक्याचे होते कारण सगळे काटक आणि आडदांड होते आणि आम्ही तिघेच आणि विनाहत्यार  होतो. शेवटी संयम बाळगला आणि मनाविरुद्ध हात हलवत परतलो. “सर, असले प्रकार रोजचेच आहेत. पण विना-हत्यार आणि विना-मनुष्यबळाचे काही करता येत नाही.  शिवाय पलिकडच्या दामजीपूरा गावात आम्हाला दर आठवड्याला जावेच लागते. तिथे ह्याच लोकांशी गाठ पडते.” 

कर्मचाऱ्यांची अगतिकता समजून घेण्यासारखी होती. पुढे ह्या डायनामाइट पद्धतीच्या शिकारीची अधिक माहिती मिळाली. ह्या टोळीमधे वात पेटवून प्रत्यक्ष डायनामाइट फेकणारी व्यक्ती सगळ्यात महत्त्वाची असते. आधी अत्यंत असुरक्षित पद्धातीने बारूद ठासून स्फोटक तयार करायचे आणि तितक्याच गलथान ढंगाने त्यास डोहापर्यंत न्यायचे. नंतर वात पेटवून अशा पद्धतीने फेकायचे की त्याचा स्फोट नेमका पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श होतानाच व्हायला हवा. त्याच्या आधी किंवा नंतर झालेला उपयोगाचा नाही.  कारण हवेत स्फोट झाल्यास पाण्यातील माशांवर काहीच परिणाम होत नाही आणि पाण्यात बुडल्यानंतर स्फोट परिणामकारक होत नाही. 

योग्य ते टायमिंग साधण्याच्या नादात थोडीशी गफलत झाली तर अनेकदा डायनामाइट फेकणाऱ्याच्या हातातच फुटतो. नदी पलीकडच्या गावांमधे हात किंवा हाताची बोटे गमावलेली माणसं का दिसून पडतात ते कोडंही आज सुटलं होतं. अवैध मासेमारीचा हा प्रकार सगळ्यात घातक कारण, डायनामाईट धारकाच्या हाताच्या चिंध्या उडण्याची शक्यता ह्यात खूप जास्त असते. पण अवैध शिकारीतून मिळणाऱ्या थोड्या फायद्यासाठी अशी जोखिम गरीब आदिवासी घेत असतो. ह्या प्रकारांमुळे पुढील पिढ्यांना मेळघाटातील मासे केवळ मत्स्यालयातच बघायला मिळतील की काय अशी भीती वाटते. 

शब्दांकन : जी. बी. देशमुख

संपर्क : ९४२३१२४८३८

gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...