आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध मेळघाट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटच्या अभयारण्यात कोरकू आदिवासींची भाषा आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा अशा जागोजागी आढळतात. कुंड परिसरात जंगलाचे अस्सल वैभव बघायला मिळते. असंख्य पर्वत व खोऱ्यांचा या प्रदेशात निसर्गसौंदर्य आणि जंगलातील अस्सल शांत वातावरणाची अनुभूती होते.


तारूबंदा... मेळघाटातील एक दुर्गम गाव. कोरकू आदिवासींच्या भाषेत तारू म्हणजे झाड. चहूबाजूने दाट वनराईने घेरलेले म्हणून नाव तारूबंदा! तारूबंदा ते चिखलदरा हा सलग पंचवीस किलोमीटरचा पट्टा घनदाट जंगलाचा. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ह्या परिसरास राखीव वनाचा दर्जा प्राप्त झाला आणि  इंग्रज अधिकाऱ्यांनी गावापासून एक कि.मी. अंतरावर एक विश्रामगृह उभारले. दोनच कक्षांच्या ह्या छोटेखानी विश्रामगृहाच्या वरांड्यात पावसाळी रात्रीत अनेकदा साक्षात अस्वलांचा मुक्काम असतो. त्या काळातील श्रीमंत संस्थानिक आणि इंग्रज राज्यकर्ते तर ह्या जागेच्या प्रेमातच पडले होते. कालांतराने व्यवस्थापनासाठी बहुमोल सागवान वृक्षांची तोड करून येथे लाकडाचे आगार उभारले गेले. सागाचे ओंडके आगारात विक्रीला ठेवले जायचे आणि काटक्या स्थानिक आदिवासींना जळणासाठी विनामुल्य नेण्याची परवानगी होती. ह्या कामामुळे ग्रामस्थांना भरपूर रोजगार प्राप्त झाला होता. वनउत्पादनाच्या ह्या मोठ्या आवाक्याच्या कामाचा अनुभव यावा म्हणून भारतीय वन सेवेतील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना ह्या रेंजचा कार्यभार देण्यात येत असे. सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रकाश ठोसरे ह्यांनीही त्यांच्या सेवेच्या सुरुवातीस हा अनुभव घेतला होता. त्यांच्याकडून सुरस जंगलकथा ऐकण्याची संधी मला लाभली.   
तारूबंदा एका पठारावर वसलेले असल्यामुळे तेथे पाण्याचे सतत दुर्भिक्ष असते.  वनविभागातर्फे गावालगत निर्मिलेला तलाव तसेच ब्रिटिश काळात वनविश्रामगृहाच्या खालच्या बाजूस १९२० च्या सुमारास नाल्यावर बांधण्यात आलेला बंधारा हे तेथील पाण्याचे प्रमुख स्रोत. याशिवाय भर जंगलात याच नाल्यानजीक एका विहिरीत पाण्याची उपलब्धता अशी की पावसाळ्यात हात घालून पाणी काढता येत असे. ह्या विहिरीजवळच एक कबर आढळते. त्या ठिकाणी भडकलेल्या वनवणव्यात कर्तव्यावर असताना शहीद झालेले बहादूर रेंज अधिकारी मो. नजीर ह्यांची ती कबर आहे. झाडावर चढून वणव्याच्या व्याप्तीचा अंदाज घेताना धुरामुळे श्वास गुदमरून त्यांना मूर्च्छा आली आणि ते थेट आगीत कोसळले आणि शहीद झाले. 

तारुबंदा विश्रामगृहाला पूर्वी पाणीपुरवठा बैलगाडीने करावा लागत असे. २००४ मध्ये विश्रामगृहाच्या छतावरील पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करवून घेतली. आता तिथे साठ ते पासष्ट हजार लिटर पावसाच्या पाण्याची साठवणूक होते, परिणामी हे विश्रामगृह उन्हाळ्यातही पूर्ण क्षमतेने वापरले जाते. तारूबंदावरून जंगल सफारीचा आठ किमीचा तारुबंदा, कांद्रिबाबा, कुंड असा मार्ग घनदाट वनराईचा.  ह्याच मार्गावर दोन कि.मी. अंतरावर तारुबंदाच्या रेंजरने कधी काळी एका हनुमान मूर्तीची स्थापना केली. आता त्या हनुमान मंदिराला जागृत देवस्थानाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. भाविक भक्तांचा तेथील वन्यप्राण्यांना उपद्रव होऊ नये म्हणून तेथे जाळ करणे, प्लास्टिकचा वापर, भजन कीर्तनासाठी भोंगे लावणे ह्यावर निर्बंध ठेवण्याचे अतिरिक्त कार्य वनविभागाकडे आले आहे.    

२००० साली मेळघाटच्या पायथ्याशी राजूर गिरवापूर येथे पुनर्वसन करण्यात आलेले कुंड हे मूळ गाव तारूबंद्यापासून आठ कि.मी. अंतरावर आहे. चिखलदऱ्याच्या ११०० मी. समुद्र सपाटीपासूनच्या उंचीपासून आपण पाचशे मी. उंचीपर्यंत घसरत आलो की समजायचे कुंड गाव आले. असंख्य पर्वत व खोऱ्यांच्या या प्रदेशात निसर्गसौंदर्य आणि जंगलातील अस्सल शांत वातावरणाची अनुभूती होते. याच टापूत वाहणारी साक्री नदी, सुकलीबुरा, सिपनाखांडी आणि हुंडाआम हे नाले ह्यांचे मिलन कुंड गावानजीक होते. त्यामुळे येथे पाण्याची रेलचेल असते. साक्री नावाची एक बोरांची वेली प्रजाती येथे आढळून येते. सर्वत्र वैशाख रणरणत असताना बोरीच्या ह्या वेलीला साखरेच्या गोडीची, मेव्यासारखी चव असलेली धवलशुभ्र रंगाची फळे येतात. चिखलदरा पठारावरील पस्तलाई गावाच्या उत्तरेस असलेल्या खोऱ्यात या साक्री वेलिबोरी विपुल प्रमाणात आढळून येतात. वेलीबोरीच्या झाडाची गोड फळे हा अस्वलांचा वीक पॉइंट. हिवाळ्यात ह्या फळांचा स्वाद हक्काने घेणारी अस्वले उन्हाळ्यात पालापाचोळ्यातून सुकलेल्या फळांचा शोध घेऊन त्यांचा फडशा पाडतात. ह्या फळांच्या  गोडव्यावरून नदीचे आणि खोऱ्याचे नाव साक्री असे पडले. 

कुंड गावाच्या पुढे साक्री नदीचे नामांतर ‘कुंड’ नदी असे होते. कुंड नदी केली ह्या गावानजीक आपले अस्तित्व मेळघाटाची जीवनरेखा असलेल्या ‘सिपना’ नदीत विलीन करते. सागवान वृक्षांची मुबलकता हे मेळघाटाचे वैशिष्ट्य. कोरकू भाषेत सागवानाला शब्द आहे ‘सापुन’. सापुन वरून नदीचे नाव सिपना. मेळघाटच्या अभयारण्यात कोरकू आदिवासींची भाषा आणि  संस्कृतीच्या पाऊलखुणा अशा जागोजागी आढळतात. कुंड परिसरात जंगलाचे अस्सल वैभव बघायला मिळते. गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेत तीस हेक्टर क्षेत्रावर उगवलेले हिरवेकंच गवती कुरण मन प्रसन्न करते. उन्हाळ्यात डोंगराळ भागातून रानगवा, सांबर, भेकर असे प्राणी कुंड परिसरात स्थलांतरित होत असतात. त्यांच्या पाठीच शिकारी प्राणी जसे रानकुत्रे, बिबट यांचा वावर वाढतो. अशा बिकट जंगलात वनखात्याचे केवळ एक वनपाल आणि चार वनरक्षक इतके कर्मचारी कार्यरत आहेत.  वैराट येथील रिपीटर स्टेशनशी तेवढा त्यांचा संपर्क असतो. इथे बदली म्हणजे शिक्षा अशी धारणा असताना ग्वालवंशी नावाचे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आजही गेली पाच वर्षे येथे आनंदाने कर्तव्य बजावत आहेत. पावसाळी दिवसात तर हा कुंड परिसर म्हणजे केवळ स्वर्गच! उन्हाळ्यात बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी प्रगणनेकरिता वन्यप्रेमींना प्रत्यक्ष सहभागाची संधी दिली जाते त्या वेळी सर्वात जास्त मागणी कुंड परिसराची असते. तब्बल तीस पाणवठ्यांनी समृद्ध असलेल्या ह्या परिसरात वन्यप्राणी दर्शनाची शक्यता सर्वाधिक असते.

साडेचार फूट उंची असलेले सोमजी कासदेकर म्हणजे वन आणि वन्यप्राणी ह्यांच्याविषयीच्या माहितीचे जणू चालते फिरते संगणक. टायगर ट्रेकिंगच्या वेळी मला जंगलात त्यांच्या सहवासाचा योग आला. वनस्पतींची ओळख, वन्यप्राणी व त्यांचे अप्रत्यक्ष पुरावे, वर्तणूक व स्वभाव अशा प्रत्येक विषयावर त्यांची दांडगी पकड पाहून थक्क झालो. कुंड ते चिखलदरा व परत कुंड असा तीस कि.मी.चा निबिड जंगलातील प्रवास एका दिवसात एकट्याने करण्याची त्यांची ख्याती होती. त्यांच्याशी बोलताना कळले की, कुंड गावातील लोक दीर्घायुषी असतात. ज्या वेळी आमचा संवाद सुरू होता त्यापूर्वीच्या दहा वर्षात त्या गावात एकही मृत्यू घडला नव्हता. आणखी एक मजेशीर गोष्ट त्यांनी सांगितली की, त्यांच्या गावच्या मुली लग्न करून सासरी दुसऱ्या गावाला जात नाहीत. उलट मुलींचे नवरेच घरजावई बनून गावात राहतात.  कारण विचारताच ते हसत म्हणाले, “सालभर गावनजीक मच्छी मिलती है ना!”  कुंडचे शुद्ध पर्यावरण आणि निसर्ग समृद्धीमुळे तेथील लोकांचा हॅपिनेस इंडेक्स उच्चतम असल्याची प्रचिती आली. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने कुंड येथील बांबूंच्या खुल्या मचाणावर महिन्यात किमान एक मुक्काम स्लीपिंग बॅगमध्ये करायची संधी मिळणे ही माझ्यासारख्या निसर्गवेड्यासाठी पर्वणी न ठरती तरच नवल. मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यूसाठी दुर्गम जंगली भाग ही सबब पुढे केली जाते, पण तारुबंदा-कुंडसारखे समृद्ध वनक्षेत्र त्यास अपवाद ठरते. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न ‘गाव तेथे वन’ ही संकल्पना राबवल्यास सुटू शकेल,असे मला वाटते.  “वन-धन-जन” – वन है तो धन है तो जन है.   

‘कुलामामाच्या देशात’ च्या निमित्ताने मेळघाटातील जंगल,आदिवासी, पर्यावरण, जनजीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वन्यप्राण्यांच्या कथा वाचकांपर्यंत गेले वर्षभर पोहोचवता आल्या आणि वाचकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे समाधान पावलो. 

(सदर समाप्त)

रवींद्र वानखडे

raviw1962@gmail.com

शब्दांकन : जी. बी. देशमुख

संपर्क : ९४२३१२४८३८

gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...