आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ravindra Wankhede Write About \'Melghat Wildlife Sanctuary\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपारीत वाघोबा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जात-धर्म-पंथाच्या पताका हाती घेऊन माणूस माणसाच्या अस्तित्वावर उठला आहेच, पण तो वन्यजीवांनाही संपवू पाहतोय? गेल्या काही वर्षांत शहरीकरणाच्या वेगापाठोपाठ माणूस आणि वन्यजीव यांच्यात वाढत्या संघर्षाच्या घटना त्याचीच साक्ष देत आहेत. या पार्श्वभूमीवर मेळघाटातील वन्यजीव संपदेच्या अनुभवावर आधारलेले, वन्यपशू आणि माणसातील सहअस्तित्वाचे अर्थ आणि महत्व उलगडून सांगणारे हे पाक्षिक सदर...

 

एकच क्षण. एकच नजर. एकच कटाक्ष. भेदक, आकर्षक, अवर्णनीय. दुसऱ्याच क्षणी त्याचं भांबावलेपण लुप्त झालं. परिस्थितीच त्याला आकलन झालं, आणि ‘अरे, बेकारही हडबडाए और डरे भी तो किससे?’ या अर्थाची नजर आम्हाला देत, सावकाशपणे, ऐटीत तो जंगलात अदृश्य झाला...


मेळघाटातील आदिवासींच्या कोरकू भाषेत वाघासाठी शब्द आहे, ‘कुला’ आणि आदिवासी बांधव मायेने, त्यांना संबोधतात ‘कुलामामा’! १९९१च्या उन्हाळ्यातील ही गोष्ट. नवीन क्षेत्रसंचालक रुजू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला होता. त्यांना अद्याप जंगलाच्या राजाने अर्थात कुलामामाने दर्शन दिले नव्हते. रुजू होते वेळी कदाचित साहेबांना असे वाटले असावे की, मेळघाटातील पूर्ण वनविभाग त्यांच्या दिमतीला असल्यामुळे व्याघ्रदर्शन ही त्यांच्यासाठी सहज होणारी घटना ठरेल. परंतु प्रत्यक्षात झाले विपरित होते. वाघोबा अजूनही त्यांच्यावर प्रसन्न झाले नव्हते. एके दिवशी ते उद्वेगाने म्हणाले, ‘इतका मोठा माझा स्टाफ आहे, पण तुम्ही लोक मला तीन महिन्यात एक वाघदेखील दाखऊ शकला नाहीत.’

 

साहेबांची तक्रार खरी होती. सरकारी स्तरावर उत्तर देताना ‘साहेब, तुमचं नशीब फुटकं आहे, त्याला आम्ही काय करावं?’ असं खरखुरं उत्तर देता येत नव्हतं, म्हणून मी त्यांच्या समोर  वाघ न दिसण्याच्या शास्त्रशुद्ध आणि तर्कसंगत कारणांचा पाढा वाचला. डोंगराळ प्रदेश, कमी धारण क्षमता, एक-एका वाघाचा विस्तीर्ण इलाखा इ. इ. साहेबांनी त्यावर इतकीच प्रतिक्रिया दिली, ‘ते सर्व ठीक. मी तुम्हाला अजून सात दिवस देतो. पुढचे सात दिवस हुकूम माझा नव्हे, तुमचा चालेल. तुम्ही म्हणाल तसे मी करतो. कुठे जायचे, कसे जायचे, हे सगळे तुम्ही ठरवा.  रात्र असो की दिवस, वेळेचे बंधन नाही. मी तुमच्या मागे-मागे येईन, पण तुम्हाला मिशन यशस्वी करून दाखवावे लागेल, मला मेळघाटातील वाघ दाखवावा लागेल.’

 

प्रकरण हातघाईवर आले होते. साहेबांचे व्याघ्रदर्शन आता ‘इज्जत का सवाल’ झाला होता. संपूर्ण विचाराअंती मी रंगुबेली हे ठिकाण सुचविले. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील रंगुबेली या ठिकाणानजीक खापरा नदी तापी नदीला जाऊन मिळते. त्या संगमाची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे ३५० कि.मी. आहे. समुद्र सपाटीपासून ११७८ कि.मी. उंचीवर असलेले  वैराट हे मेळघाटातील सर्वात उंच ठिकाण आहे. खापरा नदी तापीला भेटण्यापूर्वी अनेक वळणं घेते. कदाचित आपले स्वतंत्र अस्तित्व गमावण्याची इच्छा नसल्यामुळे ती इतके आढेवेढे घेत असावी. जमिनीचा उतार कमी झाल्याने नदीचे पात्र उपलब्ध उतारानुसार फिरत फिरत जाते, हे त्या आढ्यावेढ्यांच्या मागील शास्त्रीय कारण. तापी नदीच्या पात्रानजीक गाळाची सकस माती जमा झालेली नजरेस पडते. कधीकाळी बांबूचे बी नदीच्या पाण्यासोबत वाहत आले आणि या दोनही नद्यांच्या काठांवर समान उंचीवर पसरले असावे, ज्यामुळे सर्वत्र बांबूच्या दाट रांगा तयार झाल्या. बांबू इतका दाट की इतर वनस्पतींचे नामोनिशाण नाही. या दाट बांबूंच्या जंगलात गुरांचे दांड सोडल्यास रस्ते काढणे केवळ अशक्य. उंचदाट बांबूंच्या खालून भुयाराप्रमाणे तयार झालेल्या गुरांच्या दांडातून वाकत-वाकत चालणे हाच एकमेव पर्याय. घनदाट बांबूच्या जंगलाच्या आडोशाचा फायदा घेऊन  तिथे सुमारे चार वाघांचे अस्तित्व असल्याची खात्रीपूर्वक माहिती होती. ‘तुम्ही म्हणाल, तेथे जाऊ’ असं म्हणणारे साहेब शब्दांस जागले. रंगुबेलीचे ठरले.

सतत तीन दिवस रंगुबेली, कुटुंगा, कुंड, घोकडा, खामदाखेडा, किन्हीखेडा, राजकिल्ला, तसेच खापरा व तापी नदीच्या संगमानजीकचे उंच ठिकाण असलेले मेळघाट क्षेत्र पिंजून काढले. 

सकाळी चार ते दहा नुसती भ्रमंती.  दहा ते बारा कार्यालयीन काम.  दुपारी बारा ते चार विश्रांती व चार ते रात्री आठ पर्यंत पुन्हा वाघाच्या शोधकार्यात भटकंती, अशी जबरदस्त मोहीम सुरु होती.  त्या क्षेत्रातील सर्व पाणवठे तुडवून झाले, चांदणी डोह, घोगरा अशी वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्या सर्व  ठिकाणी भल्या पहाटे किंवा संध्याकाळी दोन ते तीन तास शांतपणे बसून वाघोबांची प्रतिक्षा केली. या सर्व जागी वाघ व अस्वलाच्या अस्तित्वाच्या ताज्या खुणा, जसे विष्ठा, जमिनीवर नखांनी खुरपल्याच्या खुणा, बैठकीच्या खुणा ते भोवताली असण्याची जाणीव करून देत होते, पण काही केल्या एकही वाघ दर्शन देण्यास राजी नव्हता.  तीन दिवस अशी कठोर परीक्षा झाल्यानंतर साहेबांचा संयम सुटला. चवथ्या दिवशी साहेबांनी मनातले बोलून दाखवले. म्हणाले, ‘रवी, तुझे आणि माझे सोबत जाणे लाभी दिसत नाही.’ 

 

...आणि त्यादिवशी सकाळच्या नाश्त्यानंतर आम्ही स्वतंत्रपणे दोन गटात वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन  वाघोबांचा शोध घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत असताना जर मला वाघ दिसला, तरी साहेबांना दाखविण्यासाठी त्याला धरून ठेवता आला नसता, तेव्हा या धोरणाचे हशील काय, असे इंटेलिजंट प्रश्न साहेबांसमोर विचारायचे नसतात. हरिसाल पर्यंत आम्ही सोबत गेलो, आणि पुढे ढाकणा-डोलार-कोकटू हे साहेबांच्या पसंतीचे क्षेत्र त्यांनी निवडले आणि मी गेलो रायपूरला. दुपारी बाराच्या सुमारास मी पोहोचलो रायपूरच्या विश्रामगृहात. वनरक्षक बेलसरेंची भेट झाली. मी त्यांना म्हटले, ‘गेले चार दिवस सतत शोध घेऊनही साहेबांना आम्ही वाघ दाखवू शकलो नाही. शेवटी, साहेब गेले तिकडे आणि मी आलो इकडे. आता तुम्हीच मला वाघ दाखवा, बोला, वाघ दाखवू शकता काय?’

 

‘अभी चलने का क्या? अभ्भीच दिखाता...’, बेलसरेंचा आत्मविश्वास दाद देण्यासारखा होता.
‘कहा जाना पडेगा?’ मी.
‘हल्दु तलई.’ बेलसरे म्हणाले.
‘कितना दूर?’ मी.
‘बस पाच कि.मी.’ बेलसरेंचे उत्तर.
‘कैसे जाना?’ मी.
‘पैदल.’ बेलसरे.

 

बेलसरे स्वत: मेळघाटातील कोरकू या आदिवासी जमातीचे. बेलाच्या झाडावरून त्यांचे गोत्र ठरले. याच प्रकारे या जमातीत ‘सेमलकर’, ‘भिलावेकर’, ‘जामुनकर’ अशी आडनावं अनुक्रमे सेमल, बिबाव व जांभूळ या झाडांच्या नावावर असलेल्या गोत्रांवरून तयार झालेली आढळतात. आदिवासींची मुळं जंगलाच्या अस्सलतेशी कशी जुळली आहेत, त्याचा हा एक नमुना.  

 

भुकेच्या तडाख्यात बेसनासोबत चांगली दीड भाकरी हाणली. हात धुतले. कान आणि डोक झाकत गमछा बांधला आणि बेलसरेंना म्हणालो, ‘चलो’. आणि आमची दोन सदस्यीय चमू निघाली, हल्दू तलईकडे. पाच कि.मी. अंतर एका तासात पार केले. रस्त्यात झाडं भरपूर होती, पण सगळी सागवानाची. त्यामुळे सावलीचा पत्ता नाही. मार्गात ओहोळ-नाले मुबलक परंतु उन्हाळ्यामुळे सगळे कोरडे ठण्ण! ‘तलई’ म्हणजे दरीचा समतल खोलगट भाग. ‘हल्दु तलई’ म्हणजे जिथे हल्दु झाडांचे जास्त प्रमाण आहे अशा जंगलातून वाहत येणाऱ्या ओढ्यांचा शेवटी असणारा खोलगट समतल भाग. प्रत्यक्ष डोहापाशी पोहोचल्यावर आम्ही सतर्क होतो. डोह नजरेच्या टप्प्यात येताच आम्ही काळजीपूर्वक चालू लागलो होतो. डोहात पाणी होते. पण आसपास वाघोबा नव्हते. पाच कि.मी.ची भर उन्हातील तंगडतोड निष्फळ ठरली होती. पण आता बेलसरेसुद्धा इरेस पेटले होते.  ते म्हणाले, ‘रूको साब, यहा से एक कि.मी. उपर गये तो, घोगरा है. पानी नही होता वहा, पर धुप के टाइम शेर वहा आकर बैठता है.’ ‘घोगरा’ म्हणजे खडकातील कपार. मी म्हटले, ‘चलो.’ मनात वाघ दिसण्याची शाश्वती नव्हतीच, पण मी नकार दिला नाही. आम्ही मुद्दामच घोगऱ्याच्या वरच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. अत्यंत काळजीपूर्वक घोगऱ्याच्या दिशेने आमची आगेकूच सुरू होती. वाघ असो की नसो, काळजी घेणे आवश्यक होते. जराशी गफलत जिवावर बेतायची. म्हणून गुपचूप चालत असता आमचा संवादही खाणाखुणांतून सुरू होता.

 

कपारीचा वरचा अंदाजे वीस मीटरचा भाग काळ्या पाषाणाचा होता. अगदी दबक्या पावलाने, कोणताही आवाज न करता एक-एक पाऊल टाकत आम्ही पुढे सरकत होतो.  मी फारशी आशा बाळगून नव्हतो. म्हणतात ना माणूस अती सावध असला, की त्याच्या हातून काहीतरी चूक होते. तसेच झाले. एका लहान दगडाला नकळत माझ्या पायाची ठोकर लागली आणि पाठ्यावरून (दगडी भागावरून) घरंगळत तो दगड कपारीत जाऊन पडला. शांत वातावरणात दगडाच्या घरंगळण्याचा आवाजही मोठा भासत होता. त्या आवाजासरशी कपारीच्या दोन टोकांशी असलेल्या दोन झाडांपैकी एकावरून एक सर्पगरूड आणि दूसऱ्यावरून ब्राऊन फिशिंग आऊल (घुबड) असे मोठ्या आकाराचे पक्षी उडाले.  त्या पक्षांचे उड्डाण बघत असतानाच तिथे वाघ असण्याची माझी उरली सुरली आशाही मावळली.

 

वाघ असण्याची शक्यता संपल्यात जमा असल्यामुळे आता मी बिनधास्त झालो. वेगाने कपारीकडे चालू लागलो. मधे आलेल्या दगडाला आता जाणूनच लाथ हाणली. घरंगळत जाणाऱ्या दगडाचा आधीप्रमाणेच आवाज झाला आणि अचानक कपारीतून पुढे असलेल्या रायमूनीच्या दाट झाडींवर छलांग लगावणारे वाघोबा दिसले. दगडाच्या आवाजामुळे सावध झालेल्या वाघोबांनी संकटाची चाहुल घेऊन सरळ आवाजाच्या विरूद्ध दिशेने रायमुनीच्या झाडींवर झेप घेतली होती. दाट झाडीवर भांबावलेल्या अवस्थेत काही क्षण वाघोबांचे शरीर अधांतरी तरंगले. पायाखाली आधार नसल्यामुळे काही क्षण त्याने हवेत पाय मारले. पायाला आधार मिळताच दौड लगावत थोडा वरच्या बाजूला तो गेला, आणि मग मागे वळून त्याने तो लाख मोलाचा लुक दिला. एकच क्षण. एकच नजर. एकच कटाक्ष. भेदक, आकर्षक, अवर्णनीय. दुसऱ्याच क्षणी त्याचं भांबावलेपण लुप्त झालं. परिस्थितीच त्याला आकलन झालं, आणि ‘अरे, बेकारही हडबडाए और डरे भी तो किससे?’ या अर्थाची नजर आम्हाला देत, सावकाशपणे, ऐटीत तो जंगलात अदृश्य झाला...

आम्ही पुरते गांगरलेलो. गळ्यात कॅमेरा लटकतच राहिला. फोटो घेण्याचे भान राहिले नव्हते. निमिषार्धात सर्व काही घडून गेले. त्या राजबिंड्या नजरेशी नजरानजर झाली. धन्य झालो. दर्शन झाले, पण पुरावा तयार करू शकलो नव्हतो. पुरावा नव्हता, म्हणून अनुभवलेला थरार गुपीतच राहू दिला. आयुष्यभरासाठी मर्मबंधातली ठेव बनून राहील अशा, थरारास कुणी ‘उगाच बाता मारता’ अस म्हणत उडवून दिल्यास, ते आवडलं नसतं, म्हणून तो प्रसंग स्वत:पुरताच ठेवला...

 

(रवींद्र वानखडे हे मेळघाटातल्या जंगलात वनाधिकारी पदाचा दोन दशकांहून अधिक काळचा अनुभव असलेले जाणकार, सध्या पुणे येथे वनसंरक्षकपदी कार्यरत आहेत. तर जी. बी. देशमुख अमरावती येथे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागात अधिक्षकपदी कार्यरत असून, समाज, संस्कृती, निसर्ग हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

 

शब्दांकन : जी. बी. देशमुख
gbeshmukh21@rediffmail.com
संपर्क  : ९४२३१ २४८३८