आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक थरारपट!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांबरांची शिकार करणारे सुमारे पन्नास शिकारी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसह कोकटू येथील वन विश्रामगृहाला वेढा घालून बसल्याचे तिथे हजर असलेले वनरक्षक राजेश घागरे यांच्याकडून कळले. त्यांच्या सोबतीला वनमजूर सरदार, कमकुवत बिनतारी संदेश यंत्रणा आणि एक डबल बॅरेल गन इतकीच सामग्री होती. 

 

आम्ही प्रत्यक्ष हल्ला करण्याइतक्या अंतरावर पोहोचताच जोशात आलेल्या माजी सैनिकाने फिल्मी स्टाइलने ललकारी दिली, “अगर किसीने हिलने की कोशिश की तो भून के रख दूंगा.” ....आणि आम्हाला काही कळायच्या आत पूर्ण टोळके होते त्या स्थितीत वाट फुटेल तिकडे पसार झाले. 

 

त्या दिवशी जिल्हाधिकारी, अमरावती याच्या कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीत मी व्यग्र होतो. माझ्या वाहन चालकाने मला एक चिठ्ठी पाठवली. ‘कोकटू भागात शिकारी घुसले आहेत' असा संदेश गाडीतल्या बिनतारी संदेश यंत्रणेवर प्राप्त झाला होता.  मी तातडीने बैठकीतून  बाहेर आलो आणि नेमकी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सांबरांची शिकार करणारे सुमारे पन्नास शिकारी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसह कोकटू येथील वन विश्रामगृहाला वेढा घालून बसल्याचे तिथे हजर असलेले वनरक्षक राजेश घागरे यांच्याकडून कळले. त्यांच्या सोबतीला वनमजूर सरदार, कमकुवत बिनतारी संदेश यंत्रणा आणि एक डबल बॅरेल गन इतकीच सामग्री होती. 


घागरेंशी पुन्हा  संपर्क झाल्यावर अधिक माहिती कळली की, कोकटूपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या आमराई क्रमांक २ पाणवठ्याकडे ते गेले असता त्यांना दोन पाळीव कुत्री दिसली. एवढ्या दुर्गम जंगलात पाळीव कुत्री म्हणजे त्यांचे मालक सोबत असणारच. त्या कुत्र्यांना काही प्रलोभन दाखवत त्यांनी जवळ बोलावलं आणि जवळ येताच त्यांना वन विश्रामगृहाच्या शेडमध्ये कोंडून ठेवले. कल्पना अशी होती की, दुसऱ्या दिवशी कुत्र्यांना मोकळे सोडून द्यायचे आणि पाठलाग करत त्यांचे मूळ ठिकाण आणि मालकांचा शोध घ्यायचा. परंतु कुत्री कोंडल्यानंतर अर्ध्या तासातच शिकाऱ्यांचा जमाव वन विश्रामगृहावर चाल करून आला.  “कुत्ते छोड दो वरना जान से मार देंगे” अशा धमक्या देत जमावाने दगडफेक सुरू केली. घागरे माणूस तसा हिंमतवान... त्यांनी डबल बॅरेल गन लोड करून आणली आणि प्रति ललकारी देत, “यहां से तुरंत निकलो वरना गोली मार देंगे.” केवळ एका बंदुकीच्या धाकावर दोन माणसं इतक्या मोठ्या जमावास जास्त वेळ नियंत्रित करू शकणार नव्हते. 


बिनतारी संदेश यंत्रणेवर मी घागरेंना सांगितले, “वन परिक्षेत्राधिकारी पचारे आठ ते दहा लोकांना घेऊन धारगडहून निघाले आहेत. तोपर्यंत तुम्ही बिनतारी यंत्रणेचा आवाज शिकाऱ्यांना ऐकू जाईल इतका मोठा करा आणि त्यांना कळू द्या की मोठी कुमक येऊ घातली आहे.  आणीबाणीची स्थिती ओढवल्यास जिवाचा धोका न पत्करता कुत्री सोडून द्या.” परंतु घागरेंच्या अंगात त्या वेळी संपूर्ण वीरश्री संचारली होती. ते म्हणाले, “सर, आम्ही कुत्री तर सोडत नाही. अतिरिक्त कुमक अंधारापूर्वी पोहोचेल तेवढं मात्र पाहा.”   


अमरावती ते परतवाडा प्रवासात कोहा, तारुबांदा, ढाकणा, हरिसाल येथील कर्मचाऱ्यांना कोकटूकडे निघण्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या. धारगडचा चमू कोकटू येथे पोहोचल्याचे कळले आणि महाराज गडावर पोहोचल्याची खूण म्हणून उडवलेल्या तोफांचा आवाज ऐकून बाजीप्रभू देशपांडेला कोण समाधान मिळाले असेल याची प्रचिती आली.  आपली माणसं जिवाची बाजी लावून कर्तव्यासाठी उभी आहेत ही भावना रोमांचित करून गेली. शिकारी टोळकं वन विश्रामगृहापासून दूर निघून गेल्याचं कळलं. आमचं पुढचं लक्ष्य होते शिकाऱ्यांच्या टोळीची शिकार करण्याचे. शिकारी टोळी रातोरात जंगल सोडून जाणे शक्य नव्हते. विविध दिशांनी कोकटूकडे कूच केलेल्या कर्मचाऱ्यांंना गुलरघाट, खोंगडा, कोहा, ढाकणा, डोलार इ. जागी मुक्काम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. कोहा, ढाकणा येथील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मी स्वत: डोलार येथे मुक्कामी गेलो. भल्या पहाटे चहूबाजूंनी सहा चमू एकूण साठ ते सत्तर कर्मचाऱ्यांसह कोकटूकडे निघाले. प्रत्येक चमूसोबत किमान एक डबल बॅरल गन होती. आपसात बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संपर्कात राहण्याचे ठरले होते.  डोलार, सालरपाठा, बोरीपाटी मार्गे पायवाटेने  चालणाऱ्या चमूत माझ्यासह दहा जण होते. एव्हाना उजाडले होते आणि समोर दोन पहाड दत्त म्हणून उभे होते. उन्हाळ्यात उंचावरून खोल दरीत पाणी प्यायला जाणाऱ्या प्राण्यांच्या पाऊलखुणांमुळे ज्या सगरी तयार होतात त्यांच्या आधारेच हे पहाड चढण्याचे  दिव्य पार पाडायचे होते.  छोटी आसेरी आणि मोठी आसेरी अशी नावे असलेले हे पहाड आम्हाला मात्र  त्या वेळी साक्षात अहिरावण आणि महिरावण भासत होते. छोटी आसेरी पायदळी तुडवत दोन कि.मी.चे अंतर कापायला एक तास लागला.  काही जणांच्या चालीत आता लंगड आली होती. पहाडमाथ्यावर अल्प काळ विसावलो.  तशात दूरवर पंधरा-सोळा जणांची टोळी एका रांगेत मोठ्या आसेरीच्या दिशेने चालत जाताना दृष्टीस पडली.  त्या टोळीच्या वाटेवर पुढे एक पाणवठा असून त्यांना पाणवठ्यावर गाठता येईल, अशी माहिती आमच्यातील एका स्थानिक मजुराकडून मिळाली. दुर्बिणीतून निरीक्षण केले असता शिकाऱ्यांच्या सोबत दहा-बारा पाळीव कुत्रीसुद्धा दिसली.  


माझ्यासोबत दहा माणसे, त्यापैकी दोन माजी सैनिक.  माझ्या कमरेला असलेली नऊ एम.एम. ची एक पिस्तूल आणि एक डबल बॅरल गन...  इतक्या ‘विपुल’  शस्त्रसाठ्यासमवेत आम्ही शिकारी टोळीचा पाठलाग करू लागलो. इतर चमूंनासुद्धा आम्ही सतर्क केले.  एकामागे एक रांगेत एक कि.मी. चे अंतर आम्ही पार केले आणि पाणवठा जवळ आल्यासरशी सगळे दडून बसलो. अपेक्षेप्रमाणे शिकारी पाणवठ्याभोवती तंबाखू चोळत बसले होते आणि त्यांची कुत्री इतस्तत: भटकत होती. सोबतचा माजी सैनिक माझ्या कानात पुटपुटला, “सर, हम नजदीक जाकर अचानक हमला बोल देंगे. अचानक हमले से हम कम होने के बावजूद उनपर हावी होंगे.” आम्ही प्रत्यक्ष हल्ला करण्याइतक्या अंतरावर पोहोचताच जोशात आलेल्या माजी सैनिकाने फिल्मी स्टाइलने ललकारी दिली, “अगर किसीने हिलने की कोशिश की तो भून के रख दूंगा.” ....आणि आम्हाला काही कळायच्या आत पूर्ण टोळके होते त्या स्थितीत वाट फुटेल तिकडे पसार झाले.  तीन-चार कळकट पिशव्या, तीन कुऱ्हाडी आणि दोन कुत्री... ही होती आमच्या जप्त मालाची यादी.  एका पिशवीत पूजेचे साहित्य, दुसरीत गव्हाचे पीठ आणि मिरची मिठाचा गोळा. मुद्देमाल ताब्यात घेऊन आम्ही ताबडतोब ते ठिकाण सोडायचे ठरवले.  कारण, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे डिवचलेली टोळी थोडी उसंत घेऊन पुन्हा संघटित होण्याची शक्यता होती. थोड्याच वेळात आम्ही गुगामल पठारावर पोहोचलो.  कोहा येथून निघालेला आमचा एक गट तिथे आमच्यात येऊन मिसळला. आमच्या हल्ल्याच्या धुमश्चक्रीत त्या दिशेने पळालेला एक शिकारी त्यांनी पकडला होता. हा एकमेव ‘अजमल कसाब’ हाती लागला होता.  


कोकटू येथे पोहोचेपर्यंत आम्ही साठ ते सत्तर लोक एकत्रित झालो होतो. हाती आलेला एकमेव कसाब प्रत्येक इच्छुकाकडून मिळणारा प्रसाद कष्टाने ग्रहण करत होता, पण तोंड उघडायला तयार नव्हता.  शेवटी एक अचाट कल्पना कामी पडली. वन विभागाच्या लाडक्या ‘लक्ष्मी’ हत्तिणीला कसाबच्या पुढ्यात उभ केलं. लक्ष्मी तिच्या सोंडेचा स्टेथॅस्कोप करून आमच्या कसाबला तपासू लागली तेव्हा मात्र या पक्क्या गड्याची सटारली. लक्ष्मीच्या तपासणीची पुढील पायरी सोंडेत उचलून गरागरा फिरवण्याची असू शकते, असा अंदाज येताच कसाबचे अवसान गळाले.  “साब, पहले हाथी हटाव, सब बताता,” असं म्हणत तो बयान देण्यास तयार झाला. त्याच्याकडून या शिकारी टोळीचे मूळ गाव कोणते, ते कळले. नंतर त्याच्या बयानाच्या आधारे १५-१६ जणांच्या पूर्ण टोळीचा शोध लागला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास गाव-पंचायतीमुळे पंचाईत झाली. परंतु, काही काळापुरता का होईना सांबरांच्या अवैध शिकारीला आळा बसला.  


या प्रसंगात वनरक्षक घोगरे आणि वनमजूर सरदार यांनी आणीबाणीच्या वेळी जे धैर्य दाखवलं त्यास तोड नाही. प्रत्यक्ष रणभूमीवर सीमित साधनं हाताशी असताना सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रसंगी जी लढवय्येपणाची भावना दिसून येते, तिचे मोल होऊ शकणार नाही. 


एका दंडुक्याच्या भरवशावर ए.के.४७ धारण केलेल्या अतिरेक्यांना सामोरे जाऊन धारातीर्थी पडणाऱ्या तुकाराम ओंबाळेसारख्या वर्दीवाल्यांची कर्तव्यनिष्ठा आपण समजून घेऊ तोच सुदिन! 

शब्दांकन : जी. बी. देशमुख
संपर्क : ९४२३१२४८३८
gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...