आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याला मिळाले जीवदान...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातून शिडी आणली आणि दोर बांधून खाली विहिरीत सोडली. बिबट्याच्या जवळ शिडी पोहोचताक्षणीच त्याने खडकावरील पकड सोडून शिडी धरली. लगेच शिडीच्या दोन पायऱ्या तो चढला, त्याने वर पहिले. आम्ही सगळे विहिरीच्या कठड्याभोवती उभे राहून खाली पाहत होतो. बिबट्याला एकाचवेळी अनेक वटारलेले डोळे दिसले. वर जाण्यापेक्षा खालीच बरे, असा निर्णय घेऊन त्याने परत पाण्यात उडी घेतली.
 
धामणगाव गढी हे गाव परतवाडा ते चिखलदरा मार्गावर आहे. गावातील जगन्नाथ पाटील हे  एका मध्यम आकाराच्या जमिनीचे मालक. शेतात एका कोपऱ्याला साधारण आकाराची दगडात बांधलेली विहीर. 
“भाऊ, विहिरीत दोन बिबटे पडले आहेत.  माणसं गर्दी करून राह्यले.” सकाळच्या वेळीच त्यांच्या बगीच्यातला सोकारी धापा टाकत आला. पाटील आणि सोकारी शेतात पोहोचले. पाटलांनी विहिरीत डोकावले तर एक  मध्यम आकाराचा बिबट्या आत पडला होता.  त्याची पूर्ण वाढ झालेली नसली तरी तो बच्चा नव्हता.  एका खडकाला समोरच्या दोन पंजांनी धरून तो वर पाहत होता. लगेच त्याने खडकावरील पंजाची पकड सोडली आणि पाण्यात गोल रेषेत पोहू लागला. थकवा आला की खडकाला धरणे, पंजांना कळ लागली की पुन्हा पोहणे असा त्याचा क्रम सुरू होता. सोबतच एक बच्चाही पाण्यात तरंगत होता. पाटलांनी वनविभाग आणि पोलिस स्टेशनला सूचना दिली. थोड्याच वेळात तेथे वनपरिक्षेत्राधिकारी  संजय जगताप आणि  पोलिस दाखल झाले. आम्हाला परतवाड्याच्या कार्यालयात निरोप मिळाला, आम्हीही लगेचच पोहोचलो. बिबट्या एका खडकाला धरून वर पाहत होता. त्याच्या नजरेत थकवा, चीड, आश्चर्य असे मिश्रित भाव होते. तरी आक्रमकतेचा पवित्रा मात्र अस्सल होता, याचना नव्हती.  मांजरवर्गीय प्राण्यांचे हेच वैशिष्ट्य  आहे.  कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर अजिजी नसते. संकटात तो असतो, पण गंमत बघायला आलेले बघेच घाबरलेले असतात. दुर्बिणीतून निरीक्षण केल्यावर तरंगणारा दुसरा प्राणी बिबट्या नसून मोठ्या आकाराचा बोक्या होता. तो गतप्राण झाला असल्याची खात्री पटली. विहिरीत आधाराला फक्त एकच खडक म्हणून बिबट्या तर वाचला पण बोक्याला जलसमाधी मिळाली असावी. 

गावातीलच एकाच्या घरून बांबूची शिडी आणली आणि दोर बांधून खाली सोडली. बिबट्याच्या जवळ शिडी पोहोचताक्षणीच त्याने खडकावरील पकड सोडून शिडी धरली. लगेच शिडीच्या दोन पायऱ्या तो चढला, त्याने वर पहिले. आम्ही सगळे विहिरीच्या कठड्याभोवती उभे राहून खाली पाहत होतो. बिबट्याला एकाचवेळी अनेक वटारलेले डोळे दिसले. वर जाण्यापेक्षा खालीच बरे, असा निर्णय घेऊन त्याने परत पाण्यात उडी घेतली. मग उपलब्ध झाडांच्या फांद्या, लाकडी फळ्या एकत्र केल्या गेल्या. त्यांच्या वरच्या बाजूला शिडी बांधण्यात आली. हा जुगाड विहिरीत सोडून  बिबट्याची प्रतीक्षा करत बसलो. अर्ध्या तासात बिबट्याच्या लक्षात आले की जुगाडाची व्यवस्था त्याच्या सन्मानार्थच केली गेली आहे.  शिडीच्या आधारे आता तो सावधपणे वर येऊ लागला.  जवळ आल्यावर विहिरीत डोकावणारी डोळ्यांची गर्दी बिबट्याला पुन्हा एकदा दिसली आणि त्याने पुन्हा एकदा निषेध नोंदवत पाण्यात उडी घेतली. इकडे बचाव कार्यासाठी आलेली आमची ‘उच्च’ स्तरीय टीम पुन्हा नवीन तिकडम भिडवण्यावर विचार करू लागली. पोलिसांनी आता "नो एंट्री झोन' विहिरीपासून पन्नास मीटर अंतरावर निश्चित केला. परंतु खाकीवाल्यांना न जुमानणारे काही स्थानिक खादीधारी आत शिरकाव करतच होते. सर्वांना आपले मोठेपण दाखवायचे होते. बिबट्या मात्र सर्वांच्या मोठेपणाचे सुरू असलेले अस्थानी प्रदर्शन आटोपण्याची प्रतीक्षा करीत होता. बघ्यांची गर्दी ओसरण्याची वाट पाहणे ह्याशिवाय आम्हालाही पर्याय नव्हता. संध्याकाळी गर्दी ओसरल्यावर बिबट्या आपोआप बाहेर येऊन जंगलाची वाट धरेल, असा आमचा अंदाज. अजून चार-पाच  तासांचा प्रश्न होता. बंदोबस्त पुरेसा असल्याने संध्याकाळी परत तिथे येण्याचा निर्णय घेऊन आम्ही घटना स्थळ सोडले.
तासाभरातच कार्यालयासमोर दोन जीप आणि दहा-पंधरा कर्मचारी धडकले. म्हणाले “सर, आम्ही बिबट घेऊन आलो.” मी खुर्चीतून उठून लगेच बाहेर आलो. बघतो तर एका जीपच्या मागील भागात नायलॉन जाळीमध्ये बिबट्या गुंडाळलेला आणि चार कर्मचारी त्यावर पाय ठेवून सीट वर बसले होते. वन कर्मचाऱ्यांचा  चमू आणि पोलिस कर्मचारी युद्ध जिंकून परत आल्याच्या आविर्भावात  होते आणि त्यांच्या मागे बघ्यांची गर्दी होती. त्यातील वरिष्ठ वनरक्षकास विचारले, “बिबट्याला धरले कशाला? त्याला तर जंगलात जाऊ द्यायचे असे आदेश दिले होते ना?.”  तेव्हा झालेला प्रकार कळला...

“गर्दी मागे हटल्यावर, गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही एक लाकडी बंगळी आणली. दोरांच्या साहाय्याने तिला विहिरीत सोडले. वन परिक्षेत्राधिकारी संजय जगताप निर्देश देत होते. एकटे जगतापच विहिरीत डोकावून पाहत होते. बंगळी पाण्याच्या स्तरावर पोहोचताच बिबट्याने त्या सिंहासनावर विराजमान व्हायचे कबूल केले. वर येऊ लागलेली बंगळी विहिरीच्या कठड्याच्या थोडी खाली असतानाच बिबट्याने विहिरी बाहेर उडी घेतली. खुल्या शेतात गर्दीच्या विरूद्ध दिशेला तो पळाला आणि एका निंबाच्या झाडाखाली विसावला. आता बघ्यांची गर्दी आटोक्यात येईना. शेवटी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. बिबट्याला अजिबात न डिवचता सहजपणे जंगलाकडे जाऊ द्यावे अशा सूचना असल्यामुळे आम्ही सगळे निवांत संत्री खात बसलो होतो. 

“आम्हाला न विचारता एक पोलिस हवालदार बिबट्याच्या जवळ गेला आणि हातातील झाडाच्या फांदीने त्यास ढोसू लागला. आधी काही क्षण बिबट्याने दुर्लक्ष केले. पण पुन्हा एकदा हवालदाराने ढोसताक्षणी तो उसळला आणि त्याने हवालदाराच्या अंगावर झेप घेतली.  घाबरलेला हवालदार जमिनीवर चित पडला आणि बिबट त्याच्या छातीवर चढला. आम्ही सगळे वनरक्षक कबड्डीत गड्यावर धावून जातात तसे बिबट्यावर धावून गेलो. बिबट्या आकाराने फार मोठा नव्हता. ज्याच्या हाती बिबट्याचा जो अवयव येईल तो त्याने दाबून धरला.  उताणा पडलेला पोलिस, त्याच्या अंगावर बिबट्या आणि त्यावर आम्ही सात-आठ जण, असे दृश्य होते. आधीच थकलेला बिबट्या नियंत्रणात आला. जाळी आणि दोरांनी बांधून त्याला जेरबंद करण्यात आले. हवालदाराचे प्राण वाचवले गेले. हवालदाराच्या हाताला झालेल्या किरकोळ जखमा वगळता मोठी इजा झाली नव्हती. जीवनमरणाचा प्रश्न होता  म्हणून आपल्या आदेशाविरूद्ध जाऊन कारवाई केली.”  

अमरावतीवरून तत्कालीन डीएसपी भाल आणि डीसीएफ जरनैल सिंह परतवाड्यापर्यंत पोहोचले होते. एसपी साहेबांनी त्यांच्या हवालदारास घटनाक्रम विचारला. त्याने संगितले, “साहेब, ये लोग तो सिर्फ बगीचेमे संत्रे खाने का काम कर रहे थे . मै अकेला ही बिबट्या  के पास गया,  तो वो मेरे आंग पे आया. मैने एक हात उसके जबडे मे दिया और उसको अच्छी धोबी पछाड दी. बिबट्या को गिरा दिया.” त्या हवालदाराच्या ‘सुरमा भोपाली’ टाइप थापा एस.पी. साहेबांसमोर पचल्या. त्यांनी लगेच पाकिटातून पंधराशे रुपये काढून त्यास बक्षीस दिले. नंतर बिबट्याला जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले. 

पोलिस हवालदाराने केलेला प्रकार जोखीमपूर्ण होता. आता साधनसामग्रीची स्थिती तेव्हापेक्षा चांगली आहे. प्रशिक्षित कर्मचारीसुद्धा आहेत.  परंतु अशा वेळी बघ्यांनी शांत राहणे आणि पुढाऱ्यांनी मागे राहणे यातच शहाणपण असते. पण भारतात हे कुणी कुणास सांगावे, हा प्रश्नच आहे. अशा अनुशासनहीन आणि अतिउत्साही गर्दीत वन्यप्राण्याने कुणास जखमी केल्यास त्याचा दोष त्या प्राण्यांवर येतो. माणसे माणसांसारखी केव्हा वागू लागतील ह्याची जंगलातील प्राण्यांना प्रतीक्षा असावी.   

शब्दांकन : जी. बी. देशमुख
संपर्क : ९४२३१२४८३८
gbdeshmukh21@rediffmail.c
om

बातम्या आणखी आहेत...