आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौ बजे फिर आना!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग तीन दिवस माझ्या व्याघ्रदर्शनाची हॅट्रिक साधली गेली होती. कुठल्याही ताफ्याशिवाय आम्हाला व्याघ्रदर्शन घडले होते, परंतु प्रचंड ताफा सोबत असूनही इतरांना तर वाघीण दिसली, पण ज्यांच्यासाठी हा बंदोबस्त लावला होता त्या साहेबांच्या नशिबात मात्र व्याघ्रदर्शन नव्हते.  

 

आम्ही त्यांना रोखणार, तशात वाघिणीला त्यांची चाहूल लागली असावी.  पिल्लांना पुढे करून ती तशीच परत फिरली आणि तिने आसमंत दणाणून जावा अशी डरकाळी फोडली.  ‘औकात मे रहो’ असा तो इशारा होता.

 

जंगलातील वाघांचे संरक्षण करता करता त्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाचं वारंवार दर्शन करण्याचं व्यसनही जडलं गेलं. कुटुंब आणि जंगल असा समतोल सांभाळण्याची जबाबदारी असल्याने मे महिन्यात कुटुंबासह जंगल सफारीची योजना आखली. सरकारी कामाचा "छुपा अजेंडा' सोबत होताच. बोलेरो गाडीचे चालक अहमद, श्रमिक राजाराम, आम्ही दोघे नवरा-बायको आणि आमचे थोरले सुपुत्र अशा सगळ्यांनी कोहा मार्गे बनाम कडे कूच केली. 
कोहा गावाहून पुढे जात असता रस्त्यावर जागोजागी आडवा जाणारा बनाम नाला आम्ही किमान पाच वेळा ओलांडला. पुन्हा एकदा आडवा आलेला बनाम नाला ओलांडताना राजाराम म्हणाला, “सर, उस कोने मे एक डोह है. वहाँ पर तीन दिन पहले सुबह नौ बजे मैने एक शेरनी उसके दो बच्चो के साथ पानी मे बैठी देखी. सर, देखेंगे क्या?”  मनात उचंबळून आलेली ऊर्मी दाबत मी म्हटले, “नही, अभी अंधेरा होने को है. कल देखेंगे.” बनाम म्हणजे आंब्याचे बन. भर उन्हाळ्यात हिरवी पालवी राखणारे आंबा, जांभूळ, कुसुमसारखे वृक्ष बनाम नाल्याच्या काठावर असल्याने चिंचोली दरीच्या हिरव्यागार परिसरात प्राण्यांची रेलचेल होती.  जागोजागी वाघ आणि बिबट्यांच्या पंज्यांचे ठसे पाहून मनाला उभारी वाटत होती आणि त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा उचल खात होती.
बनाम कँपवर पोहोचलो तेव्हा अंधारलं होतं. सकाळी साडेसातला परतीचा प्रवास सुरू झाला. अंदाजे पाच कि. मी. पुढे गेल्यावर आदल्या दिवशी राजारामने दाखवलेल्या डोहाजवळ  गाडी उभी केली. साधारणपणे नऊ वाजले असावेत. माझा बारा वर्षांचा मुलगा विक्रम बालसुलभ उत्साहात श्रमिक राजारामसोबत पुढे-पुढे चालत होता. मी व पत्नी त्यांच्या मागे-मागे.  राजाराम आणि विक्रम आता डोहाजवळ पोहोचणारच होते आणि ते दृश्य नजरेस पडले. पिवळी पट्टेदार मेळघाटी वाघीण आणि तिचे दोन बछडे डोहातून निघून नजीकच्या मोठमोठ्या दगडांच्या मागून पहाड चढू  लागले होते.  आम्हा दोघांना मागून ते स्पष्ट दिसले, परंतु समोर असलेल्या विक्रम व राजारामने अधिक स्पष्ट पाहण्यासाठी पहाडाकडे जाणारी वाट धरली. दोघे समांतर चालत पुढे निघाले. आम्ही त्यांना रोखणार, तशात वाघिणीला त्यांची चाहूल लागली असावी.  पिल्लांना पुढे करून ती तशीच परत फिरली आणि तिने आसमंत दणाणून जावा अशी डरकाळी फोडली.  ‘औकात मे रहो’ असा तो इशारा होता. वाघिणीपासून विक्रम व राजाराम यांच्यातील अंतर फार तर तीस मीटर इतकेच असावे. डरकाळीमुळे  दोघेही धावत, धडपडत खाली आले.  पिल्लांच्या रक्षणार्थ डरकाळी फोडणारी वाघीण आणि त्या डरकाळीने हादरून धावत येणारं आपलं लेकरू अस थरारक दृश्य पाहून विक्रमची आई व मी जागेवरच खिळलो. अशा वेळी गात्रे बधीर होतात आणि बुद्धी संमोहित होते, त्याची प्रचीती आली. अगदी कमी अंतरावरून आपल्याला उद्देशून डरकाळी देणारी जंगलातील वाघीण अनुभवण्याचं थ्रिल शब्दांत व्यक्त करणे कठीणच.  छावे अडीच वर्षांचे होईपर्यंत वाघीण त्यांना असं कडक सुरक्षा कवच प्रदान करत असते.  त्यानंतर आम्ही परतवाड्याची वाट धरली. घडल्या प्रकाराच्या सावटातून बाहेर न आलेले आम्ही परतीच्या प्रवासात दगड होऊन बसलो होतो. काय घडू शकले असते याच्या वाईटातील वाईट कल्पना पिच्छा पुरवत होत्या.

  
त्याच दिवशी संध्याकाळी  कामानिमित्त  मला जिप्सी गाडीचे अनुभवी चालक निमकरांसोबत  परत कोकटूला जावे लागले.  वन खात्यातील दिर्घ सेवेत निमकरांना मेळघाटातील जंगल तसेच व्याघ्रदर्शनाचा दांडगा अनुभव होता, तरीही व्याघ्रदर्शनाची त्यांची भूक कायम असायची.  रात्री आमचा मुक्काम कोकटू येथे होता.  दरम्यान, चिखलदरा येथे दुसऱ्या दिवशी दुपारी वन विभागाचे प्रमुख प्रधान मुख्य वन संरक्षक पोहोचणार आहेत या आशयाचा बिनतारी संदेश आम्हाला प्राप्त झाला. त्यांच्या आगमनापूर्वी चिखलदरा येथे पोहोचणे आवश्यक होते.  मी व निमकर सकाळी सातला चिपी, कोकजांबू, छोंद्रिआम मार्गे कोहा येथे पोहोचलो. थोड्याच वेळात आदल्या दिवशी वाघिणीने केलेल्या "मॉक चार्ज'च्या स्थळावर पोहोचलो. निमकर म्हणाले, “सर, नऊ वाजले. वाघिणीच्या स्नानाची वेळ झाली.” डोहापासून जिप्सी सुमारे दोनशे मीटरवर उभी केली आणि आम्ही दोघे अत्यंत दक्षतेने कोरड्या नदीच्या पात्राच्या एका बाजूने चालत निघालो आणि आमचा अंदाज खरा ठरला.  आज राणीसाहेब "पूल'मध्ये केवळ एका शहजाद्यासोबत डुंबलेल्या होत्या. वाघाची उत्पत्ती दक्षिण चीनच्या बर्फाळ प्रदेशात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उन्हाचा त्याला त्रास होतो. त्यामुळे पाण्यात डुंबायला त्याला आवडतं. उत्तम जलतरणपटूसारखा तो नदी, नाले लीलया पार करू शकतो. वाघीण व बछड्यांच्या जलविहाराचे दृश्य आम्ही दोघे मनसोक्तपणे डोळ्यात साठवून घेऊ लागलो. अत्यंत सतर्कतेने हालचाली करणाऱ्या वाघिणीला काही क्षणांतच आमची चाहूल लागली, तशी पाण्यात डुंबण्याची गंमत  आवरती घेऊन ती पिल्लासोबत पाण्याबाहेर आली आणि पहाडाच्या दिशेने चालू लागली.  ती दिसेनाशी होताच आम्ही जिप्सीकडे वळलो.


चिखलदऱ्याला दुपारी प्रधान मुख्य वन संरक्षक साहेबांचे आगमन झाले.  रात्री गप्पांच्या ओघात सकाळी नऊ वाजताच्या व्याघ्रदर्शनाची गोष्ट माझ्या तोंडून नकळत निघून गेली.  मग काय, “वानखडेजी, ऐसे जबानी बताने से काम नही चलेगा.  कल ठीक नौ बजे उसी जगह पर आप हमे शेर दिखायेंगे.” साहेबांनी फर्मान काढले.  दुसऱ्या दिवशी सकाळी सातलाच आम्ही दहा-बारा जणांचा ताफा दोन वाहनांत विभागून निघालो.  माजी सैन्याधिकारी असलेल्या साहेबांनी लष्करी खाक्या वापरत ताकीद दिली, “वानखडेजी अपने प्लाटून के कप्तान है. वो जैसा बोलेंगे वैसा ही सब करेंगे.” 


मलाही स्फुरण चढले. अंग्रेजो के जमाने के जेलरच्या ढंगाने कडाडलो, “आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी मेरे पिछे आओ...”


चार-पाच जण डाव्या बाजूच्या उंच भागाकडे चालू लागले आणि चार-पाच उजव्या बाजूच्या रस्त्याने गेले. केवळ चालक निमकर माझ्या मागे शिल्लक होते.  मी व निमकर हळूहळू डोहाच्या दिशेने निघालो.  पन्नास मीटर अंतरावरून आम्ही डोहाचे निरीक्षण केले.  पाण्याशिवाय काहीही आढळले नाही. सगळे मुसळ केरात गेले, अशी भावना झाली.  तशात उंचावरील गटातील सदस्य माझ्याकडे पाहून हातवारे करताना दिसले.  काही लक्षात येईना... खबरदारी म्हणून जमिनीवर पडलेल्या एका मोठ्या झाडाच्या बुंध्यावर चढून बघताच गवताच्या पलीकडून वीस ते तीस मीटरवर आमच्या विरुद्ध दिशेने जाणारी वाघीण नजरेस पडली. निमकर व माझी बोबडीच वळायची शिल्लक राहिली. ती गवतापलीकडून आमच्या अगदी जवळून गेली होती, आम्ही गप्पगार उभे राहिलो. ती रस्त्याच्या बाजूला गेली. त्या दिशेला प्रधान मुख्य वन संरक्षकांचा चमू होता. त्यांना आता व्याघ्रदर्शन होणार, अशी आम्हाला खात्री होती.  वाघीण दृष्टीआड गेली. मी, निमकर आणि चढावाच्या दिशेने गेलेल्या सगळ्यांना वाघीण दिसली होती. आम्ही एकत्र आलो आणि साहेबांच्या चमूकडे गेलो.  “सर, अच्छे से दिखा क्या ?” मी साहेबांना विचारले.  साहेब म्हणाले, “ क्या दिखा? हमको तो कुछ नही दिखा.” साहेब व त्यांच्या सोबतच्या चमूला वाघीण दिसलीच नव्हती.  सलग तीन दिवस ठीक नऊ वाजता माझ्या व्याघ्रदर्शनाची हॅट््ट्रिक साधली गेली होती.  पहिले दोन दिवस कुठल्याही ताफ्याशिवाय आम्हाला व्याघ्रदर्शन घडले होते, परंतु प्रचंड ताफा सोबत असूनही इतरांना तर वाघीण दिसली, पण ज्यांच्यासाठी हा बंदोबस्त लावला होता त्या साहेबांच्या नशिबात मात्र व्याघ्रदर्शन नव्हते.  थोडक्यात,  जंगलाच्या राणीच्या दर्शनास नशीब बलवत्तर असणे आवश्यक आहे, कुणाचीही प्रधानकी ती जाणत नाही, या सत्याची प्रचिती आली. 

शब्दांकन : जी. बी. देशमुख
संपर्क : ९४२३१२४८३८
gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...