Home | Magazine | Rasik | Ravindra Wankhede writes about tiger

मेहमान रह गया

रवींद्र वानखडे | Update - Apr 21, 2019, 12:16 AM IST

सोमूचा अंत असा व्हायला नको होता. अशा प्रसंगातून वाघाची बदनामी होते आणि वाघाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो

 • Ravindra Wankhede writes about tiger


  ‘मरे भी तो शेर, के हाथो’ अशी फुशारकी हिंदी सिनेमात चालते, प्रत्यक्ष जंगलात तिथल्या नियमाने वागणे चांगले. दारू पिऊन येणारे अवसान बेगडी असते, हे समजून द्यायचे काम काय कुलामामाचे होते?

  दाट रायमुनियातून वाकून खाली बसत, पुढे गेलो. काही अंतरावर एक फाटकी रक्ताळलेली बंडी आणि फाटके धोतर दिसून पडले. नंतर हाताची तुटलेली दोन बोटे नजरेस पडली आणि आमची खात्री पटली की सोमूची शिकार झाली आहे...


  मेळघाटातील व्याघ्रप्रकल्पाच्या परिघात असणाऱ्या सरवारखेडा गावची मंगली नेहमीप्रमाणे कडाक्याच्या थंडीत झोपेतून उठली. तिने अंगावरची गोधडी बाजूला सारली आणि वेळेचा अंदाज घेऊ लागली. मग तिला आठवलं, की नवऱ्याच्या प्रतिक्षेत ती पहाट होईपर्यंत अंथरूणात चुळबुळत होती. सकाळी केव्हातरी तिला झोप लागली. आपण झोपेत असताना नवरा परतला असेल आणि गुपचूप निजला असेल, असे मनात येताच तिने शेजारी जमिनीवरच अंथरलेल्या पथारीकडे पाहिले. रात्री तिने घातलेलं अंथरूण जसच्या तसं होतं. म्हणजेच, तिचा नवरा सोमू परत आला नव्हता. आता तिला कालचा घटनाक्रम आठवला आणि तिची झोपेची गुंगी खाडकन उतरली.
  सोमू आणि मंगली! नावातील वैशिष्ट्य लक्षात आलं का? आदिवासी कोरकू समाजात व्यक्तींची नावं सहसा जन्माच्या दिवशी जो वार असेल त्यानुसार ठेवली जातात. जसे सोमवारी जन्मलेल्या बाळाच नाव सोमू/सोमी, मंगळवारी जगात आलेल्याच मंगल/मंगली, बुधवारच्याच बुधू/बुधी... असे. काही नाव शारिरीक वर्ण किंवा व्यंगावरून ठेवली जातात जसे काल्या/काळी, लंगड्या/लंगडी इ. त्यांची गोत्र मात्र वनस्पतीच्या नावावरून असतात जसे सेमालकर, बेलकर, कासदेकर, आंबेकर, जामूनकर इ. आदिवासींच्या साध्या आणि थेट जीवनशैलीत सगळं कस सहज, सोप आणि निसर्गाच्या जवळच असत त्याच हे उदाहरण.
  मेळघाटातील सर्वसामान्य गरीब कोरकू आदिवासींचं जसं कष्टाचं जीवन असतं तसंच सोमू आणि मंगली दांम्पत्याचंही होतं. घरच्या दोन एकर जमिनीच्या तुकड्यावर राबायचं, शिवाय मिळेल तस मजूरीला जायचं, मिळेल तशी वनविभागाच्या सरकारी कामावर रोजंदारी करायची. नवरा सोमूसुद्धा मेहनती होता. पण अशिक्षित आदिवासी भागात विरंगुळ्याची जी मर्यादित साधनं होती, त्यात मोहाच्या दारूचा क्रमांक वरचा. सोमूच्या दारूच्या मोहाचा मंगलीने शहरी स्त्रियांप्रमाणे बाऊ केला नव्हता. थोडक्यात, दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री दारू पिऊन निपचीत पडायचे, अशी सोपी दिनचर्या होती सोमूची. पण प्रगतीचा सोस होता. घरच्या जमिनीच्या तुकड्यासाठी बैलजोडी घ्यायचं त्यांच्या मनात होतं. खूप काटकसर करून हजार रुपये जमले होते. तिथून आठ कि.मी.वर बोरटाखेडा गाव आहे. ते सोमूचं सासर. सासऱ्याकडून निरोप आला, की गावात एक बैलजोडी विक्रीला आहे. सोमू आणि मंगलीने जवळची सगळी शिल्लक मोकळी केली. सकाळी न्याहारी करून सोमू आणि त्याचा मित्र बुधू निघाले. वाट नेहमीचीच होती, पण होत संरक्षित जंगल. कुलामामाचा (कोरकू भाषेत वाघाला ‘कुला’ म्हणतात) इलाखा. पण आपण काय, जन्माचे कोरकू. कुलामामा आपला सखा. आपणास इजा पोहोचवणार नाही, असा अंतरीचा विश्वास. त्यामुळे सरवारखेड्याहून निघून दोन कि.मी. पायी चालत जायचे. नंतर हातरू गावाजवळ फाट्यावरून बस धरायची आणि रायपूरला उतरून पाच कि.मी. संरक्षीत जंगलातून पायी चालत बोराटाखेडा गाठायचे, अशी ही कसरत होती. परंतु सोमू आणि बुधू करिता बस मधील थोडक्या प्रवासापेक्षा सरावलेल्या चालिने संरक्षित जंगलातून झपाट्याने पायी चालणे अधिक सोपे होते. सगळा द्रविडी प्राणायम करून दीड तासात, ही जोडी सोमूच्या सासऱ्याकडे पोहोचलीसुद्धा. जावई येणार म्हणून सासरेबुवाने कोंबडीचा बेत केला होता, शिवाय जेवणाच्या आधीचा मोहाचा वार्म अप होताच. ज्याचा बैल विक्री होता त्या काल्याकडे आधी जाऊन येऊ असं ठरलं. सासरेबुवा, सोमू आणि बुधू तिघेही काल्याकडे गेले. बैलजोडी पाहिली. ती काही सोमूला फारशी पसंत पडली नाही. तरी भाव कमी जास्त झाला तर सौदा करून टाकू, असे त्याच्या मनात होते. पण काल्या गेला होता, शेजारच्या गावी मयतीला. उद्या येणार होता. मग काय, सासऱ्याकडे सोमू आणि बुधू दोघांनी कोंबडी हाणली. त्या आधी सासरेबुवांनी जावईबापूंना ‘तिर्थ’ दाखवलं होतंच. तट्ट जेऊन दोघेही पाहुणे परतिच्या प्रवासास निघाले. ‘अंधार व्हायच्या आत घरी पोहोचा’ असा सल्ला देत सासरेबुवांनी पाहुण्यांना निरोप दिला. सासऱ्यांपुढे माणूसकी म्हणून बेताची प्यायलेल्या सोमूने त्याच गावातील एकाकडे अजून ढोसली. खिशात बैलाचे पैसे होतेच. पाच पन्नास इकडले तिकडे. थोड्या वेळात अंधार पडणार तशात दोघांनी आपल्या गावाच्या दिशेने डोलत-डोलत प्रस्थान केले. पाय जमिनीवर निट टेकत नसले, तरी दोघेही आसमानात होते. बोराट्याखेडा ते रायपूर ५ किमी पायी जायचे तेथून सेमाडोह वरून येणारी हाल्टिंग बस पकडून हतरु नजीक सरवारखेडा फाट्यावर उतरून परत २ किमी पायी जात घरी रात्री मुक्कामी पोहोचण्याचा बेत होता.
  इकडे संध्याकाळ झाली, रात्र झाली, जेवणाची वेळही टळली तरिही सोमूचा पत्ताच नव्हता. सकाळी झोपेतून उठल्यासरशी मंगली, गेली बुधूच्या घरी. तिथे कळले की बुधू काल रात्री परतलाच नव्हता. दिवसभर मंगली सोमूची वाट पाहत राहिली. अधूनमधून बुधूच्या घरी जाऊन पहायची. रात्र झाली. हातरुच्या हालटिंग बसची वेळ होऊन गेली. मंगलीला बुधू गावात शिरताना दिसला. मंगलीने अधीरतेने विचारले, ‘सोमू किधर है?’ त्यावर बुधू मंगलीला म्हणाला, ‘वो मेहमान रह्य गया!’

  सासरी मुक्काम करण्याचं काही ठरलं नव्हतं, तरी नवरा तिथे कसा थांबला, याबद्दल मंगलीच्या मनात शंका होती. शिवाय बुधू काल रात्री का परत आला नाही, हे सुद्धा तिला थोड विचित्र वाटलं. पण सोमूजी सकाळपर्यंत परत येईल, असे मनात धरून ती कामाला लागली. पहाट झाली. सोमू गेल्यापासूनचा तिसरा दिवस उजाडला. आता मंगली बेचैन झाली. बुधूला तिने पुन्हा खोदून विचारले. आणि मग मंगलीचा धीर सुटला. सोमू घरून अनेक वर्षांची बचत घेऊन गेला होता. त्यामुळे बुधूविषयी तिला शंका आली. बुधूच्या जोडीला तिने शेजारपाजारची काही माणसे सोबत घेतली आणि थेट बोराटाखेड्याचा रस्ता धरला. माहेरी जाऊन हकिगत सांगितली तर बाप म्हणाला की, सोमू आणि बुधू तर त्याच दिवशी निघून गेले. तोपर्यंत मूग गिळून बसलेल्या बुधूने आता वस्तुस्थिती सांगितली. ‘बोराट्याखेडा निकलते निकलते मै और सोमू शंकर के घर फिरसे सिद्डू पिया. परेरापाटी डोह के आगे जाने के बाद सोमू से चलना नही हो रहा था, इसलिये हम काहु के पास बैठा. फिर सोमू बोला कि मै वापस बोराट्या जाता. इसलिये उसको छोडके मै अकेलाही रायपूर चला गया. हातरु का मेरा हाल्टिंग बस चूक गया इसलिये मै रायपूर मेहमान रह गया.’ बुधूने अजूनही अर्धेच सत्य सांगितले होते. आता मात्र सगळे चिंतेत पडले. सगळी मंडळी बुधुने सांगितलेल्या रस्त्यातील कहुच्या झाडाजवळ गेली. तिथे त्यांनी आसपास शोध घेतला तेव्हा त्यांना सोमूची एक चप्पल आणि थोड्याच अंतरावर त्याची नायलॉनची कळकट थैली आढळली. मंगलीला अनिष्टाची शंका आली. इलाखा कुलामामाचा होता. रस्त्यालगतच्या नाल्यात वाघाच्या पंजाचे ठसे दिसून आले. घात झाला होता. दाट रायमुनियामुळे पुढील शोध घेण्यापूर्वी वनविभागाला कळविण्याचे ठरले. काहींनी लगेच रायपूर गाठून वायरलेस वर कळविले. रायपूर, सेमाडोह व परतवाडा कार्यालयात क्षणार्धात माहिती पसरली. एका तासात वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

  काही गावकऱ्यांच्या मदतीने पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाट रायमुनियाचे जंगलात शोध मोहीम सुरु झाली. टायरची चप्पल आणि नायलॉनची थैली तिथेच पडली होती. पूर्ण ताफा दाट रायमुनियात पायवाट काढत पुढे जाऊ लागला. पुढे पहिल्या चपलीचा जोड असलेली टायरची दुसरी चप्पल सापडली. नंतर गवतावर शिकार ओढत, नेल्याच्या खुणा दिसू लागल्या. ज्याक्षणी एक मोठा केसाचा पूंजका नजरेस पडला, आम्ही सर्व गावकऱ्यांना मागे थांबण्याच्या सूचना दिल्या. केसाच्या पुंजक्याखाली लालसर मानवी त्वचासुद्धा होती. आता आम्ही निवडक लोक काळजीपूर्वक दाट रायमुनियातून वाट काढत जाऊ लागलो. बाकी मंडळींना रस्त्याजवळच थांबायला सांगितले. दाट रायमुनियातून वाकून खाली बसत, वेळ प्रसंगी सरपटत पुढे गेलो. काही अंतरावर एक फाटकी रक्ताळलेली बंडी आणि फाटके धोतर दिसून पडले. नंतर हाताची तुटलेली दोन बोट नजरेस पडली, आणि आमची खात्री पटली की सोमूची शिकार झाली आहे. पावलागणीक रक्ताचे वाळलेले डाग गवतावर वाढत्या प्रमाणात दिसू लागले. आता आम्ही रायमुनियाच्या झुडपांच्या गर्दीमुळे तयार झालेल्या मांडवापर्यंत पोहोचलो होतो. गावकरी आता सुमारे ५०० ते ७०० मीटर दूर मागे उभे होते. हिरव्या झुडपांच्या मांडवाच्या आत जाण्यासाठी एक संकुचित मार्ग होता पण आतील दृश्य काही स्पष्ट नजरेस पडत नव्हते. शिकार ओढून तिथे नेल्याच स्पष्टच होतं, त्यामुळे काळजी घेणं भाग होतं. खुद्द वाघोबाच आत असले तर काय घ्या? सगळे वर्दिधारी थबकले. एकदम झूडपांच्या मांडवात प्रवेश न करता त्या झुडपाच्या सभोवताल माणसांना चक्कर घालायला सांगितली. झुडपाच्या फटीतून वाघोबांच्या अस्तित्वाच्या खूणा दिसल्या नाही. आता मनाचा हिय्या करून सरळ संकुचित मार्गातून आत गेलो. आतील दृश्य विषण्ण करणारे होते. चाटून पुसून स्वच्छ केलेला एक मानवी सांगाडा आतमधील गवतावर अस्ताव्यस्त पडला होता. गवतावर रक्ताचे वाळलेले डाग होते. वाघाच्या सततच्या वावरामुळे आतील हिरव्या गवताचा जाड गालिचा तयार झाला होता. तीन पूर्ण दिवसात वाघाने सोमू ला पूरवून-पूरवून खाल्ला आणि चाटून पुसून संपवला होता.

  आप्तांचा प्राथमिक टाहो फोडून झाल्यावर, आम्ही बुधूला फैलावर घेतला, तेव्हा खरी कथा पुढे आली. सोमूच्या सासरी पाहुणचार घेऊन दोघेही परत निघाले, तेव्हा दोघांनी पुन्हा दारू ढोसली आणि अंधार व्हायच्या सुमारास जंगलाच्या मधोमध जाऊन पोहोचले. सोमूजीला तर इतकी जास्त झाली होती, की त्याच्याने चालणेही होत नव्हते. एकमेकांशी बडबडत ते चालत होते. त्यांच्या नकळत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वाघाच्या समोर सात-आठ फुटांच्या अंतरावर ते येऊन पोहोचले होते. इतक्या जवळ येऊनसुद्धा वाघ निश्चल होता. अर्धशुद्धीतील सोमूला तेव्हासुद्धा वाघ दिसला नसावा. पण तुलनेने शुद्धीवर असलेल्या बुधूची साक्षात कुलामामाशी नजरानजर झाली. तशातही खाली बसकण मारून बसलेल्या सोमूला त्याने पायाने ढोसले आणि चाचरतच ‘कुला...कुला’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण सोमू शुद्धीत नव्हताच. पुढच्याच क्षणी बुधू जीवाच्या आकांताने पळत सुटला. पळणारा बुधू रात्रीच्या अंधारात ठेचाळत, हेलपाटत कधी तरी रायपूरला पोहोचला आणि कोणालाच काही न सांगता ओळखीच्या शंकरकडे ‘मेहमान राह्यला’. घडला प्रकार आधीच का नाही सांगीतला अशी विचारणा केली असता म्हणाला, ‘दारू पिण्याच्या नादात सोमू चे बरेच पैसे खर्च झाले होते आणि मी त्याच्या सोबत होतो म्हणून मंगली आपल्यालाच शिव्या घालेल या कारणाने मी ‘वो मेहमान रह्य गया’ इतक सांगून गप्प बसलो.’

  सोमूचा अंत असा व्हायला नको होता. अशा प्रसंगातून वाघाची बदनामी होते आणि वाघाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. वाघाने माणूस मारला, वाघ नरभक्षक झाला अशी बोंब पसरते. पण मुळात ही दोघेही वाघाच्या आवाक्यात येऊन सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नव्हता, किंवा पळणाऱ्या बुधूचासुद्धा त्याने पाठलाग केला नव्हता. अर्धशुद्धीत असलेल्या सोमू आणि वाघोबाचा आपसात काय संवाद झाला असावा, ते त्या दोघांनाच माहीत, पण इतके निश्चित की, माणूस इतक्या घनिष्ठ संपर्कात आल्याशिवाय वाघोबा त्यावर हल्ल्याचा विचार करत नाहीत. समोरासमोर आल्यानंतरही नशेतील सोमूच्या असंबद्ध हालचालींमुळे वाघ विचलीत झाला. सर्वसामान्य शिकारीप्रमाणे त्याने सोमूला वागणूक दिली, असा निष्कर्ष आम्ही या प्रकारातून काढला.

  पुढील काही दिवस या परिसरात हत्तीवरून गस्त घालण्यात आली. बोराट्याखेडा ते रायपूर शाळेत मुलांना येण्या-जाण्याकरता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची मिनिबस ठेवण्यात आली. नंतरच्या दिवसात वाघाकडून मानवावर हल्ला झाल्याची घटना घडली नव्हती. जवळ जवळ एक महिन्या नंतर खात्री झाली की वाघोबाने सोमूशी केलेला व्यवहार एक अपघात होता. म्हणजेच, तो वाघ नरभक्षक नव्हता...

  (कथेतील पात्रांची नावे बदलली आहेत.)
  शब्दांकन : जी. बी. देशमुख
  संपर्क : ९४२३१२४८३८
  [email protected]

  रवींद्र वानखडे
  [email protected]

Trending